Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

माझ्या मायभूमीतून…! ‘भाजे लेणी’

सौ. स्वाती मराडे-आटोळे

0 4 8 3 0 0

माझ्या मायभूमीतून…!

‘भाजे लेणी’

पुणे येथून लोणावळ्याला जाताना अलीकडेच लागते ते म्हणजे मळवली. इथून थोड्याच अंतरावर भाजे हे गाव आहे. भाजे गावापासून चारशे फूट चढून गेल्यावर सुप्रसिद्ध भाजे लेणी आहेत. भारत सरकारने हे संरक्षित स्मारक घोषित केलेले आहे. पाण्याच्या टाक्यांजवळ ब्राम्ही शिलालेख कोरले आहेत त्यावरून ही लेणी इसवी सन पूर्व दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात खोदलेली आहेत. या लेणी समूहात २२ लेण्यांचा समूह आहे. त्यात एक चैत्यगृह व २१ विहार आहेत. येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे. दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेलीही दिसतात. तसेच येथे एक यक्षिणी कोरली आहे. तिच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते.

कातळात एक चैत्यकमान कोरली आहे. या कमानीला छिद्रे पाडलेली आहेत. येथील चैत्य सुमारे १७ मीटर लांब, ८ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे. स्तूपामागील खांबांवर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसतात. तर चैत्यस्तूपासमोरील जमिनीवर सारीपाट कोरलेला आढळतो. चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्त्रोत आहे.

येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंग, शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राणी आणि चैत्य-स्तूपांचे नक्षीकाम कोरलेले आहे. या शिल्पात चार घोड्यांच्या रथावर सूर्य स्वार होऊन चालला आहे, रथात त्याच्या मागे-पुढे त्याची पत्नी अथवा दासी आहे. त्यातील एकीने वर छत्र धरले आहे तर दुसरी चामर ढाळते आहे. त्यांच्या या रथाखाली काही असुर तुडवले जात आहेत. अनेकांच्या मते ही सूर्यदेवता, रथातील त्या दोघी त्याच्या पत्नी संज्ञा आणि छाया तर रथाखाली तुडवला जाणारा तो सूर्याचा शत्रू राहू आहे.

येथील एक लेणे भारतीय संगीत कलेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे आहे. येथे कोरलेल्या चित्रात एक तबला वाजवणारी स्त्री दिसते आहे. या शिवाय एक नर्तकी नृत्य करताना दिसत आहे. या कोरीव कामाने तबला हे वाद्य निश्चितपणे भारतात निर्माण झाले व किमान दोन हजार वर्षांपासून वापरात आहे हे निर्विवादपणे सिद्ध होते. स्मारकाचा एक उल्लेखनीय भाग म्हणजे चौदा स्तूपांचा समूह. त्यातील पाच आत आणि नऊ बाहेर आहेत. स्तूप अतिशय विस्तृतपणे कोरले गेले आहे.

सौ. स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे