अशी एक दिवाळी…
दिपांजली दीपाबेन रामदास शिंपी जिल्हा नवसारी गुजरात

अशी एक दिवाळी…
दिव्यांच्या प्रकाशात उजळावी मने,
प्रेमाच्या सुगंधाने दरवळावे अंगणे,
रुसवे-फुगवे सारे विसरून जावे,
माणसाने माणसाला आपले मानावे,
अशी एक दिवाळी यावी…
जीवनात आनंदाची पहाट फुलवावी!
नकोत सोन्या-चांदीचे झगमगते साज,
नकोत दिखाव्याचे उत्सवी नखरे आज,
भुकेल्याच्या मुखी घास भरवावा,
अश्रू पुसून चेहऱ्यावर हसू फुलवावे,
अशी एक दिवाळी यावी…
माणुसकीचा दीप घरोघरी लावावी!
नात्यांमधले अंतर क्षणात मिटावे,
मनामनांत आपुलकीचे फूल उमलावे,
वृद्धांच्या डोळ्यांत समाधान दिसावे,
लेकरांच्या ओठांवर हास्य खुलावे,
अशी एक दिवाळी यावी…
प्रेमाने प्रत्येक घर उजळून जावे!
नकोत प्रदूषणाचे धूर अन् फटाके,
निसर्गाच्या कुशीत फुलू दे आनंदाचे तडके,
पाखरांच्या गाण्यांनी आसमंत निनादावा,
हिरव्या वसुंधरेने आनंदाने सजावा,
अशी एक दिवाळी यावी…
निसर्गाशी मैत्रीचा संकल्प करावी!
अंधारलेल्या आयुष्यात आशेचा दीप पेटावा,
हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा नवा ध्यास मिळावा,
दुःख विसरून प्रत्येक जीव हसावा,
सुख-शांतीचा वर्षाव जगावर व्हावा,
अशी एक दिवाळी यावी…
जिथे माणसातला माणूस पुन्हा जागाव!
दिपांजली
दीपाबेन रामदास शिंपी
जिल्हा नवसारी गुजरात



