0
4
8
2
9
3
फिनिक्स
गाळून घाम कष्टाचा
वाटले कमवावा दाम
पण रिकाम्या हातांना
मिळेना कुठे काम..१
वाढत्या कर्जाने त्याचा
जीव झाला बेजार
जगण्याचा आता त्यास
वाटू लागला भार..२
वाटली जवळची त्याला
दोरी गळफासाची
काटली दोर त्याने
झटकन आयुष्याची..३
त्याच्या चितेबरोबर झाली
तिच्या स्वप्नांची होळी..
भेगाळल्या भुईपरी
दु:खच लिहिलं भाळी..४
तिलाही वाटू लागले
जगून काय करावं..
पण लेकरांकडं बघताच वाटे
दु:खालाही पुरून उरावं..५
त्याच राखेतून तिने
घेतली झेप आभाळी..
लेकरांसाठी माय ती
फिनिक्स पक्षी झाली..!!६
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
=======
0
4
8
2
9
3



