सत्वपरीक्षा देता हवी संयमाची कसोटी….!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
‘सत्वपरीक्षा देता हवी संयमाची कसोटी….!’; वैशाली अंड्रस्कर
शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण
नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे….
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा…
पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या संत कान्होपात्रा यांचा हा अभंग पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आर्त स्वरात ऐकताना ‘सत्वपरीक्षा’, या शब्दाचा गहन अर्थ कळतो. अन्याय, अत्याचाराने खचलेली कान्होपात्रा व्याकूळ होऊन पंढरीच्या विठ्ठलमाऊलीला अधिक अंत पाहू नको अशी विनवणी करते आणि त्याच्याच चरणी लीन होते.
ही आर्तता, वेदना, दुःखाचा सागर पार करण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘सत्वपरीक्षा’. मानवी जीवनाच्या उगमापासून अंतापर्यंत सावलीसारखी पाठलाग करणारी सत्वपरीक्षा कधीकधी जीवघेणी होऊन बसते. पण या देहाच्या नाशाआधी काही क्षण आपण विचार केला तर…जन्म आपल्या हातात नाही मृत्यूही आपल्या हातात नाही. मग आपण कोण या जीवाला नामशेष करणारे ?
आत्मघाताचा विचार कधी मनात आलेला असताना जरा बघावे, आपल्या पेक्षा अधिक दुःखाचा सामना करणाऱ्या असंख्य व्यक्ती आपल्या सभोवताली असतात. मात्र आपलेच दुःख कुरवाळत बसल्याने दुःखाची तीव्रता अधिक गडद होत जाते. यावेळी परत नवा सूर्य बघावा...नव्या दिवसाचे नाविण्य परत अनुभवावे आणि स्वतःलाच विचारावे…काय, तू आज नसतास तर अनुभवले असते का हे सुखद क्षण ?
आज शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुल दादा पाटील यांनी ‘सत्वपरीक्षा’, हा विषय दिला. खरेतर या विषयावर लिहिणे हीसुद्धा ‘सत्वपरीक्षा’. पण हळूहळू शिलेदार विषयाला सरावले आणि वेगवेगळ्या आशयाच्या रचनांचा आस्वाद घेता आला. पौराणिक काळापासून आधुनिक काळापर्यंत स्त्रीजन्माची सुरू असलेली सत्वपरीक्षा आजही संपलेली नाही. निसर्गाला आव्हान देत बदलत चाललेली जीवनशैली आणि त्यामुळे ओढवलेले संकट ही पण सत्वपरीक्षाच….शिशु वर्गापासून उच्च शिक्षणाकडे झेप घेण्यासाठी कल न बघता पालकांनी पाल्यांच्या समोर उभी केलेली सत्वपरीक्षा.
कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा चोहोबाजूंनी सुरू असलेल्या ‘सत्वपरीक्षेला’, मात्र संयमानेच जावे लागेल. ही संयमाची कसोटी बाळगल्यास नक्कीच कुठलीही सत्वपरीक्षा आपण उत्तीर्ण करू शकतो. सर्वांना शुभेच्छा आणि अभिनंदन….!
सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह



