Breaking
अहमदनगरई-पेपरकोकणनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

नाम तुझे घेता देवा होई समाधान; अनिता व्यवहारे

कवयित्री लेखिका

0 4 0 9 0 3

नाम तुझे घेता देवा होई समाधान

नावात काय आहे? असं शेक्सपिअर यांनी म्हटलं होतं. आणि असं आपल्यातही बऱ्याच जणांना वाटतं. पण माझ्या मते, ‘मनुष्य आयुष्यात ओळखला जातो तो त्याच्या नावाने’. कोणी म्हणतं , त्याच्या कर्माने. आपलं नाव आणि आपली ओळख ही तशी कमी काळ टिकते. परंतु कर्माने झालेली ओळख अमरत्व प्राप्त करून आलेली असते. परंतु कर्म करताना सुद्धा प्रत्येकाचे असे नियम ठरलेले असतात.
दान करणं हे पुण्य म्हणून एखादा आपल्याकडे काही मागायला येईल त्याला देतच राहावे का? आणि मग द्यायचं असेल तर, तो मागतो काय याला देखील तितकंच महत्त्व असतं. अन्न मागितलं तर अवश्य द्यावं. मग आपल्याकडे फारसे नसले तरी; आहे त्यातलं थोडं तरी द्यावं. पण पैसे देताना मात्र आपण आपली परिस्थिती देणाऱ्याची गरज पाहून द्यायला हरकत नसावी. आपलं नाव हे झालं आपल्या जन्माची ओळख. पण आज मी ‘भगवंताच्या नामा’ विषयी आपल्याशी बोलते आहे. नामस्मरण…!.परमेश्वराचे नामस्मरण.!

‘नाम तुझे घेता देवा होई समाधान’ आणि याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते. आजकाल प्रत्येक संकटाच्या वेळी आपण परमेश्वराच्या नावाचा धावा म्हणजे जप करतो. आपल्याकडे एखादा माणूस आजारी असला तरी त्याला आपण डॉक्टरकडे घेऊन जातो, त्या वेळी माणसात असलेले दैवरूपी डॉक्टर त्यांच्या वैद्यकशास्त्राच्या ज्ञानाच्या जोरावर भरपूर प्रयत्न करतात. परंतु जेव्हा त्यांच्या हातातून सर्व गोष्टी निसटायला लागतात तेव्हा ते म्हणतात आम्ही आमचे प्रयत्न केले; पण, आकाशाकडे बोट दाखवतात आणि म्हणतात आता त्याच्यावर भगवंताच्या हातात आहे सर्व.. त्याच्यावर भरवसा ठेवा आणि मग सुरू होतं. ‘देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे राम नामावर’

या नामातून साध्य होणार असतो तो स्वार्थ. त्यातून घडणार असतो तो परमार्थ….! मनुष्य आस्तिक असो वा नास्तिक त्याच्यावर आलेली परिस्थिती त्याला देव असल्याची प्रचीती देते.या नामाचे हृदयात जतन करा आणि मग बघा ‘मुखी असावे नाम निरंतर, त्याने होईल प्रेम जतन’. आपल्याला तरी आपल्या आयुष्यात जीवन जगताना अनेक गोष्टींची गरज असते पण भगवंताला मात्र प्रेमाशिवाय कशाची गरज भासत नाही.आणि आपल्याला तर त्याचे नाव प्रेमाने घेता येत नाही. “केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा.” हेच आपल्याला पचनी पडत नाही.

एखाद्याच्या सान्निध्यात आपण जास्त काळ राहिलो तर नक्कीच प्रेम निर्माण होते. कधी कधी आपण रेल्वेनं दोन-तीन तास प्रवास करतो. आपल्या बरोबर इतरही प्रवासी असतात. त्या दोन दिवसाच्या सहवासातून प्रेम निर्माण होतं. कुणी असं म्हणेल देहाशी आपला अनंत जन्माचा सहवास असतो म्हणून देहावर प्रेम जडते. पण ही देहाची आसक्ती म्हणजे विषयाची आसक्ती असते. आपलं आपल्या बायका मुलावर प्रेम असतं त्यासाठी आपण कोणताही त्याग करतो. मग ‘परमेश्वराच्या नामासाठी आपण वासनेचा त्याग का करू नये..’

कोरोना महामारीच्या काळात आपण खूप काही शिकलो. पैसा हे सर्वस्व मानणारे आपण आज पैशाशिवाय जगतो आहोत. अनंत असणाऱ्या गरजा आता एकांताच्या गरजेवर भागवत आहोत. एक वेळ जेवायला नसले तरी चालेल परंतु माझी माणसं माझ्याजवळ हवीत. असं वाटायला लागलय.!काय लागतं जगायला हे आता कळलय.! प्रेम आणि प्रेमचं लागतं…! कलियुगात ‘भगवंताचा अवतार नसला तरी; नामावतार आहेतच की..’ तोच आपला खरा तारक असल्याची आज जाणीव होते आहे. आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची धरलेली कास मृत्युसमयी भगवंताची भेट करून देईल. म्हणूनच कायम हे स्मरणात ठेवावे ‘केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा..’!

अनिता व्यवहारे
ता श्रीरामपूर जि अहमदनगर
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे