Breaking
आरोग्य व शिक्षणकविताकृषीवार्ताकोकणक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरपरीक्षण लेखमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“कालबाह्य झाले पारंपारिक तंत्र, आले आधुनिक मळणी यंत्र”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय 'हायकू' काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 6 3 2 9 2

“कालबाह्य झाले पारंपारिक तंत्र, आले आधुनिक मळणी यंत्र”; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय ‘हायकू’ काव्यस्पर्धेचे परीक्षण

सुप्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांनी लिहिलय, “या नभाने या भुईला दान द्यावे, आणि या मातीतूनी चैतन्य गावे., कोणती पुण्य अशी आली फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे”. बळीराजाच्या हिरव्या स्वप्नाचे प्रतिबिंब उमटलेले हे शब्द म्हणजे बळीच्या कष्टपूर्तीचे मनमोहक चित्रच. “सुगी” हा शब्द फक्त दोनच अक्षरी मात्र यातले समाधान आभाळात मावणार नाही इतके मोठे असते. वैशाखापासून ते कार्तिक पर्यंत जीवाचे रान करणार्‍या बळीराजाला याच सुगीची प्रतिक्षा असते. जमिनीत पेरलेल्या बीजाचा पहिला कोवळा कोंब ते पोटरीत भरलेली टप्पोरी कणसे पाहताना कृतार्थतेचे भाव त्याच्या डोळ्यात उमटतात. कापणी करताना दाण्याचा एक कणही लोंबीतून खाली पडू नये याची काळजी घेत घेत खळ्यावर (व्हळी) गंजी रचला जाते. आणि बैलांच्या मदतीने रातभर मळणी करून जेव्हा पिंजर बाहेर फेकले जाते, तेव्हा उरलेली रास पाहताना बळीला आभाळ ठेंगणं होतं.

बायका पोरांच्या, गडी माणसांच्या मदतीने दिवसभर खळ्यात खपून, धान्य वारे देऊन, वाळवून खळ्याच्या मधोमध देखणी रास केली जाते. उजव्या हातात सुप घेऊन डाव्या हाताची बोटे उजव्या हाताच्या खोपराला लावत धान्याच्या राशीभोवती एक शुभ सूचक चित्ररेषा उमटवली जाते. दहीभाताचा नैवेद्य, नारळ फोडून खोबऱ्याच्या वाटीत गुळाचा खडा ठेवून, अगरबत्ती दाखवून मोत्याच्या राशीची आणि मातीच्या उपकाराची पूजा करूनच देवाचे नाव घेत एक एक पोते धान्याने भरले जाते. आणि पेरणी ते मळणी या प्रवासाची यशस्वी सांगता होते.

चाळीस वर्षांपूर्वीचे मळणीचे हे चित्र आज डोळ्यासमोर उभे राहिले. मात्र जनावरांच्या मदतीने होणारी कष्टदायक मळणी आता कालबाह्य झाली. आणि यंत्राच्या सहाय्याने सहज सोपी जलद व्यवस्था अस्तित्वात आली. कमी वेळात सुरक्षित मळणी आता होत आहे. खेड्यापाड्यातही आजकाल जनावरांचे प्रमाण आणि राबणारे हात दुर्मिळ झाल्याने हा बदल सर्वांनीच स्वीकारला आहे. अर्थात मळणी कोणत्याही पद्धतीने असली, तरी भावना मात्र त्याच आहेत. एका दाण्यातून पसाभर दाणे देणार्‍या मातीप्रती अपार कृतज्ञता भाव. अंतःकरणात अपूर्व समाधान. आणि धान्याच्या पोत्यांनी भरलेले घर म्हणजे समृद्धीचे प्रतिक हे सर्व काही आजही तेच आहे.

कधीकाळी लंगोट, फाटके तुटके धोतर, डोक्याला मुंडाशे अशा अवस्थेत वावरणारा बळीराजा आज बहुतांश भागात पँंटशर्ट, टोपी अशा पोशाखात दिसतोय. मात्र मातीत कसणारा आणि जगाचा पोशिंदा म्हणणार्‍या बळीच्या भावना त्याच आहेत. शेती आधुनिक झाली असली तरी अस्मानी सुल्तानीचे जीवघेणे वार आजही तो झेलतो आहे. शेतीत गुंतवलेली मुद्दल सुद्धा काहीच्या हातात येत नाही. परिणामी आत्महत्येचे प्रकार वाढले आहेत. कृषिप्रधान देशातच कृषीधोरणाची कमतरता भासते. अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी दुष्काळात भरडतो आहेच. यांत्रिकिकरणाच्या युगात शेती व्यवसायाला बळ देणारे प्रकल्प राबवणे काळाची गरज आहे.

काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरिता आ. राहुल दादांनी दिलेले चित्र अशाच एका मळणी यंत्राचे आहे. जिथे धान्याच्या पिकाची गंजी, बाजूला स्री पुरूष शेतकरी, आणि मळणी होत असल्याचे दिसते आहे. दिवाळीच्या आसपास कोकण व विदर्भात भात पिक काढणीला जोर येतो. या दिवसात बळीच्या परिवाराची प्रचंड व्यस्तता असते. चित्र आणि त्यामागील भावना सर्वांनाच चिरपरिचित आहेत. त्यामुळे अपेक्षित हायकू रचनांची मेजवानी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र विषय सोपा असूनही तुलनेत रचना खूप कमी आल्या आहेत. कृपया सर्वांनी स्पर्धा असो की दैनंदिन लेखन. सातत्याने करत रहावे. मला परीक्षणाची संधी दिल्याबद्दल आ. राहुल दादांचे मनःपूर्वक आभार.

श्री विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
मुख्य परीक्षक/लेखक/ कविवर्य
©सहप्रशासक,मराठीचे शिलेदार समूह

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 2 9 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे