Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

‘जैविक अजैविक सृष्टीकला म्हणजे चमत्कृतीपूर्ण रचनांची अजब गजब शृंखला’; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय 'हायकू काव्य'स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 4

‘जैविक अजैविक सृष्टीकला म्हणजे चमत्कृतीपूर्ण रचनांची अजब गजब शृंखला’; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय ‘हायकू काव्य’स्पर्धेचे काव्यपरीक्षण

चेतन अचेतन अथवा जैविक अजैविक जीवसृष्टी म्हणजे जणू काही अद्भूत आणि चमत्कृतीपूर्ण रचनांची अजब गजब शृंखलाच!! आकाशाची अमर्याद पोकळी असो, सागराची गूढ गंभीर खोली असो की धरतीवरचा वैविध्यपूर्ण निसर्ग.. जेथे तेथे मानवी कल्पनेपलिकडची रहस्य दडलेली आहेत. खास गोष्ट म्हणजे यातील अनेक रहस्य, विशेष बुद्धिधारी मानवानेच उलगडली आहेत.. आणि अजूनही किती अगम्य गोष्टी गुलदस्त्यात आहेत याची कल्पनाही करता येणार नाही. निसर्ग असा किमयागार आहे की, एका क्षणात होत्याचे नव्हते करू शकतो. एकिकडे मानवी मेंदूने जागतिक आश्चर्यात गणल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी निर्माण केल्या आहेत. तरीही तो निसर्गापुढे क्षुल्लकच आहे.. याचीत दुसरी बाजू म्हणजे अशा काही काल्पनिक मान्यता वर्षानुवर्षे इतक्या खोलवर रूजल्या आहेत की त्याचे गारूड मानवी मनावर कायमचे कोरले गेले आहे. उदाहरणार्थ भूतबाधा जे भूत अद्याप कुणीही पाहिले नाही त्याचे भय मात्र यत्किंचितही कमी झालेले नाही.

आपण लहान असताना अशा अनेक गोष्टी ऐकत आलो आहोत. त्यातलीच एक गोष्ट “बागुलबुवा” ज्याला कुणीच कधीच पाहिले नाही त्याचा धाक मात्र बालमनावर कायम. तशीच पंख असलेली परी.. जी कधीच कुणाला दिसली नाही पण उत्सुकता कायम. जुन्या अरेबियन कथा, भारतीय कथा ज्यातून अशा गोष्टी नेहमी मांडल्या गेल्या आहेत. अगदी अलीकडे सुद्धा कर्नाटकातील सौंदत्ती येथे रेणुकादेवीचे अनेक भक्त जटाधारी आढळतात. अनेक स्री पुरूषांना चक्क कमरेपर्यंत जटा असतात. तसेच गावोगावी चाबकाचे फटकारे अंगावर मारून घेत फिरणारे लोक आपण पाहतो ते विशिष्ट वर्गातले असतात. यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न क्वचितच होतो. शिवाय अशा गोष्टीतले वैज्ञानिक सत्य कुणी मांडण्याचा प्रयत्न केला तरी ते फारसे पचनी पडत नाही.

आता वळूया ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेल्या चित्राकडे. हे चित्र आफ्रिकन देशातील जंगली लोकांचे असून यामध्ये डोक्यावर शिंगे असलेला एक मनुष्य दिसतो. याचा संदर्भ १९३४ सालापर्यंत जातो. या व्यक्तीचे नाव “नाजबिया बाटे” असे असून हा व्यक्ती शिंगामुळे शापित किंवा भूत असल्याचा समज प्रचलित झाल्यामुळे एकटाच जंगलात वास्तव्य करायचा. मात्र एक इंग्लिश संशोधक घास्ट फ्रिमनने या व्यक्तीचा सत्यशोध करण्याचा प्रयत्न केला. संशोधनाअंती असे लक्षात आले की. हा व्यक्ती कमालीचा बुद्धिमान होता आणि जंगली वनौषधीचा जाणकार होता.

जखमी वन्य प्राण्यांवर हा उपचार करत असे. त्वचेबाहेर नखे, केस, खूर असतात तसेच शिंगासारखा प्रकार अपवादात्मक असू शकतो याची वैज्ञानिक कारणे वेगळी आहेत. सर्व शोधाचा प्रबंध करून फ्रिमनने सत्याचे वर्गीकरण केले. हा व्यक्ती निसर्गाशी इतका एकरूप झाला होता की लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदरयुक्त भिती होती. थोडक्यात कल्पना आणि वास्तवाचे समीश्रण असलेल्या अशा अनेक गोष्टी जगात आहेत. आणि काळाच्या ओघात माहितीचे विकेंद्रीकरण होत होत त्या एक दंतकथा म्हणून प्रचलित होतात.

अशा चित्रांवर हायकू लेखन करणे थोडे आव्हानात्मक असते. चित्राचा इतिहास, कार्यकारण, माहिती यांचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. कुतुहल, भिती, संशोधन, जिज्ञासा, अशा गोष्टींचा अंतर्भाव होणे अपेक्षित आहे. शिवाय त्यातला एक विशिष्ट क्षण शब्दबद्ध करणे गरजेचे. आ. राहुल दादांनी इतके वेगळे चित्र विषय देऊन समस्त हायकूकारांना प्रेरित केले. ज्यामुळे सर्वांना नवीन काहीतरी अभ्यासता आले. सर्वांच्या लेखणीला शुभेच्छा आणि मला हायकू परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. दादांचे आभार.

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/ कवी/ लेखक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे