माणसात देव शोधणारे : संत गाडगेबाबा
अनिता व्यवहारे ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर

माणसात देव शोधणारे : संत गाडगेबाबा
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ||
सांभाळ ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला ||
असा परमेश्वराकडे आग्रह करणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा. ‘दगडात देव नाही तर माणसात देव आहे’. प्राणीमात्रात देव आहे हे सांगत असत. याचसाठी भूतदया प्राणिमात्रावर दया केली पाहिजे, हे माणसाच्या मनावर बिंबवण्यासाठी आपल्या कीर्तनातून सातत्याने प्रयत्न केले. रंजल्या गांजलेल्यांची, अनाथ,अपंगांची सेवा त्यांची दुःख दूर करणे, हीच गाडगेबाबांची देवपूजा होती. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 साली शेनगाव येथे एक धोब्याच्या घरात झाला. त्यांचे नाव डेबुजी असे होते. लहान वयातच त्यांचे पितृछत्र हरवले आणि ते मामाकडे आश्रयाला राहू लागले. मामांकडे राबत असताना गरिबावर होणारे अन्याय अत्याचार फसवणूक हे सर्व ते पाहत होते. त्यातच लहान वयातच त्यांचे लग्न झाले.त्यांना चार मुली ही होत्या. पण या सर्वांचा त्याग करून त्यांनी परिभ्रमणाचे व्रत स्वीकारले.
अंगात फाटके तुटके कपडे आणि एक गाडगे धारण करणारे, सतत लोकोपयोगी कामात गुंतलेले बाबा, गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले. जरी हा वेष त्यांचा असला; तरी लोकांना स्वच्छतेचा आणि वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश देत असत. काम केल्याशिवाय कोठेही, काहीही खायचे नाही, हे तत्व अंगीकारल्यामुळेच ते हातात झाडू घेऊन परिसर लख्ख करून टाकीत. मगच गावात जेवण घेत. त्यांच्या जेवणात काय? तर डोक्यावरच्या खापरात पातळ डाळ किंवा भाजी आणि ज्वारीची भाकरी. या कामाबरोबरच “विद्या शिका!” “गरिबाले विद्येसाठी मदत करा”. शिक्षणाने जीवन फुलते. आपण या जगात कशासाठी आलो आहोत हे कळते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. असे ते लोकांना सांगत असत.
कुणी न रहावे खुळे अडाणी
शिक्षण घ्यावे, व्हावे ज्ञानी
यासाठी ही झिजते वाणी
मी जातीचा धोबी देवा
धुवीन कपडा मळलेला..
त्यांच्या या कीर्तनातून लोकांना बोध होऊन त्यांच्यात झालेला बदल पाहून त्यांना समाधान वाटायचे. उत्तम जगायचं कसं? हे शिकवण्यासाठी कितीतरी शास्त्र राबत आहेत. आभाळावर, पहाडावर, सागराच्या थैमानावर आपण मात केलेली आहे. भुईच्या पोटात शिरलो आहोत. “धन्य त्या शास्त्राची आणि विज्ञानाची…!अशा सोप्या शब्दातून समाजातील थोतांड भोंदूपणा दूर करण्याचा प्रयत्न ते करीत. देवाला नवस करणे, हा वेडेपणा आहे. असे ते सांगत. म्हणत, “अरे देव का साहेबाचा पट्टेवाला आहे का जी?” का वावरातील शिल्लक उरली भाजी दिली तर धावू धावू आपलं काम करून टाकील?” “अरे थो साहेबांचा साहेब आहे.. ज्ञानोबानं सांगितलं की, आपापली कामा नेकीन करत जावं.. मंग थो प्रसन्न होतो.
घाम गाळा त्याला मिळे भाकरी
कुठेच कुणी नको भिकारी
कुणी कुणाचा नको रिणकारी
कुणी न विटो नर जन्मांतरी
हे त्यांचे म्हणणे लोकांना पटत गेले आणि दान घेण्यासाठी हात पसरण्याऐवजी दान देण्यासाठी हात पसरणे योग्य आहे हे ही पटले. दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्यासारख्या मुक्या प्राण्यांचा बळी देण्याऐवजी.
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले |
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा ||
असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. गाडगेबाबांनी गोरगरिबांसाठी धर्मशाळा, हॉस्पिटल काढले. त्यांच्या ‘स्वच्छतेच्या मंत्रा’मुळेच आजही पर्यावरणात समतोल राखला जात आहे. त्यांना मात्र एकच खंत होती की, लोकशाही राज्य आलं तरी, आम्ही माणूस म्हणून जगायला शिकलो नाही आणि माणूस म्हणून दुसऱ्याला जगू द्यायला पण शिकलो नाही. असे हे गाडगेबाबा कोणालाही आपल्या पायांना स्पर्श करून देत नव्हते. यासाठी ते लोकांच्या घराण्यातून पटकन बाहेर पडत आणि म्हणत, ” माझ्या पाया पडण्यापेक्षा माणसाचे खरे देव हे त्याचे आईबाप असतात. त्यांच्या पाया पडा.
अशा या महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ असलेल्या बुद्धिजीवी व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख कर्मवीर भाऊराव पाटील हे “महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम” असाच करायचे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे अगदी 14 नोव्हेंबर 1956 रोजी त्यांनी पंढरपूर येथे अखेरचे कीर्तन केले. अखेर 20 डिसेंबर 1956 रोजी पेठा नदीच्या काठावर वलगाव येथे त्यांची प्राणज्योत मालवली..! अशा या आधुनिक संतांची आज पुण्यतिथी. त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला त्रिवार वंदन!!!
अनिता व्यवहारे
ता.श्रीरामपूर जि. अहिल्यानगर
=========



