‘जगणे समृद्ध होण्या ओस पडाव्यात बंदीशाळा….!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
‘जगणे समृद्ध होण्या ओस पडाव्यात बंदीशाळा….!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
साधारण दहा बारा वर्षांपूर्वीची ही घटना. रक्षाबंधन सणानिमित्त आमच्या संस्थेने शाळेच्या सोशल ग्रुप तर्फे शहरातील जिल्हा तुरुंगात कैद्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम घ्यावे असे ठरवले. तुरुंग अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेऊन आम्ही काही शिक्षक-शिक्षिका, सोशल ग्रुपचे आणि कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी घेऊन तुरुंगात हजर झालो. आमच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे मु. अ. नी माझे स्वलिखित ‘अप्पूची मैत्रीण’, हे छोटेसे नाटक बसवले होते. मित्रमैत्रिणी आणि नातेसंबंधावर आधारित हे ह्रदयस्पर्शी नाटक बघताना तुरुंगातील कैद्यांचे डोळे नकळत पाणावले. काही जण हमसून हमसून रडू लागले. आम्हाला कळेना त्यांचे सांत्वन कसे करावे ? तरीपण सोबतच्या सिस्टर्सनी त्यांचे कसेबसे सांत्वन केले. त्यांना मिठाई वगैरे खाऊ घातली आणि सर्वांचा निरोप घेऊन आम्ही घराकडे परतलो.
घरी येताना डोक्यात अनेक प्रश्नांचा गुंता होऊ लागला. का बरे गुन्हे घडतात ? का बरे तुरुंगात त्यांना कैद करावे लागते ? माणसाच्या भावभावना तर सारख्याच… नाट्यगृहातील प्रेक्षकही ह्रदयस्पर्शी नाटक बघून रडतात आणि तुरुंगातीलही…स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी लढणाऱ्या भारतीय लोकांना डांबण्यासाठी असलेल्या बंदी शाळा आज मात्र समाजविघातक, देशविघातक गुन्हे करणाऱ्या कैद्यांनी भरलेले आहेत. त्यात अगदी तळागाळातील व्यक्तींपासून उच्च विद्याविभूषित व्यक्तींपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. हे सर्व बघून माणसाची वाटचाल कोणत्या दिशेने सुरू आहे असा प्रश्न पडतो.
आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे मराठीचे शिलेदार समूहातील काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य प्रशासक माननीय राहुल दादा पाटील यांनी दिलेला ‘बंदीशाळा’, विषय. खरेतर बंदीशाळा म्हणजे कारागृह, बंदीखाना, कैदखाना, तुरुंग, जेल. मानवी मनातील हव्यास, विकृती, यांमुळे घडणाऱ्या गुन्ह्यांना शिक्षा म्हणून या बंदीशाळा भरभरून वाहतात. क्षणिक रागावर नियंत्रण न ठेवल्याने घडणारे अनेक गुन्हे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतात. अशा या ‘बंदीशाळा’, विषयाला शिलेदारांनी जरा ‘जगाच्या पाठीवर’, या चित्रपटातील ‘जग हे बंदीशाळा….’, या अर्थानेच घेतले. मात्र हरकत नाही निसर्ग, स्त्रियांवरील अत्याचार, शाळा आणि विद्यार्थी अशा वेगवेगळ्या आशयाला काव्यात छान गुंफले…सर्वांचेच अभिनंदन आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह





