क्षण हे सौभाग्याचे
“रविंद्रनाथांच्या सहवासात ” हे ‘मैत्रेयी देवी’ याचे बंगाली भाषेतील “मंग्पूते रवींद्रनाथ “नावाचे कवी श्रेष्ठ रवींद्रनाथ ठाकूर यांच्या हृदय आठवणींविषयीचे एक नितांत सुंदर पुस्तक. मराठी अनुवाद ‘विलास गिते ‘रवींद्रनाथांच्या सहवासात’ हे पुस्तक वाचनात आले. रवींद्रनाथांच्या नानाछटा असलेल्या स्वभाव विशेषांचे अनोखे दर्शन या पुस्तकात घडते आणि महान व्यक्तींच्या सहवासातील क्षण हे कसे सौख्याचे असतात, त्यांच्या सहवासात जीवन आपोआप कसे पावन होते याची प्रचिती येते.असे सौभाग्य लाभण्यास ही सौभाग्यच असावे लागते,हे मात्र नक्की!
‘रविंद्रनाथांच्या सहवासात ‘ या पुस्तकात रविंद्रनाथ टागोर यांच्या शेवटच्या काळात लेखिकेला त्यांचा जवळपास चार वर्षांचा सहवास लाभला,त्यांची सेवा करण्याची सुवर्ण संधी मिळाली आणि रविंद्रनाथांच्या स्वभावाचे विविध पैलू वाचकांच्या ह्रदयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आपल्या मुळे इतरांना त्रास होऊ नये अगदी नौकराला सुद्धा हा विचार रविंद्रनाथच करू शकतात.इतकेच नव्हे स्वतः ला कितीही त्रास झाला तरी दुसऱ्याची झोप मोड होऊ नये याची काळजी घेणारे रविंद्रनाथ… विनोद बुद्धी ने सर्वांना खुश ठेवणारे रविंद्रनाथ… कितीही त्रास असेल तरी सर्वांची पत्रे वाचून उत्तर देणारे रविंद्रनाथ… लहान सहान गोष्टींवर विचार करून वागणारे रविंद्रनाथ. इतरांच्या आजारपणात काळजी घेणारे विविध औषधांची माहिती असणारे रविंद्रनाथ…आपण दिलेला शब्द पाळू शकलो नाही तर समोरच्याच्या भावना जाणणारे रविंद्रनाथ व तसे होऊ नये म्हणून काळजी घेणारे रविंद्रनाथ… निसर्ग प्रेमी रविंद्रनाथ…. शेवटच्या कालावधीतही त्यांचे कविता कथा वाचन आणि त्यावरील चर्चा… लिहिले त्यासमयीचे विचार आणि नंतरच्या कालावधीत बदललेले त्या लेखावरील विचार असे एक ना अनेक प्रसंग मैत्रयी देवींनी अगदी हुबेहूब रेखाटले आहेत आणि वाचताना आपण पण त्या प्रसंगाचा हिस्सा आहोत असे वाचकास जाणवते इतकी प्रगल्भता त्यांच्या लेखनात आढळते.आपण त्या क्षणाचे साक्षीदार नाही याची चुटपुट मनाला लागून राहते.
रविंद्रनाथांचे लेखनाविषयी चे विचार महत्वपूर्ण वाटतात. ज्या काळ ,प्रसंगा विषयी लिहिले आहे ते विचार कालांतराने बदलू शकतात, जसे प्रौढ होत जाऊ तसे विचारांमध्ये पोक्तता येते. ” कविता कोमलवनिता यदि सा दुर्जन हस्ते पतिता प्रतिपदे भग्ना समस्यामग्ना” कविता एखाद्या कोमलांगी सारखी असते ती एखाद्या दुर्जनाच्या हाती सापडली तर तिला प्रत्येक पावलावर ठेचा लागतात आणि संभ्रमात ती भरटकत राहते. अतिशय महत्वपूर्ण व मार्गदर्शक विचार वाटतात हे. खरं पाहिलं तर कवितेचा अर्थ फक्त तो कवी जाणो किंवा तो देव जाणो आणि खरा अर्थ काही कालावधीनंतर तो कवीही विसरून जातो असे ते त्यात म्हणतात. हा विचार मनाला खरंच कुठेतरी पटून जातो.
या पुस्तकाविषयी ‘बा.भ. बोरकर’ म्हणतात,” रवींद्रनाथांबद्दल अक्षरशः असंख्य पुस्तके आहेत; पण मला ‘रविंद्रनाथ वरील फक्त एक आणि एकच पुस्तक वाचायचे आहे ‘असे मला कोणी म्हणाले तर मी नि:शंकपणे या पुस्तकाची शिफारस करीन. या वर्णनावरूनच आपण या पुस्तकाची महत्ता जाणू तर पु. ल. देशपांडे म्हणतात,’ रवींद्रनाथांच्या सहवासात हा अनुवाद छान झाला आहे एका महाकवीच्या सहवासाची ही कहाणी आहे अतिशय ह्रदय असे हे पुस्तक मराठीत येत आहे याचे मला फार समाधान वाटले. हे पुस्तक साहित्य अकादमीने “राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार” देऊन गौरविलेला ग्रंथ आहे.
आनंद अंतरकर म्हणतात,” रवींद्रनाथांच्या सहवासात हा अनुवाद वाचला .वाचताना हरवून गेलो. अनुवाद उत्तम उतरला आहे. कितीतरी प्रसंगातला गोडवा आणि हळुवारपणा मैत्रेयी देवीने अचूक शब्दात पकडला आहे. शैली ही ओघवती वाटली. रविंद्रनाथांच्या कथा, गाणी कविता यांचे वर्णन या पुस्तकामध्ये आले आहे. वाचन करताना प्रसंगांमध्ये हरवणे काय असते हे जर पाहायचे असेल तर नक्कीच हे पुस्तक वाचावे. या पुस्तक वाचनानंतर असे म्हणावे वाटते की महान व्यक्तीच्या सहवासातील क्षण हे खरंच सौभाग्याचे असतात आणि या सौभाग्याचा आनंद या पुस्तकातून सर्वांना प्राप्त होतो.
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
परीक्षक, लेखिका, कवयित्री
=========



