Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरनांदेडपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

घटस्फोटाच्या अवघड वाटेवरून थेट प्रेमाच्या घरात..!!!

आर्यन आणि अद्विताचं पुनर्मिलन: एक प्रेमप्रवास

0 4 8 2 9 7

प्रेमकथा

घटस्फोटाच्या अवघड वाटेवरून थेट प्रेमाच्या घरात..!!!

आर्यन आणि अद्विताचं पुनर्मिलन: एक प्रेमप्रवास

‘घटस्फोट’ हा शब्द उच्चारताच कागदपत्रांचा, कोर्टरूमधील शांततेचा आणि दोन तुटलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील वेदनांचा क्षण डोळ्यासमोर उभा राहतो. अद्विता आणि आर्यनची गोष्ट ही केवळ त्यांची नाही, तर आज अनेक घरातल्या ‘शांत वादळांची’ गोष्ट आहे. ​कोर्टाच्या त्या थंड खोलीत, जेव्हा वकीलाने हसत “घ्या मॅडम, आता तुमचा घटस्फोट झाला!” असे उद्गार काढले, तेव्हा अद्विताला वाटले की तिला स्वातंत्र्य मिळाले. तिला ३० लाख रुपये नुकसान भरपाई आणि मासिक २० हजार रुपये खर्च मिळणार होता. तिने हलकेसे स्मित केले, कारण तिच्या दृष्टीने, तिने राग, अपमान आणि दुःखाच्या ओझ्याखालून स्वतःला मुक्त केले होते. आर्यनकडे न पाहता ती बाहेर पडली, आणि एका क्षणात ‘आम्ही’चे रूपांतर ‘मी’ आणि ‘तो’ मध्ये झाले.

​परंतु, याच क्षणाला आर्यनच्या मनात काय चालले होते? शांत उभे राहून सारे पाहत असताना, त्याने गमावलेला मोबदला पैशांत मोजता येणारा नव्हता. त्याच्या मनात तुटले होते ते फक्त नाते नाही, तर त्याने बांधलेले घर, त्याने पाहिलेली स्वप्ने आणि त्याची पत्नी. जी रागाच्या भरात दूर गेली होती. घटस्फोटाच्या कागदावर सही होते, पण मनावरची जखम कायम राहते. एका बाजूला ‘नुकसान भरपाई’ची रक्कम दिसत होती, तर दुसऱ्या बाजूला आयुष्याच्या झालेल्या अपरिमित नुकसानीची किंमत त्याला मोजावी लागत होती. पहिला महिना माहेरच्या प्रेमात सहज गेला, पण दुसऱ्या महिन्यापासून वास्तवाने डोकं वर काढायला सुरुवात केली. ​पती-पत्नीच्या नात्यात अडथळे असले तरी, ते ‘तिचे’ स्वतःचे घर असते. त्या घरात अधिकार असतो. मात्र, घटस्फोटानंतर माहेरचे घर ‘पाहुणे’ आणि ‘ओझे’ या दोन ध्रुवांमध्ये अडकून जाते. भावाचे बदललेले सूर, वाहिनीचे टोमणे आणि भाच्यांचे प्रश्न. “आत्त्या, किती दिवस राहणार इथे?” यातून अद्विताला जाणवले की, पैसा मिळाला, पण इज्जत, आपुलकी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अधिकार गमावला.

​याच दरम्यान, आर्यननेही एकटेपणा अनुभवला. त्याचे जुने आयुष्य, रोजच्या सवयी आणि अद्विता नसलेल्या घरातली शांतता त्याला खाऊ लागली. त्यानेही स्वतःच्या चुकांचा आणि रागाच्या क्षणांचा हिशोब केला असेल. नातं तुटायला कधीही एकट्या व्यक्तीची चूक नसते; दोन्ही बाजूंच्या अहंकाराची धूळ त्या नात्यावर जमा झालेली असते. “राग आणि टोमण्यांमध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला…?” हा अद्विताचा प्रश्न फक्त तिचाच नव्हता, तो प्रत्येक घटस्फोटित व्यक्तीच्या मनाला लागलेला आरसा आहे. निर्णय घेताना फक्त ‘दुःख’ पाहिले, पण त्याचे ‘दीर्घकालीन परिणाम’ पाहणे राहून गेले.

माहेरच्या घरात चार महिने काढल्यावर, अद्विताला जाणवले की, माहेर ‘आईचे घर’ असते; ‘तिचे स्वतःचे घर’ नव्हे. तिथे प्रेम होते, पण अधिकार नव्हता. एक रात्री ती टेरेसवर बसून स्वतःशी कुजबुजली: “चूक केली… निर्णय घेताना मी फक्त दु:ख पाहिलं, पण परिणाम पाहिलेच नाही.” त्याच क्षणी, तिने आर्यनला फोन करण्याची हिंमत केली. ​इकडे आर्यनसुद्धा एकटाच होता. त्याच्या चेहऱ्यावरची नैराश्याची तीव्रता दिवसागणिक वाढत होती. घरात अद्विता नसतानाची शांतता त्याला आतून पोखरत होती. रात्री १२ वाजता जेव्हा फोन वाजला आणि पलीकडून थरथरत्या आवाजात अद्विता म्हणाली, “आर्यन… आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देऊ शकतो का?”, तेव्हा आर्यनचा आधीचा दुखी चेहरा क्षणात आशेच्या एका प्रबळ धारेने उजळून निघाला. ‘हो’ म्हणालीस तर मी आत्ताच निघतो,” असे बोलून आर्यनने क्षणार्धात निर्णय घेतला. रात्रीचे १२ वाजले होते; पण त्याला थंडीची किंवा सुनसान रस्त्याची पर्वा नव्हती. हा प्रवास केवळ रस्त्याचा नव्हता, तर त्यांच्या तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडण्याचा होता.

​कार सुरू झाली आणि आर्यनच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले; “ती खरंच बदलली असेल का? आम्ही दोघे पुन्हा ते जुने प्रेम मिळवू शकू का? ती आताही रागात असेल तर? मी इतक्या दूर जाऊन तिला परत आणण्यात यशस्वी होईन का?” या प्रश्नांवर मात करत होती पुनः भेटण्याची उत्कट ओढ. पाच तासांपूर्वी जो चेहरा निराशेने ग्रासलेला होता, तो आता अद्विताला परत मिळवण्याच्या आनंदाने तळपत होता. कारचा वेग वाढत होता, तसा आर्यनच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातले प्रेम ओसंडून वाहत होते. प्रत्येक किलोमीटर त्याला अद्विताच्या आणि त्यांच्या खऱ्या घराच्या जवळ नेत होता. ​तो थांबला नाही, दमला नाही. त्याला फक्त एकच ध्यास होत. “तिला परत घरी आणायचं आहे!”

इकडे अद्विता फोन ठेवल्यानंतर प्रचंड अधीर झाली होती. तिच्या मनात आनंद आणि भीती यांचे मिश्रण होते.​ “तो कधी येईल? इतक्या रात्री गाडी चालवत असताना त्याला त्रास तर होणार नाही ना? मी त्याला पाहून काय बोलू? त्याच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी प्रेम दिसेल का?” ​जसा जसा पहाटेचा वेळ जवळ येत होता, तसा अद्विताच्या हृदयाचा ठोका वाढत होता. ती वारंवार खिडकीतून बाहेर पाहत होती. तिच्या मनात शंका-कुशंका होत्या, पण आर्यनच्या शब्दांवरील विश्वास तिला धीर देत होता. बाहेर थंडी होती, पण तिच्या मनात आर्यनच्या प्रेमाची ऊब तयार झाली होती. आणि मग… बरोबर पहाटे ५ वाजता, कारचा परिचित आवाज आला. ​अद्विता धावत दाराकडे गेली. तिच्या आई-वडिलांनी दार उघडले. समोर आर्यन उभा होता. पाच तासांच्या प्रवासामुळे थकलेला, रात्र जागवलेला, पण डोळ्यांत फक्त प्रेम आणि समाधानाची तीव्र चमक असलेला. त्याच्या चेहऱ्यावरची ती शांतता, तिची वाट पाहत असल्याची साक्ष देत होती.

​तिला पाहताच, आर्यनच्या संयमाचा बांध तुटला. तो पुढे सरकला. ​अद्विताचा चेहरा भीती आणि लाज यांच्या मिश्रणाने झाकलेला होता, पण क्षणातच डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा सुरू झाल्या. ती न बोलता, क्षणाचाही विलंब न लावता, धावत जाऊन आर्यनच्या कुशीत विसावली. त्यांच्या शरीरांना जोडणाऱ्या त्या घट्ट मिठीत शब्दांची गरज नव्हती. आर्यनने तिला इतके घट्ट मिठी मारली, जणू तो तिला पुन्हा कधीही स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. त्यांच्या भेटीने त्यांच्या मनात दडलेले चार महिन्यांचे दु:ख, पश्चात्ताप आणि तुटलेपण… एका क्षणात त्या मिठीतून वाहून गेले. ​दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा अखंडपणे गळू लागल्या. ते अश्रू रागाचे नव्हते, अहंकाराचे नव्हते; ते अश्रू होते आपले घर, आपले प्रेम आणि आपले आयुष्य परत मिळाल्याच्या निर्भेळ समाधानाचे. अद्विताने आपल्या तुटलेल्या मनाने आर्यनला फोन केला होता, आणि आर्यनने तिला प्रतिसाद देऊन सिद्ध केले की, प्रेम अजूनही जिवंत आहे.

आई-वडिलांनी हा भावनिक क्षण शांतपणे पाहिला. आर्यनने नम्रपणे त्यांना प्रणाम केला. अद्विताने बॅग उचलली. ना बोलणं, ना वाद. कारण हा निर्णय बुद्धीने नव्हे, तर तुटलेल्या मनाने आणि जोडल्या गेलेल्या आत्म्याने घेतला होता. ​कार सुरू झाली… आणि अद्विता परत तिच्या घराकडे—खऱ्या घराकडे निघाली. घटस्फोटाचा कागद मागे पडला होता आणि दोघांच्या आयुष्यात नात्याची नवी, प्रेमाची पहाट उगवली होती. मित्रांनो… नाती मोडत नाहीत. फक्त कधी कधी त्यावरील धूळ हळूवार साफ करायची असते. राग, पैसा आणि अहंकार यापेक्षा प्रेम, विश्वास आणि आपुलकी कितीतरी मोठी आहे, हेच आर्यन आणि अद्विता यांनी सिद्ध केले. योग्य वेळी घेतलेले छोटंसं पाऊल आणि प्रेमावरचा दृढ विश्वास संपूर्ण आयुष्य वाचवू शकतो “आयुष्य खूप सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे”.

प्रा. डॉ. गोविंद पांडुरंग चौधरी (देव)
उपप्राचार्य तथा सहाय्यक प्राध्यापक
ता.बिलोली, जि. नांदेड

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे