‘तूच ब्रँड ॲम्बेसिडर तुझ्या मालाचा…!’; विष्णू संकपाळ
'तूच ब्रँड ॲम्बेसिडर तुझ्या मालाचा...!'; विष्णू संकपाळ
‘तूच ब्रँड ॲम्बेसिडर तुझ्या मालाचा…!’; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय ‘हायकू काव्य’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
व्यवसाय मग तो कोणताही असो. त्याच्या सादरीकरणाचे योग्य कौशल्य असेल तर, ग्राहकाला आकर्षित करता येते. अर्थात कोणत्याही उत्पादनाचा “उच्च गुणवत्ता” हा सर्वोच्च निकष जरी असला तरीही त्याचे बाजारीकरण नियोजनबद्धरित्या करणे फार आवश्यक असते. आधुनिक भाषेत मार्केटिंग एक कला आहे. आजचे जाहिरातीचे युग आहे. प्रत्येक उत्पादक हा.. कला, क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांना स्वतःच्या कंपनीचे ब्रँड अंबँसिडर बनवून त्यांच्या जनमानसातील लोकप्रियतेचा फायदा कुशलपणे स्वतःचा माल विकण्यासाठी घेतात.त्यावर प्रचंड पैसा खर्च करतात. अर्थात जाहिरातीतील खरेखोटेपणाबदद्दल या ठिकाणी न बोललेलेच बरे. ‘फेअर अँन्ड लवली’ खरी असती, तर आज एकही महिला काळी दिसली नसती.
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शेतक-याचा ब्रँड अंबँसिडर कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती होत नाही. कारण त्यांची किंमत मोजायची ऐपत सामान्य बळीराजाकडे नाही. मात्र स्वतःच्या हिमतीवर माल विकण्याची कल्पकता मात्र आहे.. आता हेच बघा ना..! मोठ्या कष्टाने पीक घेतले.. पीकही लय मोठे आले.. मग काय? घेऊन विकायला बसले.. पण शेतकऱ्याचं नशीब एवढं कुठले ? की लगेच त्याला गि-हाईक मिळेल नि हातोहात माल खपेल. पण कल्पक मन थोडेच स्वस्थ बसू देईल. मग घेतल्या मिरच्या अन् मोरपिसारा फुलवला.. अहं.. मनमयूरच फुलवला…! आहे की नाही कल्पकता..
काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेसाठी आ. राहुल दादांनी दिलेले चित्र याच कल्पक सादरीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. कला एखाद्या कडे जन्मजातच असते. त्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नाही. ही गोष्ट भाजीमंडईत फेरफटका मारल्यानंतर सहज लक्षात येईल. अतिशय सुंदर मोराची नक्षी मिरचीतून साकारून त्या वृद्ध आजीबाई ग्राहकांना आकर्षित करत आहेत. हीच खरी सृजनकला!!
हायकू रचना लिहिताना सुद्धा अशाच अफलातून कलात्मकतेची, सूक्ष्म निरिक्षणात्मक दृष्टीची नितांत गरज असते. पाच.. सात.. पाच हा सतरा अक्षरांचा तोल सांभाळत लेखणी बोलली पाहिजे. कल्पकता तर दिसलीच पाहिजे शिवाय हा, ही, तो. ती, हे वगैरे एकाक्षरे भरीसाठी योजलेली नसावीत. हायकू समजून उमजून घेतले तर सोपा! नाहीतर कठिण आहे.!! आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे आभार. सर्व हायकूकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा.
(सप्ताहात सर्व दिवस स्पर्धा आहेत. विजेते स्पर्धक, आपल्याच निवडलेल्या रचनेचे संकलन व निकाल वाचत नाही. ना सन्मानपत्रासाठी फोटो पाठवत. सन्मानपत्राकडे पाठ फिरविणा-यांची संख्या दिवसागणिक वाढतेय. ही आपल्या सारस्वतांसाठी चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे ज्या सदस्याबाबत ही तक्रार होती तेच सदस्य वारंवार दर्जेदार लिहूनही हेतूपुरस्सर पाठ फिरवताय असे जाणवते.)
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©परीक्षक/सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



