Breaking
आरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरनाशिकपरीक्षण लेखमहाराष्ट्रसंपादकीयसाहित्यगंध

“संकटे ही तेजस्वितेची शत्रू नसून तिची प्रसूतिगृहे आहेत”; प्रशांत ठाकरे

शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 5 8 5 5 3

“संकटे ही तेजस्वितेची शत्रू नसून तिची प्रसूतिगृहे आहेत”; प्रशांत ठाकरे

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“तमसो मा ज्योतिर्गमय” अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी ही प्रार्थना मानवी जीवनाच्या चिरंतन आकांक्षेचे प्रतीक आहे. बाह्य अंधकार सूर्याच्या एका किरणाने निवळतो. परंतु अंतःकरणातील अज्ञान, अहंकार, भीती आणि नैराश्याचा अंधकार दूर करण्यासाठी प्रज्वलित करावी लागते प्रज्ञेची ज्योत. या अंतःप्रकाशाचे नाव म्हणजे तेजस्विता. ‘तेजस्विता’ म्हणजे केवळ मुखमंडलावर झळकणारे तेज नव्हे, वाणीतील प्रभाव नव्हे किंवा यशाभोवतीची झगमगाटी प्रभा नव्हे. ‘तेजस्विता म्हणजे आत्म्याच्या गाभाऱ्यात प्रज्वलित झालेली अशी अखंड अग्निशिखा, जिच्या प्रकाशात विचारांना दिशा, कृतीला पावित्र्य आणि जीवनाला अर्थ प्राप्त होतो’.

जीवन प्रत्येकाच्या वाट्याला सारखे येत नाही. कुणाच्या वाटेवर पुष्पपखरण असते, तर कुणाला काटेरी पायवाट स्वतः निर्माण करावी लागते. परंतु व्यक्तिमत्त्वाची खरी परीक्षा सुखाच्या सावलीत होत नाही तर ती संघर्षाच्या रणभूमीवर होते. अग्निसंस्काराशिवाय सुवर्णाला कुंदनत्व येत नाही. घर्षणाशिवाय मणीला प्रभा प्राप्त होत नाही. अगदी त्याचप्रमाणे संघर्षाशिवाय मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाला खरी झळाळी प्राप्त होत नाही. म्हणून, ‘संकटे ही तेजस्वीतेची शत्रू नसतात तर ती तिची प्रसूतिगृहे असतात’.

वादळ आले म्हणून दीप विझायलाच हवा असे नाही. काही दीप वाऱ्याशी झुंजता झुंजता अधिकच प्रज्वलित होतात. अपयश मनुष्याला मोडण्यासाठी येते असे वाटते, परंतु तेच त्याला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख करून देते. तेजस्विता प्रज्ञेशिवाय अपूर्ण आहे, बुद्धिमत्ता माहिती देते, प्रज्ञा विवेक देते, ज्ञान सामर्थ्य देते. विवेक त्या सामर्थ्याला योग्य दिशा देतो, म्हणून तेजस्वी मनुष्य केवळ बहुश्रुत नसतो , तर तो विवेकशील, आत्मपरीक्षक आणि मूल्यनिष्ठ असतो.

परंतु तेज आणि अहंकार यांच्यातील सीमारेषा अत्यंत सूक्ष्म आहे. सूर्य प्रकाश देतो, पण आपल्या प्रकाशाचा गर्व कधीही करत नाही, वृक्ष सावली देतो पण तिचे श्रेय मागत नाही. खरे तेज निःस्पृह असते. सामर्थ्याला विनयाची, ज्ञानाला करुणेची आणि कर्तृत्वाला चारित्र्याची जोड मिळाली की व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने तेजोमय होते.

आजच्या झगमगाटाच्या युगात प्रकाश विपुल आहे, पण अंतःउजेड दुर्मिळ आहे. माहितीचे महासागर आपल्या हातात आहेत, पण विवेकाचा थेंब शोधण्यासाठी मनुष्य तहानलेला आहे. म्हणून आपल्याला केवळ यशस्वी नव्हे, तर मूल्यनिष्ठ माणसे हवी आहेत, केवळ बुद्धिमान नव्हे तर प्रज्ञावान माणसे हवी आहेत.

एका दीपापासून हजार दीप प्रज्वलित झाले तरी पहिल्या दीपाचा प्रकाश कमी होत नाही. प्रकाश वाटला की तो क्षीण होत नाही तो विस्तारतो. म्हणून जीवनाची खरी सार्थकता स्वतःभोवती प्रकाशाची वलये निर्माण करण्यात नसते तर स्वतःच्या प्रकाशाने दुसऱ्याची वाट उजळण्यात असते.
अंधार कितीही गडद असो, वादळ कितीही प्रचंड असो अंतःकरणातील एक दीप पुरेसा असतो.

जळू नका—उजळा.
चमकू नका—प्रकाश द्या.
उंचावू नका—उन्नत करा.

‘माणूस निघून जातो पण त्याची तेजस्विता त्याच्या कर्तृत्वातून काळाच्या कपाळावर अक्षय अक्षरांनी लिहिली जाते’. म्हणून तर चारशे वर्षानंतर ही छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिक तेजस्विता आजही महाराष्ट्राच्या कड्यात कपाऱ्यात गुंजते आहे. तेव्हा विचारांमधील तेजस्विता हीच जीवनाची साधना, हीच चारित्र्याची प्रभा आणि हीच खरी तेजस्विता! आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘तेजस्विता’ हा विषय दिला. सर्वांनी विषयाला योग्य तो न्याय दिला यानिमित्ताने सर्वच समूहामध्ये कवितांचा जणू तेजस्वी प्रकाश पसरला. असाच काव्यप्रकाश निरंतर काव्यविश्व तेजस्वी करो हीच अपेक्षा तुम्हा सर्वांचे खूप खूप कौतुक…!!

प्रशांत ठाकरे, सिलवासा
मुख्य परीक्षक/ लेखक/ समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 8 5 5 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे