“जिगर मा बडी आग है!” : डॅा अनिल पावशेकर
स्तंभलेखक व क्रीडा समीक्षक, नागपूर
“जिगर मा बडी आग है!” : डॅा अनिल पावशेकर
स्तंभलेखक व क्रीडा समीक्षक, नागपूर
भारत आणि ॲास्ट्रेलिया संघातील टी ट्वेंटीचे द्वंद्व सुरू झाले असून पहिला सामना वरूणराजाला समर्पित झाला तर दुसऱ्या सामन्यात कांगारूंची सरशी झाली आहे. एक दिवसीय मालिके पाठोपाठ टी ट्वेंटीतही भारतीय संघ पिछाडीवर असून उर्वरित तीन सामन्यात आपल्या संघाकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. आशिया चषक ते ॲास्ट्रेलिया दौरा हे अंतर भारतीय संघाने लगेच गाठले परंतु मंद संथ खेळपट्टी आणि वेगवान उसळत्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा कस लागत आहे. पुरेसे सराव सामने नसल्याने आणि काही खेळाडू प्रथमच ॲास्ट्रेलिया दौरा करत असल्याने त्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर दिसून येत आहे.
झाले काय तर एकदिवसीय मालिका जरी भारताने गमावली असली तरीही तिसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत थोडीफार अब्रु राखली होती. त्यातच भारतीय महिलांनी ॲास्ट्रेलियाच्या महिला संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य सामन्यात पराभूत केल्याने भारतीय पाठीराख्यांना हुरूप आला होता. शिवाय भारतीय संघाने पहिल्या टी ट्वेंटीत भलेही सामना पावसामुळे रद्द झाला असला तरीही उत्तम सुरुवात केली होती. त्यामुळे तशीच कामगिरी दुसऱ्या टी ट्वेंटीत अपेक्षित होती. मात्र प्रत्येक सामना हा नवीन असतो, नवनवे चॅलेंज असतात आणि प्रत्येक सामन्यात नव्याने सुरुवात करावी लागते. पहिल्या सामन्यात पेस अॅंड बाऊंस सोबत मिले सुर मेरा तुम्हारा करणारी गील सूर्याची जोडी दुसऱ्या सामन्यात संपूर्णपणे निष्प्रभ ठरली.
अभिषेक शर्मा, गील आणि सूर्या हे आघाडीचे तीन खेळाडू भारतीय संघाचे तन मन धन आहे. या तिघांवर डावाचा टेम्पो सेट करणे, पडझडीत सावरणे याची जबाबदारी असते. पहिल्या टी ट्वेंटीत अभिषेक स्वस्तात निपटल्यावर गील सूर्याने सुपरफास्ट खेळी करत डाव पुढे नेला होता. विशेषतः गील चे लेग ला जाऊन षटकार मारणे असो की सूर्याने हेझलवुडला स्क्वेअर लेगला ठोकलेला उत्तुंग षटकार असो. दोन्ही खेळाडूंनी सुरेख फुटवर्क करत झकास फटकेबाजी केली होती. पावसाचा वारंवार व्यत्यय येऊनही या दोघांनी सामन्यात रंगत आणली होती. मात्र यांच्या फटकेबाजीला अखेर पावसाने मुरड घातली आणि पहिला टी ट्वेंटी पावसाच्या नावे राहिला.
पहिल्या सामन्यात पाऊस कोसळला तर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी. एकतर हेझलवुडची अचूक लाईन अॅंड लेंथ आणि सोबतीला पीच चा बाऊंस ॲंड पेस! भारतीय टॅाप ॲार्डरसाठी ही तारेवरची कसरत होती. त्यातही गील हा मिडॅान, मिडॅाफचा गिर्हाईक आहे. मग ती २०२३ ची फायनल असो की आशिया चषक ची फायनल किंवा या सामन्यात असो, मिडॅान मिडॅानला झेलबाद होणे हा गील चा आवडता छंद. तर सूर्याचा ओपन स्टान्स, क्रिझच्या आत राहून, पाय न हलवता तो हेझलवुडच्या अचुकतेचा सामना कसाकाय करणार? त्यातही एक जीवदान मिळूनही मेलबोर्नला भारतीय कर्णधाराचा सूर्य मावळला. जितका वेळ सूर्याने स्टान्स घ्यायला लावला तेवढा वेळ तो क्रिझवर टिकू शकला नाही.
या सामन्यात टॅाप ॲार्डरच्या भाऊगर्दीत संजू सॅमसन ला अचानक घुसवण्यात आले. तो आला केंव्हा गेला केंव्हा कळलेच नाही. हेझलवूड आग ओकत असताना चेंडू हलत होता पण संजू सॅमसनचे पाय हललेच नाही. भारतीय फलंदाजांचे इनकमींग आऊटगोईंग ज्या गतीने चालू होते ते पाहता डकवर्थ लुईस जोडी बिना पावसाची सामना थांबवण्याती शक्यता होती. अर्धा संघ अर्धशतकाच्या आत तंबूत परतल्याने सामन्याचे भविष्य सांगायला ज्योतिष्याची गरज नव्हती. पण ॲास्ट्रेलियाच्या तंबूचे कळस कापण्याची धमक असलेला एकमेव खेळाडू अभिषेक अजूनही मैदानात उभा होता. गरज होती त्याला कोणीतरी साथ देण्याची. मात्र ज्याप्रकारे आपले मतदार “माझ्या राजा” ला साथ देत नाहीत तसेच उर्वरित फलंदाजांनी केले. एकमेव हर्षित राणाने जीगरी खेळी करत अभिषेकला साथ दिली आणि आपल्या संघाने सव्वाशेचा टप्पा गाठला.
अभिषेक शर्माचे नक्कीच कौतुक करावे लागेल. कारण हेझलवूडच्या आगीवर मात करत त्याने स्फोटक फलंदाजी केली. मैदानात चोहोबाजुंनी टोलेबाजी करत त्याने ॲासी आक्रमणाचा सामना केला. सामना कुठेही असो, प्रतिस्पर्धी गोलंदाज कोणीही असो, त्याच्या तडाख्यातून कोणीही सुटू शकत नाही. आक्रमण करण्याची जी मानसिकता असते, ती त्याच्यात ठासून भरली आहे. “अटॅक इज बेस्ट डिफेन्स” या ब्रीदवाक्याला जागून त्याने कांगारूंशी एकाकी झुंज दिली. भलेही आपला संघ सव्वाशेत आटोपला परंतु अभिषेकची झुंजार खेळी या पराभवातही उठून दिसली.
आजकाल टी ट्वेंटीत जिथे दोनशे धावांची नवलाई राहिली नाही, तिथे सव्वाशे धावा ॲासींच्या खिजगणतीतही नसणार. हेड मिचेल मार्शच्या जोडीने ते दाखवूनही दिले. एखाद्या फलंदाजाने जरी चाळीशी गाठली तरी सव्वाशेचे टारगेट सहजसाध्य होते. मग ॲासी कर्णधार तरी कसा मागे राहणार? त्याने भारतीय गोलंदाजांचा फडशा पाडत सामना एकतर्फी केला. भारतीय गोलंदाजांना सूर गवसेपर्यंत सामना कांगारूंच्या खिशात (पाऊचमध्ये) गेला होता. कुलदीप, बुमराहने “हुजूर आते आते बहोत देर” केली होती. टॅाप ॲार्डर कोसळताच उर्वरित फलंदाजांनी संयम राखला नाही. अभिषेकने खिंड जरूर लढवली परंतु परतीचे दोर कांगारूंनी केंव्हाच कापले होते.
अभिषेकने “जीगरमा बडी आग है” हे दाखवून दिले होते पण दुसऱ्या टोकाला इतर फलंदाजांनी “जागते रहो, मेरे भरोसे मत रहो” केल्याने हा सामना आपल्या हातून निसटला. ॲासी गोलंदाज अनप्लेयेबल आहेत असे अजिबात नाही. हेझलवूड सोडला तर त्यांचे इतर गोलंदाज आक्रमक फलंदाजीपुढे नमतात. शिवाय त्यांच्याकडे दर्जेदार फिरकीपटू नाहीत. त्यामुळे पुढील सामन्यात हेझलवूडचे चार षटक सावधपणे खेळून इतर गोलंदाजांना टार्गेट केले तर काही चांगले रिझल्ट मिळू शकतील. मात्र त्याकरिता टॅाप ॲार्डरला पडझड झाली तरी इतर फलंदाजांनी हाराकिरी करू नये. तेंव्हाच कुठे आपला संघ मालिकेत कमबॅक करू शकतो.
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com





