‘रुपगर्वितेचे आंतरिक सौंदर्य महत्त्वाचे’; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
‘रुपगर्वितेचे आंतरिक सौंदर्य महत्त्वाचे’; वृंदा करमरकर
सोमवारीय त्रिवेणी काव्यस्पर्धेचे परीक्षण
रुपगर्विते,सखे साजणी
नको करु असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार तिला जीवघेणी धार
स्त्रीच्या सौंदर्याच्या काही साचेबद्ध कल्पना आपल्या डोक्यात असतात. गोरा रंग, शिडशिडीत बांधा, लांब सुंदर केस, यात बसणारी मुलगी आपल्याकडे सुंदर समजली जाते. त्यात एखादीचे डोळे निळे-घारे, केसांचा रंग सोनेरी तपकिरी असेल, तर तिच्या वेगळेपणातले सौंदर्यही आपण मान्य करतो. पण या वेगळेपणात जर काळेपणा असेल तर ते मान्य नसते. सौंदर्य निसर्गाची देणगी आहे, म्हणून स्त्रीच्या दिसण्याला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे.
पण सध्याच्या काळात सौंदर्याची परिभाषा बदलत आहे. जागतिक सौंदर्य स्पर्धेत २०१९ मध्ये साऊथ अफ्रिकन तरुणी जोजिबिनी टुन्झी ही मिसयुनिव्हर्स झाली. तिच्या त्वचेचा काळा, सावळा रंग सौंदर्याच्या आड न येता तिचं व्यक्तिमत्त्व, तिचं सादरीकरण, बोलणं, बुध्दिमत्ता हे निकष वरचढ ठरले. हे बदलतं चित्र उत्साहवर्धक आहे. स्त्रीच्या दिसण्याबरोबरच तिचं असणंही तितकचं महत्वाचं आहे.
आपल्या पौराणिक काळातील अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या पंचकन्या विख्यात आहेत. त्या रुपगर्विता तर होत्याच, पण त्यांच्या अंगीचे गुण, त्या गुणांनीच आजही त्या सर्वांच्या नित्य स्मरणात आहेत, पूजनीय आहेत. सध्याच्या काळात स्त्रिया सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. अगदी नोकरी, व्यवसाय, संरक्षण दल, विमानदल, राजकारण या सर्व क्षेत्रात त्यांचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं आहे.
एखादी स्त्री सुंदर असली आणि तिच्यात काही गुणच नसतील तर काय उपयोग? जी सर्वांना सांभाळून घेईल, नाती जपेल, घरातील वृध्दांना सांभाळेल, पतीला समर्थ साथ देईल अशीच स्त्री गृहस्वामिनी होऊ शकेल. स्त्रीचं सौंदर्य हा तिचा अलंकार असला तरी, ते सौंदर्य तिचा दोष ठरु नये. हल्ली एकतर्फी प्रेमातून स्त्रिया, तरुणी यांचा विनयभंग, त्यांच्या हत्या घडतात. तेंव्हा वाटतं हे सौंदर्य स्त्रीचा शाप ठरले काय? त्याचबरोबर मुलींनी पण आपल्या वागण्या बोलण्यावर मर्यादा ठेवावी. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील पुसटशी रेघ सुस्पष्टपणे लक्षात ठेवावी. वारेमाप नखरे करून देहस्विनी न बनता गुणांनी परिपूर्ण अशी मनस्विनी बनण्याचा प्रयत्न करावा. स्त्रीने आंतरिक सौंदर्य वाढविले तरच ती खऱ्या अर्थानं ‘रुपगर्विता’ ठरेल. आज ‘काव्य त्रिवेणी’ स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘रुपगर्विता’ हा विषय आत्मपरीक्षणासाठी दिला आहे. शिलेदारांनी पण भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!
*????️’पाऊसधारा’ कवी संमेलनात आपली रचना सादर करण्यासाठी नोंदणी करू शकता. 7385363088????️*
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह



