‘गावाकडची मैनाच खरी लक्ष्मी’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण

‘गावाकडची मैनाच खरी लक्ष्मी’; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
“माझी मैना गावाकडं राहिली,
माझ्या जीवाची होतीया काहिली”
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या छक्कड प्रकारच्या गीताची आज प्रकर्षानं आठवण झाली. पतीपत्नीतील विरह व्यथा डोळ्यात पाणी आणणारी. या लोकशाहिरांना मानाचा मुजरा!
आज दिपकला कामाला सुट्टी होती. तो खोलीत उदास बसला होता. त्याला त्याच्या बायकोची खूप आठवण येत होती. “आज चार महिने झाले मला मुंबईला येऊन, त्याच्या डोळ्यापुढे चित्रं सरकत होती. एखाद्या चित्रपटासारखी. सलग तीन वर्षे दुष्काळ पडला. त्याची गावाकडं पंचवीस एकर शेती होती. मोठी विहीर दावणीला चार पाच जनावरं. सुखानं रहात होता तो,सारजा त्याची पत्नी, दोन मुलं, आई बाप. पण तीन वर्षे दुष्काळ पडला. जमिनी उताण्या पडल्या. विहिरींनी तळ गाठला. काही पिकेना. होतं होईस्तोवर जवळ होतं नव्हतं ते विकून दिवस ढकललं. पण उद्याचं काय? हा यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी गोठ्यातील दोन जनावरं विकली आणि मुंबईच्या संतू मित्रा बरोबर तो मुंबईला आला.
सारजाला समजावलं. तिकडं घडी बसली कि तू, पोरं, आईबाबाला घेऊन जाईन म्हणाला. सारजा त्याच्या जीवाची सखी . तिनं मोठ्या मनानं त्याला धीर दिला. मी सर्वांची काळजी घेईन म्हणाली. त्याला भरल्या डोळ्यानं निरोप दिला. दिपकला संतूच्या ओळखीनं डबे पोचवायचे काम मिळालं. चार पैसे हाती यायला लागले. घरी मनिऑर्डर पाठवू लागला.पण दुरावा…..आज सुटी दिवशी बायको सारजा, पोरं आई बापाच्या आठवणीनं त्याला रडू यायला लागलं.
सध्याचं पर्यावरण असंतुलन, पावसाचा, निसर्गाचा लहरीपणा अतिवृष्टी, अनावृष्टी यामुळं शेती धोक्यात आली आहे. उपासमारीची वेळ आली आहे. कामधंदा शोधण्यासाठी शहराकडं तरुणवर्ग धाव घेत आहे. गावाकडं बायका पोरं, म्हातारी माणसं रहात आहेत. कारण सर्वांना घेऊन जाणं महागाईनं शक्य नाही. मग वीतभर पोटासाठी हमाली, कारखान्यात मिळेल ते काम करायचं. इकडं तो घरच्यांच्या काळजीने झुरतोयं, तर तिकडं बायको समर्थपणे डोळ्यातलं पाणी पुसत पोरं, सासू सासरे यांना जगवत आहे. तिच्या त्यागामुळंच तिचा नवरा मन घट्ट करून चार पैसे मिळवतोय.हा दीर्घ विरह या नवरा बायकोला जगण्याची ताकद देत आहे.
प्रसंगी पत्नी त्याचा खंबीर आधार बनत आहे. किती ही ताटातूट , किती दुरावा. केवळ आपल्या कुटुंबासाठी. ही घालमेल कधी थांबेल? निसर्गाला कधी दया येईल.? प्रदूषण वेळीच रोखलं नाही; तर यापेक्षाही बिकट काळ येईल आणि ही गावाकडची अवखळ मैना आपलं जगणं विसरून जाईल. खरंच ही गावाकडची मैनाच त्याची त्या मर्द गड्याची साजरी लक्ष्मी आहे. तिला पुन्हा सोन्याचे दिवस पहायला मिळोत ही इच्छा व्यक्त करते. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी ‘गावाकडची मैना’ हा काळजाला हात घालणारा विषय दिला. शिलेदारांनी पण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





