मराठीचे शिलेदार संस्थेच्या ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२५’चे थाटात प्रकाशन
मराठी वाचन संस्कृतीसाठी हा अंक आठवणीचा ठेवा असल्याचे मान्यवरांचे मत
मराठीचे शिलेदार संस्थेच्या ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२५’चे थाटात प्रकाशन
साहित्य व प्रसार माध्यम क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
संस्थेच्या दहाव्या दिवाळी अंकात १११ साहित्यिकांचा समावेश
मराठी वाचन संस्कृतीसाठी हा अंक आठवणीचा ठेवा असल्याचे मान्यवरांचे मत
शहर प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय व प्रकाशन संस्था, नागपूर तर्फे दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या दिवाळी अंकाचे यंदाचे दहावे वर्ष असून, यावर्षीचा ‘साहित्यगंध दीपोत्सव २०२५’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन (दि. १ नोव्हे.) आय. टी. पार्क येथील कार्यालयात शहरातील साहित्यिक व प्रसार माध्यमातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाले.
मराठीचे शिलेदार संस्थेचे अध्यक्ष व साहित्यगंध दीपोत्सव २०२५ चे मुख्य संपादक राहुल पाटील यांच्या अथक प्रयत्नातून साकार झालेल्या दीपोत्सव या अंकांच्या प्रकाशन समारंभास अध्यक्ष सुरेंद्र नितनवरे, प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर पवार, अभिषेक आचार्य, डॉ. आशीष उजवणे, कु. आर्या आचार्य व प्रकाशक राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शहरातील साहित्यिक व प्रसार माध्यमातील या दिग्गज मान्यवारांच्या हस्ते साहित्यगंध दीपोत्सव २०२५ या दिवाळी अंकाचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचा मराठीचे शिलेदार संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. अंक विमोचनानंतर सर्वच मान्यवरांनी दीपोत्सव २०२५ चे कौतुक करत आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आणि अंकास शुभेच्छा दिल्यात. साहित्यक्षेत्रातील सर्वच लेखकांना या अंकात सहभागी करून त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केल्याचे संपादक राहुल पाटील यांनी सांगितले. तर या दिवाळी अंकात तब्बल १११ साहित्यिकांच्या लेखणीचा समावेश करण्यात आला असून, संपादकीय टीमने केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी आयटी क्षेत्रातील वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





