Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरनाशिकपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“स्वतःच्या प्रगतीचा आलेख उंचावताना दुसऱ्याच्या स्वप्नांनाही बळ देणे हीच यशाची व्याख्या”; प्रशांत ठाकरे

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

0 6 3 3 8 8

“स्वतःच्या प्रगतीचा आलेख उंचावताना दुसऱ्याच्या स्वप्नांनाही बळ देणे हीच यशाची व्याख्या”; प्रशांत ठाकरे

  • शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

“यश म्हणजे केवळ स्वप्नांच्या शिखरावर आरूढ होणे नव्हे, तर संघर्षांच्या अग्निदिव्यातून तावूनसुलाखून निघताना स्वतःच्या अस्तित्वाचे सोने करून घेणे होय!” मानवी जीवनाच्या अथांग प्रवाहात प्रत्येक माणूस आपल्या स्वप्नांची एक स्वतंत्र नौका घेऊन मार्गक्रमण करीत असतो. कुणाच्या डोळ्यांत महत्त्वाकांक्षेची असंख्य क्षितिजे असतात, तर कुणाच्या हृदयात परिस्थितीच्या शृंखला तोडून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची दुर्दम्य आकांक्षा असते. या प्रवासात प्रत्येकाला एक प्रश्न कधी ना कधी अंतर्मुख करतो…..यश म्हणजे नेमके काय? संपत्तीच्या राशी, पदप्रतिष्ठेचा झगमगाट, प्रसिद्धीचा प्रचंड वलयांकित परीघ की स्वतःच्या कर्तृत्वावर उमटलेली समाधानाची स्वाक्षरी?

खरे तर यशाची व्याख्या शब्दांच्या चौकटीत बंदिस्त करता येत नाही. कारण यशाचे परिमाण प्रत्येकासाठी निराळे असते. कुणासाठी गगनचुंबी इमारती उभारणे म्हणजे यश असते, तर कुणासाठी आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात सुखाचे चार क्षण फुलवणे हीच सर्वोच्च उपलब्धी असते. कुणासाठी सत्तेच्या सर्वोच्च सिंहासनावर विराजमान होणे यश असते, तर कुणासाठी निराधाराच्या डोळ्यांतील अश्रू पुसून त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हीच जीवनाची इतिकर्तव्यता असते.

यश ही केवळ प्राप्ती नसते, ती संघर्षातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाची प्रगल्भ अभिव्यक्ती असते. प्रतिकूलतेच्या काळ्याकुट्ट मेघांनी आकाश व्यापले असतानाही आशेचा सूर्य मनात जिवंत ठेवणे, अपयशाच्या वादळांनी स्वप्नांची पालवी छाटली तरी पुन्हा नव्या उमेदीने अंकुरणे आणि परिस्थितीच्या कठोर शिळेवर जिद्दीची छिन्नी चालवून स्वतःचे भविष्य कोरणे, यालाच खऱ्या अर्थाने यश म्हणतात.

इतिहासाच्या विशाल पटावर अजरामर ठरलेली व्यक्तिमत्त्वे ही केवळ त्यांच्या पदांमुळे मोठी झालेली नाहीत, तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीशी दिलेल्या निकराच्या झुंजीमुळे त्यांचे कर्तृत्व कालातीत झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या तेजाने विषमतेच्या अंधकाराला आव्हान दिले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी सामान्य परिस्थितीतून असामान्य स्वप्नांची भरारी घेतली. या व्यक्तिमत्त्वांचे जीवनचरित्र एकच सत्य अधोरेखित करते. माणसाची उंची त्याच्या जन्मपरिस्थितीने नव्हे, तर त्याच्या विचारांची झेप आणि कर्तृत्वाची उंची ठरवत असते.

मात्र, यशाच्या या झगमगत्या प्रवासात माणूस अनेकदा एका अदृश्य मृगजळाच्या मागे धावत असतो. अधिक संपत्ती, अधिक प्रतिष्ठा, अधिक प्रसिद्धी आणि अधिक अधिकार यांच्या हव्यासापोटी तो स्वतःच्या अंतरंगातील समाधानाचा झरा आटवून टाकतो. इतरांना मागे टाकण्याच्या स्पर्धेत स्वतःमधील माणूसपणच हरवून बसतो. अशा वेळी एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो.जग जिंकण्याच्या ध्यासात स्वतःचे मन हरवले, तर त्या विजयाला अर्थ तरी काय?

ज्या यशाच्या पायाभरणीत माणुसकीचा बळी दिला जातो, त्या यशाच्या कळसावर समाधानाचा ध्वज कधीच फडकू शकत नाही. कारण वैभवाने माणसाचे घर सजते,परंतु संवेदनशीलतेने त्याचे जीवन समृद्ध होते. पदामुळे अधिकार प्राप्त होतात,परंतु सद्वर्तनामुळे आदर संपादन करता येतो. प्रसिद्धीमुळे गर्दी जमते,परंतु माणुसकीमुळे मने जोडली जातात.

यशस्वी होणे आणि सार्थक जीवन जगणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. स्वतःच्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालणारा माणूस यशस्वी असतो, परंतु आपल्या उंचीची सावली इतरांच्या वाट्याला येऊ नये याची काळजी घेणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा असतो. स्वतःच्या प्रगतीचा आलेख उंचावताना दुसऱ्याच्या स्वप्नांनाही बळ देणे, स्वतःच्या अनुभवांचे संचित नव्या पिढीला बहाल करणे आणि समाजाच्या परिवर्तनासाठी आपल्या कर्तृत्वाचा विनियोग करणे, ही यशाची सर्वाधिक उदात्त अवस्था आहे.

वास्तविक, यश म्हणजे अपयशाचा अभाव नव्हे, तर अपयशातून उभे राहण्याचे सामर्थ्य होय. यश म्हणजे इतरांशी केलेली स्पर्धा नव्हे, तर कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक समृद्ध, विवेकी आणि कर्तृत्ववान होण्याची अखंड धडपड होय. यश म्हणजे टाळ्यांचा कडकडाट नव्हे, तर आपल्या कार्यामुळे एखाद्याच्या अंतःकरणात निर्माण झालेली कृतज्ञतेची भावना होय. शेवटी, यश हे एखादे अंतिम मुक्कामाचे ठिकाण नसून स्वतःला अधिकाधिक समृद्ध करीत राहण्याची अखंड जीवनयात्रा आहे. त्या यात्रेत स्वप्नांना जिद्दीची जोड, कष्टांना प्रामाणिकपणाची किनार, कर्तृत्वाला विवेकाची बैठक आणि यशाला माणुसकीचा सुगंध लाभला, तरच जीवनाचे खरे सार्थक होते.
कारण यशाची उंची गाठणे ही कर्तृत्वाची कमाल असते,पण त्या उंचीवर पोहोचूनही विनम्रतेची भूमी न सोडणे, ही व्यक्तिमत्त्वाची महानता असते!

शिखरे सर केली म्हणून माणूस मोठा होत नसतो, तर त्या शिखरावरून किती जणांना उभे राहण्याचे बळ दिले, यावर त्याच्या यशाचे खरे मोल ठरत असते! ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे यशोमूर्ती आदरणीय राहुल सरांनी आज ‘शनिवारय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी “यशाची व्याख्या”करण्याचे आव्हान सर्वांपुढे ठेवले. सर्वांनी खूप मस्त प्रयत्न केला. सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.
मनस्वी धन्यवाद.

प्रशांत दत्तात्रेय ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/लेखक/समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 8 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे