“न्यायाच्या रथाची चाके फिरवणारी शक्ती बहुमतात असते: प्रशांत ठाकरे
शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“न्यायाच्या रथाची चाके फिरवणारी शक्ती बहुमतात असते: प्रशांत ठाकरे
शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
लोकशाही म्हणजे… समानतेची स्पंदने, स्वातंत्र्याची शपथ, आणि जनतेच्या हातातल्या एका मतातून जगण्याला नवी दिशा देणारी लोकमान्यतेची उजळलेली ज्योत. लोकशाहीच्या या विराट संकल्पनेतील “बहुमताने” हा शब्द म्हणजे जनतेच्या मनातील धगधगता अग्निकुंड. जणू अराजकतेच्या काळोख्या गुहेत लावलेली तेजस्वी मशाल….!! न्यायाच्या रथाची चाके फिरवणारी शक्ती आणि… जनतेच्या आवाजाला अधिकार बनविणारी अचलमुद्रा होत..! खरंतर लोकशाही म्हणजे जनतेच्या आत्म्याची अभिव्यक्ती आणि त्या अभिव्यक्तीला आकार देते ते म्हणजे बहुमत. हेच बहुमत लोकशाहीच्या आकाशात नीतीचा सूर्य उगवतं व समाजाच्या मार्गावर प्रकाश टाकते.
मराठीवर प्रेम करणाऱ्या तमाम बंधू-भगिनींनो..! खरंतर बिहार राज्याचा विधानसभेचा कालचा निकाल व त्यांना लगेचच काव्यांगणात देण्यात आलेले स्थान हा अफलातून समन्वय केवळ मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरच साधू शकतात. तेव्हाच तर शनिवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी सरांनी “बहुमताने “हा विषय देऊन कवी मनांना साद घातली. आपण लोकशाही देशातील जागरूक नागरिक आहोत तेव्हा हा विषय कसा दुर्लक्षित करू ?
बहुमत हा जबाबदारीच्या करंगळीवर मावणारा. परंतु हृदयावर कोरला जाणारा करार आहे, त्याच कराराच्या जोरावर कोणतीही राष्ट्र नीतीमतेच्या नक्षत्रांनी उजळलेल्या आकाशाप्रमाणे प्रगतीकडे झेपावते. तसं पाहता हा शब्द जरी आपण उच्चारला तरी लोकशाहीच्या विशाल स्थापतत्याची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. या स्थापत्याच्या विटा केवळ संख्येवर नाही तर त्यात मानवी विवेक, विविधतेचा सन्मान आणि मूल्यनिष्ठा याचा महत्त्वाचा वाटा आहे.
लोकशाहीचे खरे तेज बहुमताच्या सामर्थ्यात नाही तर त्यामागील निष्पक्ष प्रक्रियेत आहे. हे जरी संख्या व सत्य यांच्या नात्याची शोध घेणारे असले तरी यात एक गंभीर साधनाही पहावयास मिळते ज्यास विवेकाची किनार नेहमीच लाभलेली असते. तेव्हा”बहुमताने” या विषयाला न्याय देताना आपले कवी कवयित्री कसे बरे मागे राहतील, आजच्या काव्यस्तंभ स्पर्धेसाठी सर्व कवी कवयित्रींनी या विषयाला पूर्णपणे न्याय दिला व प्रत्येकाच्या सर्जनशीलतेतून विविधअंगी काव्य सजवले गेले. तेव्हा सर्व कविमनांचे मनापासून खूप खूप. पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद.
प्रशांत दत्तात्रेय ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक/ लेखक/समीक्षक
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह





