सावरकरांच्या ग्रंथांचे जयंतीदिनी पूजन
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
सावरकरांच्या ग्रंथांचे जयंतीदिनी पूजन
ग्रंथालय भारती आणि कथा भारतीचा संयुक्त उपक्रम
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
पुणे (प्रतिनिधी) स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या जयंती दिनी ग्रंथालय भारती आणि कथा भारती यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सावरकर लिखित विविध ग्रंथांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सहायक आयुक्त मा. दांगट, माजी नगरसेविका सौ माधुरी सहस्रबुद्धे आणि प्राचार्य श्याम भुर्के हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना प्रा. श्याम भुर्के यांनी सावरकरांच्या तेजस्वी लेखणीतून उतरलेल्या साहित्याचा आढावा घेतला. सावरकरांचे ज्वलंत क्रांतिकारक विचार, काळाच्या पलीकडे पाहणारा द्रष्टेपणा आणि प्रखर विज्ञान निष्ठा यांचे अनेक दाखले देऊन तात्यारावांचे लेखनसामर्थ्य त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांत जागोजागी प्रकट झाले असल्याचे सांगितले.
माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी सावरकरांच्या क्रांती कार्याचे मोल संस्मरणीय असून त्यांच्या प्रखर देशभक्तीची प्रेरणा आजही मनात चैतन्य जागवते, असे सांगून अगदी नव तरूण वयात मोठ्या धाडसाने पुण्यातल्या डेक्कन कॉर्नर येथे सावरकरांनी परदेशी कापडाची जी होळी केली होती, त्या घटनेची आठवण जागी केली.
कथा भारतीच्या प्रमुख डॉ. अनुजा कुलकर्णी यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास ग्रंथभारती व कथाभारतीचे सर्व पदाधिकारी तसेच सावरकरप्रेमी आवर्जुन उपस्थित होते.



