बाली इंडोनिशिया ट्रिप’; भाग २
वसुधा वैभव नाईक
‘बाली इंडोनिशिया ट्रिप’; भाग २
दि. १. ०४. २०२५ ‘बाली’मधील स्थळ पाहण्याचा पहिलाच दिवस. रिसाटा रिसॉर्टवर नाश्ता केला. नाश्त्यामध्ये विविध पदार्थ समाविष्ट होते. इंडोनेशियन फूड होते. फ्रुट्स होते. इंडियन फूड होते. नाष्टा केला काही फोटो काढले. मस्त फ्रेश मूड होता. ठीक साडे आठ वाजता तेथील गाडी आली. गाईड आश्ताफा तयार होताच. अडाम ड्रायव्हरने सर्वांना पाण्याच्या बाटल्या दिल्या. गाईडने थोडी माहिती दिली. आम्ही सर्व गाडीत बसलो. आणि गाडी पुढील प्रवासासाठी निघाली. आम्ही ‘डॉल्फिन बीचवर’ पोहोचलो. अथांग समुद्र, अवखळ लाटा, पर्यटकांची गर्दी, पोशाखातील वैविध्य मी हे सारे शांत बसून निरीक्षण करत होते. आमच्या गाईडने आम्हाला सूचना दिल्या.
आमच्या ट्रीपमध्ये समुद्र सफारीतील कोणती राईड ठरली आहे हे समजावून सांगितले. पण आम्ही दुसरी राइड पॅरारायडिंग घेतले. आमच्या अकरा जणांमध्ये सहा जण आम्ही पॅरारायडिंग करायला गेलो. आज वयाला 58 वर्षे पूर्ण झाली. समोर हे रायडिंग बघितलं तरी सुद्धा भीती वाटते. समुद्रातील कोणतेही गेम पाहताना अंगावर काटा येतो. दडपण येते, भीती वाटते. पण एक मनाशी एक ठरवले की, जीवनात आलो आहे तर हा ही अनुभव घेऊन बघूया. मस्त आहे सर्व विचार करून बोटीत चढलो. बोटीपर्यंत जाताना सुद्धा धडधड धडधड होत होती. पण मनाशी ठाम निश्चय होते.
जीवनातला पहिला अनुभव रायडींगचा घेतला. हवेत उंच उडाले. समुद्रात कमरेपर्यंत खोल गेले. पण मनात ना भीती ना दडपण. कारण माझी काळजी घेण्यासाठी माझे अनुताई आणि जिजा तिथे होते. यावेळी मात्र एक समजले की, मन तयार असेल, तर आपण कोणतीही राईड करू शकतो. नंतर आम्ही बोटीतूनच ‘टरटाईल आयलंडला’ गेलो. तिथे प्राणी, पक्षी पाहण्यासाठी होते. घोट्यापर्यंत पाण्यातून चालावे लागत होते. अजगर,कासव, काका कुवा, घोरपड, सरडा असे विविध,वेगवेगळे प्राणी पाहिले. अजगराला अगदी हात लावून पाहिला. पक्षी करत होता तसं करत होतो. आनंद घेत होतो. लहानपण परत जगून घेतलं. खूप मोठी कासवं बघितली. पांढर कासव सुद्धा पाहिले. कासवाची २०० अंडी पाहिली. हे सर्व प्रत्यक्ष अनुभव घेताना अचंबित झालो. व्हिडिओ शूटिंग झाले. खूप फोटो काढले. मस्त मजा आली. नंतर आम्ही ‘डॉल्फिन बीच’ सोडला.’दिल्ली ‘ नावाच्या इंडियन हॉटेलमध्ये मस्त इंडियन जेवण केले. व पुढील प्रवासासाठी निघालो.
बालीचे प्रसिद्ध मंदिर ‘उलू वाटू ‘ या ठिकाणी पोहोचलो. जाताना आमच्या गाईडने आम्हाला त्या मंदिराची माहिती दिली होती. तिथे खूप माकड आहे आणि ही माकडं त्रासदायक आहेत हेही सांगितले होते. ही माकडे चष्मा, मोबाईल पळवतात हे सांगितले होते. जाता,जाता रस्ते कोणते आहे त्याची माहिती ते देत होते. बाली मध्ये कोणते ठिकाण प्रसिद्ध आहेत,का प्रसिद्ध आहेत? याची माहिती देत होते. आम्ही ‘उलु वाटू’ मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताना देवतांचा आदर करण्यासाठी तिथे लुंगीचा वापर करतात. आम्ही प्रत्येकाने लुंगी घातली.
मंदिर एवढे अवाढव्य आणि सुरेख होते की डोळ्याचे पारणे फिटले. समुद्र काठावर डोंगरावर वसलेले हे मंदिर अप्रतिम होते. तिथे आपल्याला दैवतांच्या मूर्ती पाहायला मिळत नाहीत. फक्त ब्राह्मण लोकांना तिथे प्रवेश असतो. पण मंदिराचे बांधकाम आणि त्या आजूबाजूला असलेला बाग -बगीचा नयनरम्य होता. ‘उलु म्हणजे उप्पर व वाटू म्हणजे रॉक’. मंदिराची बांधणी, बगीचा डोळ्यात आणि हृदयात साठवून ठेवला. फोटोत आठवणी जागृत ठेवल्या. मंदिरात जाताना एक गंमत झाली. आमच्या अनुताईचा गॉगल माकडाने घेतला. मग सगळे सावध झाले आणि पटापट गॉगल आणि मोबाईल लपवून ठेवले. गॉगल घेतलेला माकड मात्र ऐटीत गॉगल डोळ्यावर घालत होते. हे दृश्य पहायला मजा वाटत होती. नंतर आम्ही Benava बीचला भेट दिली. रात्री परत येताना इंडियन फूड टेस्ट केले. नंतर रिसाटा रिसॉर्टवर पोहोचलो. बालीतील पहिला पर्यटन दिन अविस्मरणीय होता.
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
=======



