मधुसूदन घाणेकर यांना ‘पसायदान’ पुरस्कार जाहिर
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

‘मधुसूदन घाणेकर यांना ‘पसायदान’ पुरस्कार जाहिर
वर्ल्ड क्वीन बीज , साहित्य गौरव आणि पलिंगो भाषा संस्थानचे आयोजन
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे : (दि 5 जुलै) डाॅ.मधुसूदन घाणेकर हे काव्य, हौशी पत्रकारिता, तसेच संपादन आणि ज्योतिष शास्त्रात पन्नास वर्षांहून अधिक काळ अविरतपणे कार्य करीत आहेत. त्यांच्या दैदीप्यमान कार्यासाठी वर्ल्ड क्वीन बीज, साहित्य गौरव आणि पलिंगो भाषा संस्थान ह्या तीन संस्थांतर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना
‘ पसायदान ‘ पुरस्काराने जाहिररित्या सन्मानित करण्यात येणार असल्याचे मुख्य निमंत्रक मधुकर्णिका सारिका सासवडे, ऋचा कर्वे आणि भावना गुप्ता यांनी कळवले आहे.
सदर सोहळ्याचे औचित्य साधून डाॅ.मधुसूदन घाणेकर लिखित दत्तायन, हसायन आणि हास्यचित्रायन
अशा तीन पुस्तकांबरोबरच त्यांनी संपादित विश्वविक्रमी ‘ डहाळी ‘ विशेषांकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक मंदाताई नाईक, भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग आणि भारतीय विचारधारा संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष भारती महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी डहाळी अंकासह यापूर्वी अनेक दिवाळी.अंक, मासिके, स्मरणिका तसेच भारतीय मजदूर संघाचे मजदूर वार्ता या संदर्भात हौशी पत्रकार, संपादक म्हणून निरपेक्षपणे योगदान दिले आहे.काव्य क्षेत्रात त्यांच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत.पहिले विश्व काव्य संमेलन, पहिले विश्व साहित्य संमेलन,पहिली आंतरराष्ट्रीय गझल परिषद, ऑनलाईन आंतरराष्ट्रीय कवयित्री संमेलन, आंतरराष्ट्रीय ग्रामीण साहित्य संमेलन आदि महत्वपूर्ण 90 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.त्यांची काव्यसंग्रहांसह विविध विषयांवर 250 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
ज्योतिष तसेच हस्ताक्षर मनोविश्लेषण विषयक भारतासह 20 देशात त्यांची व्याख्याने आणि एकपात्री कार्यक्रम झाले आहेत. महिला.ज्योतिर्विद, युनिव्हर्सल अॅस्ट्रॉलॉजिकल फौंडेशन, हॅन्डरायटिंग ॲनॅलिसिस रिसर्च फाऊंडेशन या संस्था डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्थापन केल्या.ज्योतिष विषयक ज्योतिष महामहोपाध्याय ही सर्वोच्च उपाधिही प्राप्त झाली. हस्ताक्षर मनोविश्लेषण विषयक प्रदीर्घकालिन संशोधनपर प्रबंधास श्रीलंकेच्या ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीकडून 1997 मधे डाॅक्टरेट प्राप्त झाली. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाच्या प्रेरणेतून डाॅ.घाणेकर देशविदेशात सातत्याने विश्वजोडो अभियानातून मानवधर्माचा प्रसार सातत्याने करीत आहेत.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या सन्मान सोहळ्या निमित्त निम॔त्रितांचे काव्यसंमेलनही आयोजित केले असून त्यात वसुधा नाईक, प्रिया दामले , अजया मुळीक, दीपराणी गोसावी, शिवाजी उराडे , रविन्द्र गाडगीळ, किरण जोशी, गणपत तरंगे, बाबा ठाकूर , नंदकिशोर गावडे, रसिका कुलकर्णी, स्वाती यादव, राजश्री सोले आदि मान्यवर कविता सादर करणार आहेत.हा कार्यक्रम भारतीय विकास साधना , लिमये वाडी सदाशिव पेठ पुणे येथे शुक्रवार
दिनांक 11 जुलै 2025 रोजी
सायंकाळी 5 वाजता होणार आहे.