राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने ‘गणेश पाटील’ सन्मानित
प्राचार्य डॉ. रमेश चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने ‘गणेश पाटील’ सन्मानित
प्राचार्य डॉ. रमेश चौधरी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नंदुरबार, (दि ४ नोव्हेंबर): शिक्षक ध्येय आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत विजेते ठरलेले गणेश नरोत्तम पाटील, पर्यवेक्षक, वल्लभ विद्यामंदिर पाडळदा (ता. शहादा) यांना “शिक्षक ध्येय राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
हा सन्मान शिक्षक ध्येय राज्यस्तरीय साप्ताहिक, नाशिक, मातृवृक्ष बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, वर्धा, तसेच मंगल यश एज्युकेशन कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. रमेश चौधरी (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गणेश पाटील यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून “विविध भाषिक उपक्रमातून पूरक वाचन साहित्यनिर्मिती” हा अभिनव नवोपक्रम सादर केला होता. या नवोपक्रमाचे परिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथील अधिव्याख्याता मुकुंद दहिफळे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली येथील अधिव्याख्याता बजरंग बोडके यांनी केले.
गणेश पाटील हे उपक्रमशील, सर्जनशील व समर्पित शिक्षक असून त्यांनी विविध शासकीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. ते प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शक व सुलभक म्हणूनही कार्यरत आहेत. ते कवी व साहित्यिक म्हणूनही ओळखले जातात. त्यांचा “स्नेहवलय” हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून “आनंदाची शाळा” हा बालकविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. वल्लभ विद्यामंदिर पाडळदा येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गणेश पाटील यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या प्रसंगी डायट नंदुरबारचे प्राचार्य डॉ. रमेश चौधरी, अधिव्याख्याता विनोद लवांडे, ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन, शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, वल्लभ विद्यामंदिर पाडळदा शाळेचे चेअरमन दत्तात्रय सोमजी पाटील, व्हा. चेअरमन विजय लिमजी पाटील, सचिव डॉ. विलास पाटील, ज्येष्ठ संचालक रमेशभाईजी चौधरी, माजी मुख्याध्यापक संचालक अशोक पाटील, मुख्याध्यापक अंबालाल चौधरी, सर्व शिक्षकवृंद व मित्रपरिवार यांनी गणेश पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.





