चुलीला घास अर्पण करणा-या अन्नपूर्णेची उच्च कोटीची भावना: स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी काव्यस्पर्धेचे परीक्षण
चुलीला घास अर्पण करणा-या अन्नपूर्णेची उच्च कोटीची भावना: स्वाती मराडे
गुरूवारीय चित्र चारोळी काव्यस्पर्धेचे परीक्षण
ती जननी, जन्मदात्री, पालनकर्ती.. तिनेच शेतीचा शोध लावला. तिने पाककला आत्मसात केली. ती सगळ्यांच्या पोटपूजेसाठी स्वतः सिद्ध होत राहिली. आधी जमिनीत बी अर्पण केले, जलार्पण केले, मशागत केली आणि पीक तरारले. धान्य हाती आले तेव्हाही सुखदु:खाची ओवी गात जात्यावर दळले. काही कण किडे, मुंग्या, सूक्ष्मजीव यांना अर्पण केले. ते धान्य कधी उकडले, कधी भाजले, कधी तळले आणि खाण्यासाठी तयार केले. त्यासाठी पेटवली ती चूल.. चुलीत अग्नीसाठी काष्ठाची समिधा अर्पण केली. धरणीची, अग्नीची, वायूची, जलाची साथ घेतली व तेज निर्माण करणाऱ्या अन्नाची निर्मिती केली. त्यानंतरची तिची कृतज्ञता पहा ज्या अग्नीवर तिने अन्न शिजविले त्या अग्नीला ती अन्नाचा प्रथम घास अर्पण करते. किती उच्च कोटीची भावना आहे ही.. अर्पण..!
‘कोणतीही गोष्ट अर्पण करायची असेल, तर मनात अत्यंत करूणाभाव, त्यागाची भावना व समर्पणाची इच्छा यांचा संगम असावाच लागतो’. कारण अर्पण करणे म्हणजे स्वमालकी सोडून त्यावर दुसऱ्याला हक्क देणे. हा हक्क ती किती सहज देते ना. होय.. अगदी सहजतेने. कारण तिचे हृदय मातृत्वभावनेने ओतप्रोत भरलेले असते. म्हणूनच ती अर्पण करते मायेपोटी.. दानासाठी, अन् कृतज्ञतेसाठीही. त्यामुळेच कधी हाच घास ती भुकेल्याच्या ओठी देते.. दान म्हणून..! सत्पात्री दान म्हणतात ते हेच. दारी येणारा बैरागी असो की डोंबारी, वासुदेव असो की नंदीबैलाचा आप्पा, प्रत्येकाच्या झोळीत टाकतेच ती मूठपसा.
‘स्त्रीवाचून घर सुनं आणि पुरूषावाचून शेत उणं’, म्हणतात ते उगीच नाही. पुरूषाने राबून कमावून आणावं आणि स्त्रीने त्याचा योग्य विनियोग करावा. हे पूर्वापार चालत आलेले अलिखित सूत्र. स्त्री ही तिच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेत ती देत असते सर्वोच्च योगदान आणि समर्पण. झोपडी असो की महाल त्याला ती बहाल करते घरपण. स्त्री ही उपजतच असते एक सुगरण. जे हाताशी उपलब्ध असेल त्यात अपार मन आणि प्रेम ओतून ते अधिक रूचकर बनवत असते. तिने केलेली कोंड्याची भाकर आणि पाल्याची भाजी सुद्धा तृप्तीचा ढेकर देवून जाते. मातीच्या लोट्यात विरजण ठेवते, सकाळी त्याचं घट्ट दही झालेले असतं. पुन्हा तेच दही रवीने घुसळते व कुशलतेने लोण्याचा गोळा अलगद बाहेर काढते. तेच लोणी गरम भाकरीवर घेऊन त्यात थोडी चटणी घालून किंवा लोट्यातले चमचाभर दही मिरचीच्या ठेच्यात घालून भाकरी खाल्ली आहे का कुणी? घरात कुणी कधीही यावे आणि पाटावर बसावे तिचे ताट कायम तयारच असते. घरातली माणसे असोत किंवा ऐनवेळी आगंतुक पाहुणे येवोत. कुणी उपाशी अर्धपोटी रहात नाही अन् ती नासाडीही होऊ देत नाही.. अशी ही साक्षात अन्नपूर्णा बनून अन्नार्पण करत रहाते.
काल ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुलदादांनी दिलेले चित्र वरील सर्व घटनाक्रम डोळ्यासमोर उभा करणारे. आजच्या पिझ्झा बर्गरच्या आणि झोमॅटोच्या ऑनलाइन युगात सुगरणीच्या हातची चव ही शब्दातच उरते की काय कुणास ठाऊक. ती केवळ कथा कवितेतच भेटेल की काय.. असो सर्वांनी विषयाला उत्तम न्याय देण्याचा प्रयत्न केला.. सर्वांना शुभेच्छा आहेतच. मला परीक्षण लेखनाची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहुलदादांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे, इंदापूर पुणे
मुख्य परीक्षक, लेखिका, कवयित्री
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



