Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरनाशिकपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

ऐतिहासिक वारसा रामकुंड, श्रद्धा, इतिहास आणि संस्कृती यांचा संगम; स्वाती मराडे

गुरूवारीय 'चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 6 7 7 7 1

ऐतिहासिक वारसा रामकुंड, श्रद्धा, इतिहास आणि संस्कृती यांचा संगम; स्वाती मराडे

गुरूवारीय ‘चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“दिमाखात उभा आहे, श्रद्धा, संस्कृतीचा वारसा,
साक्षीदार पूर्व वैभवाचा, जपूया ऐतिहासिक वारसा”

भारत देश हा अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांनी समृद्ध आहे. असेच एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे नाशिक येथील रामकुंड. आज स्पर्धेसाठी आलेल्या चित्रात गोदावरी नदीच्या काठावरील हेच प्रसिद्ध रामकुंड दिसत आहे. या एका चित्रात मंदिरे, घाट, नदी आणि भाविकांची गर्दी, हे सर्व एकत्र पाहायला मिळते. हेच या ठिकाणाचे खरे वैभव आहे. चित्राच्या डाव्या बाजूला काळ्या दगडात बांधलेली प्राचीन मंदिरे दिसतात. या मंदिरांच्या शिखरांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मध्ये उंचावर एक मनोरा दिसत आहे. तो मनोरा लांबूनही लक्ष वेधून घेतो. मंदिरांच्या समोर दगडी पायऱ्यांचा मोठा घाट आहे.

चित्राच्या मध्यभागी गोदावरी नदी संथपणे वाहत आहे. नदीच्या पाण्यात मंदिरांचे प्रतिबिंब पडले आहे, त्यामुळे दृश्य अजूनच सुंदर दिसते. घाटावर अनेक भाविक बसलेले दिसतात. काही जण स्नान करत आहेत, काही जण पूजा करत आहेत, तर काही जण नदीकाठच्या शांततेचा अनुभव घेत आहेत. नदीकाठच्या छोट्या दुकानांमुळे त्या परिसराला एक वेगळीच जीवंतता आली आहे. रामायणानुसार, प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण हे वनवासाच्या काळात पंचवटीत म्हणजेच आजच्या नाशिकमध्ये राहिले होते. असे मानले जाते की, श्रीरामांनी याच कुंडात स्नान केले होते. म्हणूनच या कुंडाला ‘रामकुंड’ असे नाव पडले आहे.

गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा असेही म्हटले जाते. ही नदी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. रामकुंड हे गोदावरी नदीवरील सर्वात पवित्र स्नानाचे ठिकाण मानले जाते. नाशिकचा कुंभमेळा जगभर प्रसिद्ध आहे. दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो साधू-संत आणि भाविक रामकुंडात पवित्र स्नान करण्यासाठी येतात. त्यावेळी संपूर्ण नाशिक शहर भक्तिमय वातावरणाने भरून जाते. रामकुंडाच्या आजूबाजूला असलेली मंदिरे ही मराठा काळातील स्थापत्यशैलीची उत्तम उदाहरणे आहेत. काळ्या दगडातील बांधकाम, दगडी पायऱ्या, दीपमाळा, हे सर्व आपल्या पूर्वजांच्या कलेची साक्ष देतात. जवळच प्रसिद्ध काळाराम मंदिर आहे. हे मंदिर देखील नाशिकच्या वैभवात भर घालते.

“रामकुंडाच्या घाटावर गोदावरी वाहते,
इतिहासाची गाथा आजही सांगते,
अनमोल ठेवा हा पूर्वजांनी जपलाय,
ऐतिहासिक वारसा.. मनामनात वसलाय”

हा ऐतिहासिक वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळाला आहे. तो जपणे हे आपले कर्तव्य आहे. नदी स्वच्छ ठेवणे, मंदिर परिसरात कचरा न करणे, आणि या वारशाचा आदर करणे, हीच खरी आपली संस्कृती आहे. “रामकुंड हे फक्त एक स्नानाचे ठिकाण नाही, तर ते श्रद्धा, इतिहास आणि संस्कृती यांचा संगम आहे”. चित्रातील प्रत्येक दगड, प्रत्येक मंदिर आपल्याला आपल्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देते. म्हणूनच नाशिकचे रामकुंड हा महाराष्ट्राचा अनमोल ऐतिहासिक वारसा आहे. या अनुषंगाने विचार करत आज स्पर्धेसाठी रचना आल्या. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.

स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/ लेखिका
©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 7 7 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे