Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेविदर्भसाहित्यगंध

गाडी शिकायचं राहूनच गेलं

सौ. स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 9 4

गाडी शिकायचं राहूनच गेलं

‘गाडी शिकलेsss रे’ हा याआधीचा माझा लेख वाचून एका मैत्रिणीने सांगितलेला हा अनुभव. तो तिच्याच शब्दांत. शहरात राहत असल्याने तशी कुठे जाण्यायेण्याची अडचण नव्हती. रिक्षा, बस यांची सोय होतीच. तरीही तेव्हा काही महिलांना गाडी चालवताना पाहून वाटायला लागले आपणही गाडी शिकावे. ती इच्छा पतीस बोलून दाखवली. पतीनेही लगेच दुजोरा देत एक सेकंडहॅण्ड स्कूटी विकत घेतली. सुरूवातीला खूप हुरूप असतो तसा माझाही उत्साह ओसंडून वाहत होता. आज फक्त गाडी सुरू केली आणि बंद केली. नवऱ्याने गाडीवर एक चक्कर आणली. कशी चालवायची समजावून सांगितले. स्टार्ट कशी करायची, ब्रेक कसा धरायचा. ग्रीप कशी धरायची. एकेक गोष्ट लक्षात घेत होते. पण प्रत्यक्ष गाडीवर बसून फक्त गाडी चालू करून पाहिले. का कुणास ठाऊक मनात एक धाकधूक वाटत होती. दुसऱ्या दिवशी पती सोबत होतेच. गाडी स्टार्ट केली. हळूहळू पुढे घेऊ लागले, पण पाय मात्र वर उचलत नव्हते. नवऱ्याच्या अनेक सूचना.. पण डोक्यात घुसतील तर ना.!!

मनातली धाकधूक त्या सूचनांना कानापर्यंत पोहचूनच देत नव्हती. मी आपले पाय खाली ठेवूनच हळूहळू गाडी पुढे नेत होते. धत्त तेरे की.. अगं या स्पीडने तर चालणारी माणसं सुद्धा पुढं जातील. हळू का चालवेना पण पाय वर घे. पण माझे पाय काही वर यायचे नाव घेतच नव्हते. तिसऱ्या दिवशीही परिस्थिती जैसे थे. चौथा दिवस उजाडला. अजूनही तीच गत. आता मात्र नवरा वैतागला. पण मी मात्र थोडीफार आशा बाळगून होते. आठ दिवस गेले. नव्हे नव्याचे नऊ दिवस गेले. आता मात्र पतीचा संयम संपला आणि तुला गाडी शिकण्याची गरजच काय? मी आहेच ना ? राहू देत नाही आली तर काय होतंय. असं म्हणून माझीच समजूत काढली.

अशातच अचानक एक घटना घडली आणि माझा थोडा नूरच पालटला. त्यामुळे मला मनात आणखी भीती निर्माण झाली. त्याचं झालं असं की माझ्या लहान बहिणीचे सासरे स्कुटी वरून पडले व ब्रेन हॅमरेज झाला. त्यानंतर ते तीन वर्ष बेड वरच होते, कोणाला ओळखत नव्हते. पण मग माझी मात्र गाडी शिकण्याची उरली सुरली इच्छाही लुप्त झाली. शेवटी ती गाडी घरी अशीच गंजून जाण्यापेक्षा पतीने कंपनीतील एका कामगाराला देऊन टाकली. मग मात्र गाडी शिकण्याच्या इच्छेला पूर्णविराम देऊन टाकला. आता कधी चुकून जरी गाडी शिकण्याचा विषय निघाला तरी तेव्हाची गंमत आठवते आणि आम्हा दोघांनाही मिश्किल हसू येते. अजूनही गाडी शिकायचं राहूनच गेलं. अगदी खरंय परिस्थितीनुरूप माणूस धाडस करतो. तशी गरज नसल्याने व प्रवासाची कधी गैरसोय होत नसल्यानेही कदाचित असे झाले असावे.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे