सफर आनंदाची… केरळ–तामिळनाडूची..!!!
श्रीमती सीमादेवी निंबाजी बेडसे चाळीसगाव, जिल्हा जळगाव.

सफर आनंदाची… केरळ–तामिळनाडूची..!!!
दिनांक १९ ऑगस्ट, नेहमीप्रमाणे आमचा लाडका गंगासागर ग्रुप वार्षिक सहलीसाठी सज्ज झाला होता. वर्षभराच्या धावपळीतील काही क्षण स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी जपण्याची ही संधी होती. यंदाची सफर होती निसर्गाच्या कुशीत वसलेल्या केरळची आणि श्रद्धा – संस्कृतीने नटलेल्या तामिळनाडूची. एकूण चौतीस जणांचा आमचा परिवार उत्साहाने या प्रवासाला निघाला होता. यावेळी विशेष म्हणजे ग्रुपमध्ये अनेक ‘कपल्स’ होती आणि त्यामुळे या सहलीला एक वेगळीच रंगत आली होती.
रोजच्या जीवनात प्रत्येक जण अनेक जबाबदाऱ्यांनी बांधलेला असतो. घर, काम, संसार आणि कुटुंब या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. पण या प्रवासाने जणू आम्हाला पुन्हा एकदा स्वतःकडे पाहायला शिकवले. रोजचे पती-पत्नीचे नाते काही दिवसांसाठी जबाबदाऱ्यांच्या चौकटीतून बाहेर आले आणि प्रत्येक जोडपे पुन्हा नव्याने प्रेमात पडल्यासारखे वाटू लागले. जणू वर्षानुवर्षे संसार करणारे तेच दोन जीव काही काळासाठी पुन्हा प्रेमी-प्रेयसी झाले होते.
मी मात्र हे सगळे आनंदाने पाहत होते. प्रत्येकाचे एक नवीन रूप या प्रवासात समोर येत होते. आमचा गंगासागर ग्रुप म्हणजे जणू सप्तरंगी इंद्रधनुष्य! प्रत्येकाचा रंग वेगळा, स्वभाव वेगळा आणि गुणही वेगळे; पण एकत्र आल्यावर तयार होणारे चित्र मात्र अतिशय सुंदर. कोणी सेल्फीमध्ये रमणारे, तर कोणी खरेखुरे लव्ह बर्ड्स! कोणी जोक्सचे बादशहा, तर कोणी कविता, म्हणी आणि उखाण्यांनी वातावरण रंगवणारे. कोणी आपल्या जोडीदाराची काळजी घेणारे, तर कोणी निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जाणारे. कोणी अँकरिंग करून सगळ्यांना एकत्र ठेवणारे, तर कोणी सहजपणे गप्पांमधून सर्वांचे मनोरंजन करणारे. कोणी भक्तिगीतांत रमणारे, तर कोणी कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वांच्या मदतीला धावून जाणारे. अशा अनेक सुंदर स्वभावांच्या माणसांनी आमचा गंगासागर ग्रुप खऱ्या अर्थाने एक परिवार बनला होता.
केरळमध्ये प्रवेश करताच निसर्गाने जणू आमचे स्वागतच केले. हिरवीगार झाडे, नारळाच्या उंच रांगा, डोंगर-दऱ्या आणि निसर्गाची निरव शांतता… सगळीकडे हिरवाईची जणू चादर पसरली होती. त्या निसर्गरम्य वातावरणात मनातील थकवा कुठल्या कुठे पळून गेला.केरळच्या हिरवळीत प्रत्येक क्षण अधिक सुंदर वाटत होता. आपल्या माणसांसोबत चालताना, हसताना आणि फोटो काढताना मन नकळत हलके होत होते. त्या क्षणी मनात सहज काही ओळी उमटल्या…
केरळच्या हिरवळीत, प्रेम पुन्हा फुलले..
जुनेच नाते होते, पण क्षण नव्याने मिळाले…
खरंच, नाती जुनी होती; पण त्यांना अनुभवण्याची दृष्टी नव्याने मिळाली होती. एकमेकांच्या सहवासात हरवलेले क्षण पुन्हा सापडत होते. रोजच्या जीवनात न बोलल्या जाणाऱ्या छोट्या भावना या प्रवासात नकळत व्यक्त होत होत्या. हसण्यातून, काळजीतून आणि एकमेकांसोबत शांत बसण्यातूनही प्रेम व्यक्त होत होते. केरळच्या निसर्गातून आम्ही पुढे तामिळनाडूच्या दिशेने निघालो आणि या प्रवासाला निसर्गाबरोबरच अध्यात्माची सुंदर जोड मिळाली. तामिळनाडूची संस्कृती, पारंपरिक पोशाख, स्त्रियांच्या केसांमधील सुगंधी गजरे, कपाळावरील चंदन आणि मंदिरांमधील भक्तिमय वातावरण मनाला खूप भावले.
मदुराईचे मीनाक्षी अम्मन मंदिर पाहताना मन अक्षरशः भारावून गेले. भव्य गोपुरम, रंगीबेरंगी शिल्पकला आणि मंदिराची अप्रतिम रचना पाहून त्या कलाकारांच्या कलेपुढे मन नतमस्तक झाले. प्रत्येक दगडात जणू एखादी कथा कोरलेली होती. माता मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांच्या दैवी नात्याशी जोडलेली परंपरा मनाला स्पर्शून गेली.
त्या मूर्तींकडे पाहताना एकच विचार मनात आला, ‘दगडाला आकार देणे कदाचित सोपे असेल, पण दगडामध्ये भावना निर्माण करणे ही खऱ्या कलाकाराची ताकद असते’. त्या शिल्पांमधील भाव, सौंदर्य आणि जिवंतपणा पाहून मन खूप भावुक झाले.
तामिळनाडूतील मंदिरांमध्ये मला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे तेथील दिव्यांची रोषणाई. मंदिरातील असंख्य दिव्यांच्या प्रकाशात भगवंताचे रूप अधिकच तेजस्वी दिसत होते. त्या लहानशा ज्योतींकडे पाहताना असे वाटले की,अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला आव्हान देऊ शकतो. रामेश्वरम्च्या पवित्र भूमीने मनाला एक वेगळीच शांतता दिली. श्रद्धा,परंपरा आणि समुद्राच्या सान्निध्यात मन नकळत अंतर्मुख झाले. तर कन्याकुमारीने निसर्गाचे विशाल रूप दाखवले. अथांग समुद्र,सतत येणाऱ्या लाटा आणि क्षितिजापर्यंत पसरलेले आकाश पाहताना मनात अनेक विचार उमटले.
समुद्राच्या लाटांसारखेच जीवन असते. काही क्षण किनाऱ्यावर येऊन विरून जातात, तर काही पुन्हा नव्या शक्तीने परत येतात. जीवनातही चढ-उतार येतात; पण आपल्या माणसांची साथ असेल, तर प्रत्येक वादळ पार करणे सोपे वाटते. या प्रवासाने आम्हाला केवळ केरळ आणि तामिळनाडू दाखवले नाही, तर आम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ आणले. निसर्गाने मनाला ऊर्जा दिली, मंदिरांनी श्रद्धा दिली आणि सहवासाने प्रेमाला नवी उब दिली. शेवटी परतीच्या प्रवासाला निघताना मनात एकच भावना होती….!!
दूर आलो घरापासून, जवळ आलो मनापासून
प्रेम पुन्हा फुलले,उमलले, तुझ्या-माझ्या सहवासातून…
प्रवास संपेल, रस्ते बदलतील आणि दिवस पुढे जातील; पण या प्रवासातील क्षण मात्र मनात कायमचे कोरले जातील. ही सफर केवळ केरळ–तामिळनाडूची नव्हती; ती होती निसर्गाची, मैत्रीची, श्रद्धेची आणि प्रेमाची… आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पुन्हा एकदा नव्याने जगण्याची!
श्रीमती सीमादेवी निंबाजी बेडसे
चाळीसगाव, जिल्हा जळगाव.
========



