भाऊ व बहिणीच्या प्रेमाचा सण… रक्षाबंधन
प्रशांत ठाकरे सिलवासा, दादरा नगर हवेली
भाऊ व बहिणीच्या प्रेमाचा सण… रक्षाबंधन
‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:|
यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|
अर्थात….ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान- सन्मान, सत्कार होतो. तेथे सुशील, गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही. हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न सण उत्सव याद्वारे केला जातो. असाच एक महत्त्वाचा श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय.
बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं होय. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय.
तसं पाहता आजच्या स्वार्थी युगात भूक आणि स्वार्थी यांनी पछाडलेल्या जगाच्या सर्व नात्यांमध्ये संबंधांमध्ये केवळ निस्वार्थ व पवित्र नातं म्हणजे भावा बहिणीचं खरं प्रेम.या प्रेमाची तुलना करताना समुद्रामध्ये खाऱ्या पाण्यात सापडलेल्या एखाद्या गोड पाण्याच्या साठ्यासारखा हा भाव होय.
रक्षाबंधनाचा उत्सव म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण .बहिणीने हातात राखी बांधताच भाऊ तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवरती घेतो. त्यामुळेच बहीण समाजात निर्भय बनून फिरू शकते.आजच्या या युगात कित्येक बहिणी या सुरक्षित नाहीत, अनेक अत्याचाराच्या गोष्टी आपण रोजच पाहत असतो.अशा वेळी भारतीय संस्कृतीमधील श्री दक्षिण्य काय आहे हे समजून सांगण्याची आजच्या पिढीला खऱ्या अर्थाने गरज आहे आणि यासाठी रक्षाबंधन सारखे सण साजरा करणे हे संस्कृती संवर्धनात उचललेले अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. तसे पाहता भावाच्या हाताला राखी बांधून बहीण त्याच्यापासून केवळ स्वतःच रक्षण इच्छिते असे नाही तर समस्त स्त्री जातीला स्वतःच्या भावाचे रक्षण मिळावे अशी इच्छाही व्यक्त करते. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाचे औक्षण करणे हे औक्षण म्हणजे केवळ भावाच्या कपाळाची पूजा नव्हे तर भावाचे विचार व बुद्धी यावरील विश्वासाचं यथार्थ दर्शन आहे.
राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे. ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लीत होते. भलेही काळ बदलला असेल, साजरा करण्याचे स्वरूप ही बदलली असेल; परंतु सणाच्या मागची जी भावना आहे ती भावना मात्र आजही तशीच आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. संस्कृती पूजन या पुस्तकात रक्षाबंधन या सणाचे महत्त्व सांगत असताना म्हटले आहे की ….रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने घेतलेली बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी. रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या विशुद्ध प्रेमाचा अस्खलित वाहणारा झरा.भाऊ व बहीण परस्पर प्रेरक, पोषक व पूरक आहेत हा संदेश देणारा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे.
प्रशांत ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
======



