Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसंपादकीयसांगलीसाहित्यगंध

“आकाशात चंद्र असूनही चांदणे पडलेच नाही”; वृंदा करमरकर

सोमवारीय 'काव्यत्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण

0 6 3 0 0 2

“आकाशात चंद्र असूनही चांदणे पडलेच नाही”; वृंदा करमरकर

सोमवारीय ‘काव्यत्रिवेणी’ स्पर्धेचे परीक्षण

‘चांदणे’ म्हणजे केवळ चंद्राकडून पृथ्वीवर पडणारा शीतल प्रकाश नव्हे; तर मनाला प्रसन्न करणारी अनुभूती, नात्यांमधील प्रेमाचा ओलावा आणि जीवनाला दिशा देणारी आशाही होय. आकाशातील चांदणे निसर्गाला सुंदर बनवते, तर माणुसकीचे चांदणे जीवन समृद्ध करते. परंतु आजच्या आधुनिक युगात भौतिक प्रगतीचा झगमगाट वाढत असताना निसर्गाचे सौंदर्य, नात्यांतील जिव्हाळा आणि मानवी मूल्ये हरवत चालली आहेत. अशा वेळी मनात प्रश्न निर्माण होतो, ‘चांदणे पडलेच नाही’!

शरद ऋतूतील कोजागिरी पौर्णिमा म्हणजे निसर्गाने पृथ्वीवर विधात्याने पसरवलेला चंदेरी उत्सव! निरभ्र आकाशात पूर्णचंद्र एखाद्या तेजस्वी रजत बिंबाप्रमाणे खुलतो. त्याच्या दुधाळ प्रकाशाने अवघे आसमंत न्हाऊन निघते.. मंद वाऱ्याच्या स्पर्शासह चंद्रप्रकाशात न्हालेली रात्र मनाला विलक्षण प्रसन्नता देते. नातेवाईक, मित्रमैत्रिणी एकत्र येऊन गप्पागोष्टी करतात, हास्यविनोद रंगतात आणि केशरयुक्त दुधाचा आस्वाद घेत रात्र जागवतात. चंद्राच्या साक्षीने फुलणारा हा आनंद नात्यांमध्ये आपुलकीचे चांदणे पसरवतो. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात असे क्षण अनुभवण्यासाठीही माणसाकडे वेळ नसतो.

औद्योगिकीकरण, वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि प्रदूषण यांमुळे निसर्गाचा समतोल बिघडत आहे. धुरक्याने झाकलेले आकाश आणि कृत्रिम प्रकाशाचा वाढता झगमगाट यांमुळे चंद्र-ताऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य अनेक ठिकाणी झाकोळले जाते. विकासाच्या वाटेवर चालताना निसर्गाचे संवर्धन करण्याचे भान आपण हरवून बसलो आहोत. कधी उन्हाळ्यात लपलेला सूर्य, रात्री चंद्र चांदण्याचे हरवत चाललेले सौंदर्य निसर्गाची हानी हेच चित्र दिसते.

निसर्गाप्रमाणेच मानवी नात्यांमधील चांदणेही हरवत चालले आहे. माणूस पैशामागे रात्रंदिवस धावत आहे, आभासी दुनियेत गुंतला आहे.संवादाची अनेक साधने हाताशी असूनही मनमोकळ्या संवादाचा अभाव जाणवतो. स्वार्थ, अपेक्षा आणि अहंकार यांमुळे आपसातील, नात्यांतील प्रेम, विश्वास आणि आपुलकी कमी होत आहे. घरात दिव्यांचा लखलखाट असतो; पण मनामनांत एकटेपणाचा अंधार दाटलेला असतो. समाजात विषमता, अन्याय आणि असंवेदन शीलता वाढत असेल, तर प्रगतीचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचलेला नाही, हेच स्पष्ट होते.

‘चांदणे पडलेच नाही’ हे शीर्षक आत्मपरीक्षण करायला प्रवृत्त करते. निसर्गाचे सौंदर्य जपणे, नात्यांतील जिव्हाळा वाढवणे आणि माणुसकीची मूल्ये जोपासणे ही काळाची गरज आहे. समाधान नसेल, नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा नसेल आणि मनात माणुसकीचा प्रकाश नसेल, तर आकाशात चंद्र असूनही चांदणे पडलेच नाही, असे म्हणावे लागेल! आज आदरणीय राहुल सरांनी कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेसाठी दिलेला विषय आत्मभान जागृत करणारा आहे. सरांना इतके वैविध्यपूर्ण, अभ्यास करायला लावणारे विषय सुचतात त्याबद्ल त्यांचे कौतुक करावेसे वाटते.शिलेदारांनी छान प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! सरांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!

वृंदा (चित्रा) करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 0 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे