पारंपारिक लोककला, स्त्रीच्या मानसिक घुसमटीचा हुंकार…!!!
सौ. स्वाती मराडे आटोळे

पारंपारिक लोककला, स्त्रीच्या मानसिक घुसमटीचा हुंकार…!!!
“अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया मिळतं,
अस्सं सासर द्वाड बाई कोंडून मारतं…”
वरील पारंपारिक गीताच्या ओळी आजच चटकन ओठावर आल्या आणि टचकन डोळ्यात पाणी आले. सासर कितीही तालेवार असले तरीही माहेरच्या झोपडीतल्या सुखाची ओढ भारीच असते. “चूल, मूल आणि रांधा, वाढा उष्टी काढा” हा शब्दप्रयोग स्री यांच्या संदर्भाने आज खूप उपहासाने घेतला जातो. मात्र नैसर्गिक दृष्टीने पाहता वरील जबाबदारी ही स्त्रीकडे ओघाने येतेच. आजकाल खूप शिकलेल्या कमावत्या महिला घरात अशा कामांना पगारी नोकरदार जरूर ठेवतात.
मात्र घरातल्या स्त्रीने मन लावून बनवलेले आणि प्रेमाने खाऊ घातलेले खाताना होणारा सात्विक आनंद कशातच मोजता येत नाही. आईच्या हातची चव बाहेरच्या जेवणाला कधीच येत नसते. मात्र याच रामरगाड्यात स्री इतकी भरडली जाते की, दुसर्यांचे करता करता स्वतःकडे साफ दुर्लक्ष होऊन जाते. इतरांसाठी खपता खपता स्वतःसाठी जगणे राहून जाते. मुलाबाळांना पोसताना आणि सासुरवास सोसताना स्वतःच्या स्वप्नांना कधी मूठमाती मिळते कळतही नाही. अशा वेळी हे दुःख व्यक्त करायचे तरी कुठं? आणि कुणासमोर हाच मोठा प्रश्न..!!
मात्र भारतीय परंपरेत याची उत्तरे आहेत. महाराष्ट्राची पारंपारिक कला संस्कृती पाहता पारंपारिक जात्यावरच्या ओव्या असोत की, गौरी गणपतीची गाणी असोत, भोंडला असो की इतर काही सणवार असो. यातून ती स्वतःचे दुःख मांडत असते. कलेच्या दृष्टीने ही एक स्रीयांची कथा असेलही पण त्यात सुप्त व्यथा व्यक्त झालेली असते. सासर माहेरच्या रूपकातून अतिशय मार्मिकपणे या व्यथांची गुंफण शब्दबद्ध केलेली असते. ‘बंधू सजना सजना, बहिणीच्या टिक्क्यापायी दादा मोडे खजिना खजिना’ किंवा ‘आक्कण माती चिक्कण माती, मातीत मळावी’ असे शब्द आठवले की, त्यात लपलेल्या स्री जन्माच्या व्यथा उजागर होताना दिसतात..!
हे सर्व आज आठवण्याचे कारण म्हणजे, गुरूवारीय चित्र चारोळी स्पर्धेसाठी दादांनी दिलेले चित्र.! सात आठ महिलांचा घोळखा पारंपारिक वेशभूषेत गोलाकार रिंगण करून काही तरी कलाप्रकार सादर करताना दिसत आहे. हे दुसरे तिसरे काही नसून पारंपरिक गीत प्रकार आहे. वेगवेगळ्या प्रांतानुसार बोलीभाषा आणि वेशभूषा वेगवेगळी असेलही मात्र त्यातला मूळ संदर्भ एकच आहे. संसाराच्या जात्यात स्वतःच्या देहाचे दळण दळताना लेकरासाठी ओवी गाणारी आई त्यात दिसते. तर याच संसाररगाड्यात पिचताना खपताना होणारी मानसिक घुसमट या कलाप्रकारातून ती व्यक्त करत असते.
हा एक अतिशय समृद्ध कलाविष्कार आहे जो मुखोद्गत असून अलिखित होता. मौखिक प्रसारातून पुढे प्रवाहित होत होता. शिक्षणाची सुविधा नसलेल्या काळातील अशिक्षित अडाणी स्त्रियांनी खूप मोठी साहित्य निर्मिती या अनुषंगाने केलेली असेल. जी बहुतांशी कालबाह्य झाली असेल… असो. तर कालच्या चित्रावर अनेकांच्या लेखण्या समरसून बरसल्या आणि नितांतसुंदर रचना वाचायला मिळाल्या. स्त्री जातीच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचे काम शिलेदारांनी चोख बजावले. सर्वांच्या भावी लिखाणाला मनापासून शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार..!
सौ. स्वाती मराडे आटोळे
इंदापूर पुणे
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





