अलिबाग शहरात आगरी समाज संस्थेतर्फे कनकेश्वरात स्वच्छता मोहीम
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
अलिबाग शहरात आगरी समाज संस्थेतर्फे कनकेश्वरात स्वच्छता मोहीम
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग : कोणतेही पूर्वनियोजन नाही, कोणतीही मोठी तयारी नाही आणि कोणताही मुहूर्त नाही… केवळ मनात आलेली चांगली कल्पना आणि ती तत्काळ कृतीत आणण्याची इच्छाशक्ती या जोरावर आगरी समाज संस्था, अलिबागतर्फे रविवारी कनकेश्वर येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या या छोट्याशा उपक्रमाला पुढे भाविक आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने मोहिमेला अनपेक्षितपणे व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
आगरी समाज संस्थेच्या कार्यालयात शनिवारी सायंकाळी काही कार्यकर्ते चर्चा करीत असताना श्री. उदय म्हात्रे, सरपंच, ग्रामपंचायत नारंगी यांनी अचानक “उद्या कनकेश्वरला जाऊ या का?” अशी सूचना केली. उपस्थितांनी त्याला तत्काळ संमती दिली. त्यानंतर श्री. प्रभाकर ठाकूर यांनी कनकेश्वर येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची कल्पना मांडली. कोणतीही पूर्वतयारी नसताना ही कल्पना लगेच प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
रविवारी सकाळी ६ वाजता श्री निलेश पाटील, श्री. मनोहर पाटील, श्री. शशिकांत मिठाग्री, श्री. अंकुश पाटील, श्री. उदय म्हात्रे, श्री. प्रभाकर ठाकूर, श्री. तुषार थळे यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते विद्यानगर येथून कनकेश्वरकडे रवाना झाले. मंदिरात श्री कनकेश्वराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतल्यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. काही वेळातच प्लास्टिक कचऱ्याने पिशव्या भरू लागल्या. एकूण दहा मोठ्या पिशव्या प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
स्वच्छता मोहीम सुरू असताना कनकेश्वर येथे येणारे भाविक व पर्यटक या उपक्रमाकडे कुतूहलाने आणि कौतुकाने पाहत होते. काहीनी सुरुवातीला चेष्टेने पाहिले; मात्र संस्थेचे कार्यकर्ते सातत्याने स्वच्छता करत असल्याचे पाहून अनेकांनी स्वतःहून या मोहिमेत सहभाग घेतला.
उदाहरण द्यायचे तर, पेझारी येथील कु. हर्षल पाटील हा IT Engineer युवक कार्यकर्त्यांना भेटला. मुंबई येथे नोकरी करणाऱ्या हर्षलने संस्थेच्या कार्यकर्त्यांचा उपक्रम पाहून स्वतःहून स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. काही वेळातच तो या मोहिमेचा प्रमुख स्वयंसेवक बनला. त्यानंतर भेटणारे अनेक भाविक व पर्यटकही या उपक्रमात सहभागी झाले.
“चांगल्या कामासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. मनात चांगली कल्पना आली की ती तत्काळ कृतीत आणली पाहिजे. सामाजिक काम केवळ बोलण्यातून नव्हे, तर कृतीतून लोकांच्या मनाला स्पर्श करते आणि त्यातून इतरांमध्येही प्रेरणा निर्माण होते,” अशी भावना या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली.
“Minds Ignite करावी लागतात आणि ती केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या कृतीतून करावी लागतात,” याची प्रचिती या मोहिमेत आल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
मोहिमेदरम्यान अनेक भाविकांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करत “पुढील रविवारीही येणार का?” अशी विचारणा केली. भाविकांचा हा प्रतिसाद पाहता तसेच श्रावण सुरू असल्याने आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने, भाविकांना स्वच्छ कनकेश्वरचा अनुभव घेता यावा म्हणून आगरी समाज संस्थेने पुढील रविवारीही कनकेश्वर येथे स्वच्छता मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश पाटील यांनी समाजबांधव, युवक, भाविक आणि पर्यावरणप्रेमींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रविवार, दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता कनकेश्वरच्या पायथ्याशी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ९५२७३ ०८१३३ / ९८५०२ ९७५९९ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.
आज काही जणांनी सुरू केलेल्या या उपक्रमात भविष्यात शेकडो नागरिक सहभागी होतील, असा विश्वास आगरी समाज संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.



