न्यु मून कनिष्ठ महाविद्यालयात विशेष पालक शिक्षक सभेचे आयोजन
विवेक ओळखण्याचं बुद्धीसामर्थ मुलांकडे असलं पाहिजे
न्यु मून कनिष्ठ महाविद्यालयात विशेष पालक शिक्षक सभेचे आयोजन
विवेक ओळखण्याचं बुद्धीसामर्थ मुलांकडे असलं पाहिजे
तारका रूखमोडे, जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अर्जुनी /मोरगाव: बाह्य जगातील चांगलं वाईट असा विवेक ओळखण्याचं बुद्धीसामर्थ मुलांकडे असलं पाहिजे. त्यासाठी पालकांनी मित्र बनून तथा शिक्षकांनी मार्गदर्शक बनून या नाजूक टप्प्यावर त्याला योग्य दिशा दाखविली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या या नाजूक वळणावरील काही विषय मोकळेपणाने पालकांसमोर मांडण्यासाठी, तथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, पालकांशी सुसंवाद साधण्यासाठी व शैक्षणिक वाटचालीत येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा करण्यासाठी नुकतेच न्यू मून कनिष्ठ महाविद्यालयात विशेष शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्जन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक ध्येय असते.हे ध्येय साध्य करत असताना विद्यार्थ्यांच्या ध्येय साध्य प्राप्तीच्या प्रवासात स्वयंशिस्त,वेळ व्यवस्थापन, प्रभावी संप्रेषण,अभ्यास यासोबतच वैयक्तिक आन्तर-बाह्य तनमन परिवर्तने, कुतूहलता, गंभीर विचार, समवयस्कांचा सकारात्मक, नकारात्मक प्रभाव यासारखे गुण विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असतात. हे गुण विकसित होत असताना विद्यार्थी केवळ शैक्षणिकतेवर मार्गक्रमण करत नाही तर गतिमान जगाच्या आव्हानासाठी स्वतःला तयार करत असताना अनेक रुपातील जडणघडणीला त्याला सामोरे जावे लागते. त्याच्या जीवनातील हा नाजूक टर्निंग पॉईंट असतो.
शाळेचे सहसचिव ओमप्रकाशसिंह पवार, प्राचार्य राकेश उंदीरवाडे, पर्यवेक्षिका तारका रुखमोडे यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली.या सभेला पालक शिक्षक सभेच्या सहसचिव पुष्पा खोब्रागडे तथा सर्व सदस्य व पालक उपस्थित होते.
सदर पालक सभेत सभेची रुपरेषा ,उद्देश ,विविध सहशालेय उपक्रम ,शालेय शिस्त ,स्पर्धा परीक्षा, शालेय परीक्षा या संदर्भात प्रास्ताविकेतून तारका रुखमोडे यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.तसेच स्नेहसंमेलन व सहलीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. प्राचार्यांनी पालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची जबाबदारी जेवढी शिक्षकांची आहे तेवढीच पालक व विद्यार्थ्यांचीही आहे,पालकांनी आपल्या पाल्याच्या विशेषतः आंतरिक आणि बाह्य वर्तवणुकीकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगितले.पालकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. पालकांनीही याप्रसंगी विचार व्यक्त केले.
सचिव ओमप्रकाशसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याचे प्रयत्न करण्यात येतील तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.विविध स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमांच्या अनेक सुवर्णसंधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तारका रुखमोडे यांनी केले.सुरज मोटघरे यांनी आभार मानले. सभेच्या आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले .अशा प्रकारे पालक शिक्षक सभा शांततेने व सुरळीत पार पडली.



