डॉ. प्रविण गायकवाड व श्री. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

डॉ. प्रविण गायकवाड व श्री. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज नेटवर्क
अलिबाग, (दि २) : जनता शिक्षण मंडळाच्या जे. एस. एम. महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तथा उपप्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड आणि सारळ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगदीश पाटील यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. डॉ. प्रविण गायकवाड हे जे. एस. एम. महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत असून, रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध विद्यार्थी-केंद्रित व सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
श्री. जगदीश पाटील हे सारळ माध्यमिक शाळा, सारळ येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक कार्यासोबतच क्रीडा क्षेत्रालाही विशेष प्रोत्साहन दिले आहे. विशेषतः शाळेतील मुलांच्या व मुलींच्या कबड्डी संघांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देत त्यांनी त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली सारळ माध्यमिक शाळेच्या मुलांच्या व मुलींच्या कबड्डी संघांनी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून पारितोषिके मिळविली आहेत.
दोन्ही शिक्षकांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. डॉ. गौतम पाटील यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी दोघांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष मा. सौ. शैलाताई पाटील, कार्यवाह मा. डॉ. साक्षी पाटील, जे. एस. एम. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. प्रविण गायकवाड व श्री. जगदीश पाटील यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दोन्ही शिक्षकांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे जे. एस. एम. महाविद्यालय तसेच सारळ माध्यमिक शाळेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला निश्चितच नवी प्रेरणा मिळाली आहे.



