तरूणांनी नवी ग्रंथनिर्मिती करून अभिजात मराठी भाषेचे वैभव वाढवावे: डाॅ. प्रदीप आपटे
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
तरूणांनी नवी ग्रंथनिर्मिती करून अभिजात मराठी भाषेचे वैभव वाढवावे: डाॅ. प्रदीप आपटे
ग्रंथोत्तेजक संस्थेचा वार्षिक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न
अमृता खाकुर्डीकर, प्रतिनिधी पुणे
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे.दि.3 (प्रतिनिधी) आपली पोथी-पुराणे, अभंग-ओव्या, सर्व प्रकारचे संत वाड्.मय आजही इतके ताजे तवाने आणि कालसुसंगत वाटते, कारण अतिशय सुंदर प्रासादिक भाषेत ते लिहीले गेले आहे. असे चिरंतन साहित्य निर्माण करणा-या मराठी भाषेला म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अशा आपल्या या सुंदर भाषेत आजच्या तरूणांनी नवी ग्रंथनिर्मिती करून अभिजात मराठी भाषेचे वैभव वाढवले पाहिजे” असे प्रतिपादन जागतिक बँकेचे सल्लागार डॉ. प्रदीप आपटे यांनी मांडले. ते पुणे महाराष्ट्र गंथोत्तेजक संस्थेच्या वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलूरकर उपाध्यक्ष डॉ. अरविंद नवरे, ॲड.अविनाश चाफेकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने हा १३१ व्या वर्धापन दिन व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात सुरूवातीला मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. ग्रंथोत्तेजक संस्थेच्या वतीने, विविध पुस्तकांच्या लेखक, प्रकाशकांना डॉ. प्रदीप आपटे यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. डाॅ. गो. बं. देगलुरकर हा मानाचा पुरस्कार अरविंद जामखेडकर यांना प्रदान करण्यात आला. कै. आनंद केळकर स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले श्री गिरिधर साठे, कै. आनंद वैद्य स्मृती पुरस्कार श्री. रविंद्र गुर्जर यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे भारतीय विचार साधना प्रकाशनाच्या पुस्तकांना व त्यांच्या लेखकांनाही गौरवण्यात आले.
“सामान्यांच्या असामान्य कर्तुत्वाच्या कथा भाग १ या पुस्तकाचे लेखक श्री. प्रदीप नाईक-व डॉ. शरद कुंटे, तसेच “सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यु- कन्हैयालाल मुन्शी” या पुस्तकाचे लेखक, श्री. प्रसाद फाटक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत व संस्था परिचय डॉ. अविनाश चाफेकर यांनी करून दिला.
पुरस्कार वितरण सूत्र संस्थेचे आनंद हर्डीकर यांनी सांभाळले. पारिथोषिक प्राप्त लेखकांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभात सर्व पुरस्कारार्थींचा परिचय करून देण्यात आला. डाॅ. गो. बं. देगलूरकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांचे अभिनंदन करून नव्याने प्रकाशित होणा-या उत्तम पुस्तकांचा गौरव करताना ग्रंथोत्तेजक संस्थेस आनंद होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शाल्मली व्यास यांनी केले. प्र ल. गावडे सभागृहात आयोजित या हृद्य कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखक तसेच, सर्व पुरस्कार्थी लेखक, प्रकाशक कुटुंबीय व मित्रपरिवारासह उपस्थित होते.



