मुंबई विद्यापीठाची ‘स्वर्गीय डॉ. शर्वरी प्रिया रविंद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती’ जाहीर
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

मुंबई विद्यापीठाची ‘स्वर्गीय डॉ. शर्वरी प्रिया रविंद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती’ जाहीर
अलिबागच्या जे.एस.एम. महाविद्यालयाची विद्यार्थिनी संयोगी नाईक पहिली मानकरी
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
अलिबाग (दि १४): मुंबई विद्यापीठाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पात्र, गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थीनींसाठी सुरू केलेली ‘स्वर्गीय डॉ. शर्वरी प्रिया रविंद्र कुलकर्णी शिष्यवृत्ती’ या वर्षी जाहीर करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी शिष्यवृत्तीच्या पहिल्याच वर्षी, अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयाची एम. ए. मराठी या वर्गातील विद्यार्थिनी संयोगी राजश्री राजेंद्र नाईक हिला हा शिष्यवृत्ती मिळवण्याचा बहुमान मिळाला आहे.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर विविध परीक्षांमध्ये केलेली उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी, तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS), सांस्कृतिक कार्यक्रमांचा युवा महोत्सव यांसारख्या विविध अभ्यासपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि उत्तम कामगिरी या निकषांवर आधारित केलेल्या मूल्यांकनात संयोगी नाईक हिची संपूर्ण मुंबई विद्यापीठातून निवड करण्यात आली आहे.
आज शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात शिष्यवृत्ती प्रदान सोहळा संपन्न झाला. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष प्रा. (डॉ.) भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर सुनील पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संयोगी नाईक हिला रोख रक्कम १००००/-, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र या स्वरूपात ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्राचार्य डाॅ. सोनाली पाटील, प्रा. जयेश म्हात्रे व पालकांसमवेत संयोगी हिने हा बहुमान स्वीकारला.
संयोगी नाईक हिने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतमभाई पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, सेक्रेटरी श्री. गौरव पाटील, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या शिष्यवृत्तीमुळे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गरजू व गुणवंत विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठी मदत होणार आहे.





