Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

सावलीच्या प्रतिक्षेत अजूनही उन्हातच मी..!’; स्वाती मराडे

गुरुवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 3

“सावलीच्या प्रतिक्षेत अजूनही उन्हातच मी..!’; स्वाती मराडे

गुरुवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण

एकदा एका काकांशी बोलता बोलता ते म्हणाले, आता राह्यलंच काय आयुष्यात? थांबायची वेळ आली. बस्स इतकाच आता प्रवास, ….केव्हाही संपतील श्वास ! स्वल्पविराम घेत पूर्णविरामाची गोष्ट बोलणा-या काकांचे ते शब्द ऐकून माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. या बोलण्यात निरवानिरव असली तरी समाधान नक्कीच नव्हतं. कसलीतरी सल होती हे मात्र नक्की. त्यामुळं ‘असं का बोलता काका?’ हे शब्द माझ्या तोंडून आपोआपच बाहेर पडले. त्यासरशी पापणीआड दडलेल्या अश्रूंनीही दगा दिला. आयुष्यात नियतीने ज्याला सगळ्यात जास्त दगा दिलेला असतो तो एकतर अश्रूंना कायमच दाबून टाकतो व मरणयातनांनाही वाकुल्या दाखवतो किंवा मग शोधतो एकदा आधाराचा खांदा मनसोक्त रडण्यासाठी. त्या रडण्यासोबत मनातलं दुःख वाहून गेलं असतं तर किती बरं झालं असतं..! कदाचित वाहून जात नसेल पण थोडाफार भार हलका नक्कीच होत असेल. त्यामुळेच शब्द मुके होतात तेव्हा अश्रू बोलू लागतात. मन हलकं करतात. अश्रूंचा कड ओसरला नि एवढंच म्हणाले, ‘खूप उन्हाळे पावसाळे पाहिले पण सुखाची सावली मिळालीच नाही.. अजूनही उन्हातच मी..!’

थोडावेळ आम्हा दोघांत एक जीवघेणी शांतता पसरली. बघुया काय सांगतात म्हणून मीही त्यांच्या हातावर हात ठेवत सांत्वनाचा प्रयत्न केला. माझ्या मनाची झालेली चलबिचल पाहून ते पुन्हा बोलू लागले, ‘मायबापाचं सुखसावली देणारं छत्र जन्मानंतर सगळ्यांना मिळतं. पण मला मात्र ते मिळालं नाही. रानमाळावरील झाडाप्रमाणे येतील त्या संकटाला तोंड देत.. ऊन, वारा, पाऊस झेलत वाढलो. तेव्हा जीवनप्रवासात मदत करणारे अनेक पांथस्थही भेटले. त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या शिडकाव्यानेही मी जगत राहिलो. कुणी जेवण, कुणी कपडे, कुणी शिक्षण दिले तर कुणी अनाथाश्रमात रहायची सोय केली.

या सगळ्यांचा मी ऋणीच. ज्यांच्यामुळे मला संस्कार भेटले. या संस्कारांच्या बळावरच मी दुनियादारीत माझी मुळे घट्ट करत गेलो. या प्रवासात एक वेलही आली सोबतीला. दोघेही हातात हात घालून ऊन झेलत राहिलो. संकटं आता उणी वाटू लागली. पण नियतीला ते तरी कुठं मान्य होतं? काळाच्या अघाताने तीही दूर झाली. खरंतर तेव्हाच मीही उन्मळून पडलो असतो, पण ती गेली ते ओंजळीत एक पिलू देऊन. त्या पिलासाठी मात्र सावली द्यायचं ठरवलं. पण तुला माहितीय का? सावलीचं सुख द्यायचं असेल तर स्वतः उन्हात उभं रहावं लागतं. तेही मी केलं पण आता पिलूच घरट्यातून उडून गेलं. तेच सहन होत नाही रे.. वाटतंय अजूनही दु:खाच्या उन्हातच मी..! आता सांग कसा करावा पुढचा प्रवास?’

खरा सल बाहेर पडला. मी म्हटलं, ‘काका, तुम्ही माळरानावरील झाड आहात असेच म्हणालात ना? इतके दिवस एका पिलाला सावली देण्यासाठी धडपडत होतात. कदाचित तुमच्यासारखीच कुणाची सावली नसणाऱ्या आसपासच्या पिलांना तुमची सावली मिळावी म्हणून तुमचं पिलू दूर गेलं.. असंच का समजत नाही तुम्ही?’ त्यासरशी त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आणि म्हणाले, ‘होय, असंच असेल कदाचित..आता मी तेच करेन अनाथ पिलांना सुखाची सावली देण्याचं काम. त्यासाठी उभा राहीन उन्हातच मी. पण हे उभं राहणं सुखदायी असेल हे मात्र नक्की.’

आज ‘चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र ‘उन्हात उभे असलेले सुकायला लागलेले झाड’ हे झाड पाहून मनात आले. नक्की हे चित्र आशा की निराशा दाखवणारे. दोहोंचा समतोल दिसतोय. पण मग निराशेची मरगळ झटकत आशेची पालवी फुटतेय का ? याचा विचार मनात आला नि लिहीत गेले. आजच्या रचनाही अशाच आशा पल्लवित करणाऱ्या‌. तर शब्दातूनही मनाला वास्तवाची जाण करून देत मनाला चटका लावणाऱ्या. खरोखरच तुमची सर्वांची लेखणी बहरतेय. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि पुणे
मुख्य परीक्षक, कवयित्री,लेखक
मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे