Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसंपादकीयसाहित्यगंध

‘आहोत सोबत.. आयुष्याच्या सांजवेळीही मग जगणं वाटतंय वसंत’; स्वाती मराडे

गुरूवारीय चित्रचारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 4

‘आहोत सोबत.. आयुष्याच्या सांजवेळीही मग जगणं वाटतंय वसंत’; स्वाती मराडे

‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘तुझी सोबत होती जणू उन्हात चांदणे. ऊन जीवघेणे असतानाही मोगऱ्याचे गंधाळणे’. सप्तसुरांची वाटायची मैफल तुझे बोलणे. तू भासायची जणू पहाटवाऱ्यातील दवबिंदूंचा सडा, अन् सांजवेळी स्वागता भासे चांदणचुरा. तुझे डोळे माझा आरसा झालेले. तुला काय हवे ते मी तव नयनात वाचलेले. शब्दांचीही गरज नव्हती मनातलं कळायला. यापेक्षा वेगळं काय लागतं प्रेमात भाळायला. कळलेच नाही मन माझे, कधी होऊन गेले तुझे.. वाहून गेले तू मी पण.. उरले ना कुठे दुजेपण.. एकचि जाहलो दोघे आपण..! किती फुलपंखी दिवस होते. दिवस कसा भुर्रकन संपायचा ते कळतच नसायचं. तुझा चेहरा पाहून दिवसाची सुरुवात व्हायची नि पुन्हा तुझ्या बाहुपाशात विसावत संपायची.

कधी कधी वाटतं खरंच ते सत्य होते की स्वप्न.? सत्यच होते ते स्वप्नवत वाटणारे. पण हळूहळू ते सगळं बदलत गेलं. प्रेम कमी झालं असं नाही; पण जबाबदारी व कर्तव्याच्या ओझ्यात कुठेतरी हरवले हे मात्र नक्की. तू सोबत होतीस. पण तुझा घरातला वावर होता तो सून होऊन कर्तव्य पार पाडणारा किंवा मग मुलांची आई किंवा कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणारा. तूच नव्हे तर मीही हरवत गेलो, अमुकतमुक कमवायच्या नादात तू माझ्यासाठी कधी गृहित झालीस हे मलाही कळले नाही. तेव्हाही होतीसच तू सोबत. दगदग झालेल्या माझ्या मनाला शांतवणारी पावसाची सर होऊन. किनाऱ्यास लाटेने बिलगत मायेचा ओलावा देऊन जावे, तसे तू तुझी चांदण ओंजळ रिकामी करत शीतल चांदणे पेरणारी चांदणी होऊन.

आज आयुष्याच्या सांजवेळी पुन्हा मागे वळून पाहताना सगळा प्रवास आठवला. किती सुरेख होती ना आपल्या सहजीवनाची सुरुवात. तू मी करता करता आपण दोघे.. एक झालो. तेव्हाही आणि आताही आहोत आपण सोबत. पाखरं उडाली घरटी रिकामी झाली, शिशिर उभा ठाकलाय समोर. पिकले पान कधीही गळून पडेल. पण आपण दोघे आहोत सोबत त्यामुळे अजूनही जीवन वाटतंय वसंत. आता मनात कुठलीच उरली ना खंत.. उरली ना खंत.

सांजवेळी निवांत क्षण अनुभवत बसलेले जोडपे असणारे चित्र आज ‘गुरूवारीय चित्रचारोळी’ स्पर्धेसाठी आले.‌ ‘आपण दोघे’ हे शीर्षक घेऊन. सहजीवनातील सोबती आयुष्य अस्ताकडे मार्गक्रमण करत असतानाही सोबत असणे यासारखे भाग्य ते कुठले‌. पूर्वी जगायचे राहिलेले क्षण पुन्हा अलगद हातात यावेत व पुन्हा नव्याने जगून घ्यावे आपण दोघे. हातात हात घेऊन सांज पहात सुखद क्षणांना वेचावे आपण दोघे. आज आशयघन रचनांची सुरेख मांडणी समूहात पहायला मिळाली. आयुष्य सरतानाही प्रेमानुभूती मिळत असेल तर जीवनप्रवास अगदी हवाहवासा वाटतो.

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. असेच वाटत राहते. याचा प्रत्यय आज वैविध्यपूर्ण रचनांमधून व शब्दवैभवातून आला‌. आपण सर्वजण आशयघन लिहित आहात याचा मनोमन आनंद झाला. असेच लिहीत रहा या शुभेच्छांसह सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. “चला सात मे रोजी संभाजीनगर येथील काव्यसंग्रह प्रकाशन, काव्यवाचन स्पर्धा यात आपण सर्वजण सहभागी होऊ या”. माय मराठी सक्षमीकरणास हातभार लावूया. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार…!

सौ स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/सहप्रशासक/लेखिका/कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे