“समृद्धी साधणारा पूल अद्याप कमकुवतच”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
“समृद्धी साधणारा पूल अद्याप कमकुवतच”; विष्णू संकपाळ
शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण
संपूर्ण जीवसृष्टी, अन्नसाखळी आणि निसर्गाला ऊर्जितावस्था देणार्या पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो तो म्हणजे बळीराजा. कृषिप्रधान देश म्हणून ख्याती असलेल्या भारतातच कृषकांची इतकी वाईट अवस्था आहे की, दुबार तिबार पेरणी, अतिवृष्टी अनावृष्टी अशी संकटे झेलत त्यासाठी कर्जबाजारी होवून त्यालाच आत्महत्या करावी लागते याहून मोठे दुर्दैव कृषीप्रधान राष्ट्राचे अजून काय असू शकते..?
खेडो पाड्यात, वाड्या वस्तीत, शेत शिवारात राहून चरितार्थ चालविणाऱ्या शेतक-यांना भरपावसात ही जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुटपुंजी साधन संसाधने हाताशी धरून त्यावर पोटाचं ओझे लादत राडी चिखलातून वाट काढत बाजारगाव गाठावे लागते. खाली चिखल वरून पाऊस. भाजीपाल्याची पोती गाडीवर लादून कसाबसा तोल सावरत प्रवास करणे. पुढे दलालांच्या कचाट्यात सापडणे. आपला माल तुटपुंज्या पैशाच्या बदल्यात त्यांच्या ताब्यात देणे. प्रसंगी तोटा पत्करणे, आणि नफ्याची मलई दलालांनी खाणे हे चक्र नित्याचेच झाले आहे. स्वतः विक्री करायचे म्हंटले तर पगारदार गिर्हाईक सुद्धा एका जूडीसाठी घासाघीस करते.. शेवटी कष्टकर्याची कदर आहेच कुणाला? थोडे विकणे थोडे फैकणे आणि कधी उपाशी कधी अर्धपोटी अवस्थेत बाडबिस्तारा गुंडाळून आडोशाला धाव घेणे. याच दुष्ट चक्रात आयुष्य भरडून निघतय.शेवटी “गरीबी ते समृद्धीशी सांधणारा पूलच कमकुवत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.”
काल शुक्रवारीय हायकू काव्य स्पर्धेकरीता आदरणीय राहूल दादांनी दिलेले चित्र या सर्व विदारकतेचे जिवंत दर्शन घडवते. रस्त्याची दैन्यावस्था झालेला एक पूल आणि त्यातून दूचाकीवर क्षमतेपेक्षा जास्त ओझे लादून वाट काढत जाणारा शेतकरी, ही म्हणजे जगण्याची जीवघेणी कसरतच आहे. आजच्या स्पर्धेत अनेकांनी हायकूच्या माध्यमातून भावस्पर्शी व्यथा वेदना मांडल्या. आपल्या आजूबाजूला घडणार्या घटना घडामोवर मार्मिक भाष्य केले आणि एका ज्वलंत विषयाला ऐरणीवर आणले… सर्वांच्या लेखणीला भरभरून शुभेच्छा. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहुल दादांचे आभार…
विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



