‘अंधारलेली ती’ ज्ञानरूपी ज्योतीच्या प्रकाशात उजळते तेव्हा…: स्वाती मराडे
गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

‘अंधारलेली ती’ ज्ञानरूपी ज्योतीच्या प्रकाशात उजळते तेव्हा…: स्वाती मराडे
गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
तसं तर तिचं आयुष्य अनेक अडथळ्यांनी भरलेलं होतं. रूढी परंपरांचा पगडा, शारीरिक शक्तीने अबला, आत्मविश्वासाचा अभाव, समाजाची मानसिकता… अनेक कारणांनी ती दुर्लक्षितच राहिली. तिने आपले विश्वच ‘चूल आणि मूल’ असे मर्यादित केले. कधी बाहेर पडायचं म्हटलं, तर होताच उंबरठा अडवायला अन् चुकून बाहेर पडलेच तर डोईवर पदर होताच तोंड दडवायला. त्या उंबरठ्यावर पाऊल अडखळले नि त्या पदराआड तिच्या मनातील घालमेल तिने लपवून ठेवली. नाकातली भलीमोठी नथ तोंडावर रूळायची नि ओठातल्या शब्दांना कुलूप घालायची. मग तिने प्रश्न विचारायचे बंद केले. ती मूक झाली, अबोल झाली. जगाचे ज्ञान कधी तिने करून घेतलेच नाही. चाचपडत राहिली अज्ञानाच्या काळोखात. पण तिला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी काही मानवरूपी देवही भेटले. अज्ञानरूपी तमात चाचपडणाऱ्या तिला ज्ञानरूपी ज्योतीने उजळवले ते ज्यांच्या नावातच ज्योती आहे अशा महात्मा जोतिराव फुले यांनी. त्यास साथ मिळाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची.
शिक्षण मिळाले, ज्ञानप्रकाशात तिची वाटचाल सुरू झाली. आत्मविश्वासाच्या तेजाने ती झळकू लागली. तरीही खूप सारे अडथळे आहेत तिच्यापुढे. त्यामुळे या तेजालाही काजळी चढते व ज्योत मंदावते. कितीतरी जणी घरसंसार व करिअर अशी तारेवरची कसरत करतात. तरीही ती वाटचाल करत राहते. शारीरिक कष्टाची तिला कधीच फिकीर वाटत नाही. पण कधी कधी हल्ला होतो तिच्या वर्मावर. बळी जातो तिच्या मनाचा.. वासनांध नजरेने. तिच्यावर कधी जीवघेणा हल्ला होतो, कधी फसवणूक, कधी ॲसिड अटॅक, तर कधी बलात्कार… तिचं सगळं तेजच हिरावून घेतलं जातं. तिच्यातील आत्मबल हरवतं.. नैराश्य मळभ सभोवती दाटतं अन् स्वच्छ आभाळही काळवंडतं. तो तळपणारा दिनकर जणू मावळतो नि काळोखाचा भवताल तिला झाकोळू पाहतो. तरीही ती पुन्हा चाचपडत राहते मार्ग शोधण्यासाठी. अंधारली ज्योत हाती घेऊन मनात आशेचा दिप उजळवण्याचा प्रयत्न करते…!
आज चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र ‘अंधारली ज्योत’ हे शीर्षक घेऊन. एका स्त्रीच्या हाती असलेली मलूल झालेली ज्योत पाहून स्त्रीपुढील अनेक आव्हाने नजरेसमोर आली. अंतर्मनातील नैराश्याची छटा तिच्या चेहऱ्यावर डोकावते आहे. तरीही ती ही ‘अंधारली ज्योत’ पुन्हा तेजस्वीपणे चमकायला लावेल यात शंका नाही. एक पुरूष निराश झाला तर व्यसनांचा आधार घेतो. पण स्त्री मात्र व्यसनांच्या आहारी न जाता संयमाने मार्ग काढते. दु:ख पापणीआड लपवून हसतमुखाने पुन्हा उभारी घेते. अंधारली ज्योत जरी.. त्यावरील काजळी झटकते.. पुन्हा एकदा तेजाने ती झळकते.. ती झळकते. याच अनुषंगाने सहभागी सर्व रचनाकारांनी विविधांगी व आशयघन रचना लिहिल्या. सहभागी सर्व ताई दादांचे खूप खूप अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





