भांबवली-कास पुष्पपठार
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे
भांबवली-कास पुष्पपठार
सातारा येथून २२ किमी. अंतरावर असलेले महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील ‘कास पठार’. अनेक दुर्मिळ प्रजातीच्या वनस्पती येथे सापडल्याने युनेस्कोने २०१२ साली याचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत केला. ‘भांबवली पठार’ उन्हाळ्यात ठणठणीत कोरडे असते. काळ्याकुट्ट जांभ्या दगडाच्या पठारावर पावसाळयात फुलांचा बहर हे एक मोठं आश्चर्य आहे. दगडावर विविधरंगी फुले हा निसर्गाचा चमत्कार आहे. ‘विशेष म्हणजे फक्त दसऱ्याच्या दिवशी या पठारावर विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात. पावसाळा सुरू झाला की पर्यटकांचे पाय इकडे वळतात.’
साताऱ्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. कास-भांबवली, तापोळा- महाबळेश्वर, पाटण हा परिसर सदाहरित जंगलाने व्यापलेला आहे. याच पश्चिम घाटाच्या डोंगराळ भागात कोयनेचा शिवसागर जलाशय, वासोटा किल्ल्याच्या गर्द झाडीतील डोंगर, कोयना, सोळशी व कांदाटी नद्यांचा त्रिवेणी संगम पहावयास मिळतो भांबवली, वजरा धबधबा, तसेच प्रतापगडसारखे गडकिल्ले आहेत. उत्तरेकडे कास पुष्प पठार तर दक्षिणेकडे चाळकेवाडीचे पवनचक्कीचे पठार. हे सर्व भांबवलीच्या एकाच पुष्प पठारावरून पहावयास मिळते, अनुभवता येते. या सदाहरित जंगलामध्ये पर्यटक अस्सल जैवविविधतेचा अनुभव घेतात. कासचे पुष्प पठार, चाळकेवाडी पवनचक्कीचे पठार, पाचगणीचे टेबललॅन्ड या पठारांना “सडा” असे म्हटले जाते.
पावसाळयात या सड्यावर गवत उगवते आणि त्यावर विविधरंगी फुले डोलू लागतात. निसर्गाचा हा विविधरंगी सोहळा ऑगस्टमध्ये चालू होतो तो ऑक्टोबरपर्यंत पहावयास मिळतो. सप्टेंबरमध्ये कास-भांबवलीचे संपूर्ण पठार विविध रंगांनी फुललेले दिसते. जणू काही निसर्गदेवता रंगांची उधळण करत आहे. चालता चालता कधी लाल-पिवळया गौरीहाराचे दर्शन तर कधी लाल तेरडयाचे, पिवळया सोनकीच्या फुलांचा बहर, रानतुळशीच्या निळया-जांभळया मंजिऱ्या, मिकी माऊसची लाल पिवळी फुले, सीतेची आसवे ही फुले लक्ष वेधून घेतात, कारवी तर सात वर्षांनी फुलते. जेव्हा ती फुलते तेव्हा सर्वत्र तिचेच साम्राज्य जाणवते. सहा वर्षे ती हिरवीगार असते. २०२३ मध्ये कारवी फुलली होती. आता ती २०३० मध्ये फुलेल. लाल-जांभळा रानपावटा किंवा हत्तीची सोंड मनाला आकर्षून घेते. कास पठारावर कुमुदिनी तलाव आहे.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध.
======



