आयुष्यातील मी स्वीकारलेला हाच ‘तो’ पहिला सन्मान
मुख्य संपादक व संस्थापक:राहुल पाटील

आयुष्यातील मी स्वीकारलेला हाच ‘तो’ पहिला सन्मान
बघितला ना… सन्मान..!! हाच तो सत्कार माझा..!! ही भेटवस्तू म्हणजेच आयुष्यातील पहिला सत्कार. मी आजवर सन्मान, सत्कार अनेकांचा केलाय. पण माझा सत्कार करावं असं कुणाला तरी सुचणे हे अविस्मरणीय..!! सत्कार करणारे हात व मनगट मजबूत असायला हवे. मागील दहा वर्षात अनेक भव्य दिव्य असे संस्थेचे यशस्वी कार्यक्रम झालेत. पण कुणीही माझा सत्कार करावा वगैरे कुणाही आयोजकाच्या मनात आले नाही. परंतु छत्रपती संभाजीनगर आयोजन समितीने जो पुढाकार घेऊन राज्यस्तरीय पुस्तक प्रकाशन समारंभ यशस्वी केला तो आजवरच्या कारकीर्दीतील मोठे संमेलन म्हणावे लागेल. तद्वतच त्यांनीच हा माझा जाहिररित्या सत्कार करून मला व माझ्या कुटुंबाला अविस्मरणीय भेट दिली यातच आम्ही कृतकृत्य झालोय.
सत्काराचे साहित्य पाहताच हर्षिताने ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करीत मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा तगादा लावला. पल्लवीने पण भावूक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची दर्शनी भागात स्थापना केली. असा आनंद देणारी आयोजन समिती लाभल्याने तिनेही आभार व्यक्त केले. ‘गौरव अभिजात मराठी २०२५’ आयोजन समितीच्या डॉ. पद्माताई जाधव वाखुरे, व्याख्याते अकिल पठाण, वर्षा मोटे पंडित, विष्णू संकपाळ, प्रशांत ठाकरे यांच्या कार्यास मानाचा मुजरा. या सर्व समितीस सहकार्य करणा-या सविता पाटील ठाकरे यांच्या कार्याचे मोलही न मोजता येणारे. आपणा सर्व महान कर्मयोगीच्या आशीर्वादाने हा सन्मान प्राप्त झाल्याचा आनंद शब्दात मोजता येणे ‘मराठीचे शिलेदार’ संस्थेस अशक्य आहे.
आपण सर्वांनी यंदा आपल्या भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याचा आनंद द्विगुणीत करतांना एका लहान असलेल्या मराठीच्या पाईक रत्नास सन्मानित केले. हाच आपल्या मनाचा मोठेपणा यातून दिसून येतो. खरे तर आजवर राज्यातील अनेक संस्था, संघटनांनी मला पुरस्कार, सन्मान स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले, परंतु मराठीचे शिलेदार परिवार हा पुरस्कार स्वीकारणारा नसून इतरांचा सन्मान, सत्कार करणारा परिवार असल्याने मी आजवर कुणाचाही सत्कार स्वीकारला नाही. परंतु आपण सर्व आयोजकांनी दिलेला सन्मान हा आमच्या कुटुंबासाठी अनमोल असा आहे. आपले सहकार्य असेच कायम रहावे. आम्ही आपल्या कायम ऋणात राहू इच्छितो.
मुख्य संपादक
राहुल पाटील
=======