Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरनागपूरपरीक्षण लेखमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

ऋतुजा भेटली आणि……!

वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर

0 4 8 2 9 0

ऋतुजा भेटली आणि……!

काळ बदलतो, वेळही बदलते. आयुष्य पुढे सरकत राहतं. फुलपाखरी दिवस भर्रकन निघून जातात आणि हातात फक्त रंग उरतात निराशेचे…वयोमान…दगदग…असं म्हणत, ‘एकेक दुखणी खुपणी मानवी शरीरात प्रवेश करू लागतात’. काहीजण व्यवस्थित दिनचर्या… योग्य आहार… नियमित व्यायाम, योगासने यांनी त्यावर मातही करतात. पण आम्ही ठरलो जन्माचे आळशी. ‘मन के राजा’, याप्रमाणे आमची दिनचर्याही जरा मोकळीढाकळी. त्यात नोकरीचा बहाणा. आम्हाला वेळच नाही हो…हा राग सदानकदा आळवत अनेक दुखणी सोबतीला बांधलेली. चौतीस वर्षांची उणीपुरी शिक्षकी सेवा करून आता जेमतेम चार वर्षांसाठी हात टेकलेले आणि असाध्य गुडघेदुखीने हैराण आमच्या डोक्यात ऐच्छिक सेवावृत्तीचे खूळ भरलेले.

मात्र हे खूळ उतरण्यास कारणीभूत ठरली माझी एक माजी विद्यार्थीनी ऋतुजा बाबाराव झाडे ( उपरे ). दिनांक २४ ऑगस्ट २०२४ ची दुपार. सकाळची शाळा आटोपून नियमितपणे गुडघेदुखीचे औषधोपचार जिथे सुरू आहेत त्या डॉक्टरांकडे मुलासोबत गेले. नंबर यायचा होता म्हणून बाकावर बसून होते. तितक्यात एक तरुणी तिथे आली आणि रिस्पेशनिस्ट काउंटरवर चौकशी, नंबर लावणे अशी प्रक्रिया करू लागली. मला तिच्याकडे बघून हिला कुठेतरी बघितले असा काहिसा भास होत होता. पण माझ्या बोलघेवड्या स्वभावाने बरेचदा मी ओळख काढताना तोंडघशी पडले होते, म्हणून असेल कुणीतरी सारख्या चेहऱ्याची दुसरी कोणीतरी म्हणून मी दुर्लक्ष केले.

थोड्याच वेळात माझा नंबर येणार म्हणून मी डॉक्टरांच्या चेंबरजवळील रांगेत बसून होते. तेवढ्यात ती तरुणी तिच्या सोबत असलेल्या सासूबाई आणि तिच्या मिस्टरांसोबत माझ्याकडे बघून काहीतरी कुजबुज करताना दिसली. थोड्याच वेळात ती माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली मॅम आपण माऊंटच्या वैशाली मॅडम काय ? मी हो म्हणून उत्तर देतच आहे तर तिने लगेच माझ्या पायांना स्पर्श करून नमस्कारही केला. मीही जरा डोक्याला हलकाच ताण देऊन म्हटले, “तू ऋतुजा झाडे काय ?” ती होय म्हणाली आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

इथूनच माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. या गुडघ्यांच्या दुखण्यामुळे मी नोकरी सोडायला निघाले होते. नोकरी सोडल्यानंतर कुठले आर्थिक नुकसान होणार होते ? याचाच फक्त विचार यापूर्वी घोळत होता. ऐच्छिक सेवानिवृत्तीमुळे माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाला मी मुकणार होते हा विचारही मनाला शिवला नव्हता. मात्र ऋतुजाच्या भेटीमुळे माझे डोळे खाडकन उघडले. येत्या चार वर्षांत चार पिढ्यांशी जुळून राहण्याचे भाग्य मी स्वतःहून गमवायला निघाले होते. “शिशिराच्या पानगळीनंतर वसंतातील कोवळ्या पल्लवीगत मन नव्याने बहरून आले”. शारीरिक दुखणे सहन करण्याचे बळ या भेटीमुळे घडून आले. म्हणूनच म्हणावेसे वाटते…ऋतुजा भेटली आणि मनातील उदासीनता पार गळून पडाली. धन्यवाद ऋतुजा आणि माझे प्रिय विद्यार्थी. तुम्ही सर्व माझ्या आयुष्यातील हिरवळ आहात….!

वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
=======

1/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे