‘झाडखाऊंच्या सरपण, सरणासाठी तरी वृक्षतोड थांबवून झाडभाऊ होऊ या’; स्वाती मराडे
'गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘झाडखाऊंच्या सरपण, सरणासाठी तरी वृक्षतोड थांबवून झाडभाऊ होऊ या’; स्वाती मराडे
‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
तपोवन तयार करायचंय.. ‘वन.. !!!’ नावात वन आहे पण त्यासाठी काय करायचं माहिती आहे का ? वन तोडायचं आहे आणि जागा साफ करायची आहे. खरंच पटतंय का हे मनाला? जे आधीपासूनच रानावनात राहतात त्यांच्यासाठी वन तोडायचे व उजाड रान करायचे हा विचारही मनाला यातना देतोय ना ? वृक्षवल्लीस सगेसोयरे मानणारी आपली संस्कृती. वृक्षांचं पूजन करणारी.. त्यांच्यासाठी सण उत्सव साजरे करणारे आपण.. वैचारिकतेत एवढा कसा बदल झाला. त्याच सांस्कृतिक वारशाला जपायचे की वृक्षांवरच घाव घालून तोडायचे. खरेच चिंतनीय प्रश्न आहे. याच धर्तीवर आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आम्ही ‘झाड’खाऊ हा विषय आला नि खरोखरच आपली मानवी जमात झाडखाऊ आहे असे वाटायला लागले.
एक बीज स्वतःला गाडून घेतं, अंकुरतं, बहरतं, वाढतं. ऊन, वारा, पाऊस यांच्याकडून कधी लाड करून घेतं तर कधी उन्हाचा चटका, कधी बेभान वारा तर कधी पावसाचा मारा सहन करत उभा राहतं. त्याला कुठे तमा असते स्वतःची. ‘देणाराने देत जावे’ ही उक्ती तर मानवापेक्षा झाडेच जास्त जगतात. पाखरे त्याच्या अंगाखांद्यावर खेळतात. निवारा तयार करतात. पाखरांना घरपण देणारी ही झाडे, जो जवळ येईल त्याला सावली देतात. मानवाला तर फूल, फळ, मध, डिंक, औषधे प्रत्यक्षपणे देतात; जमिनीची धूप थांबवणे, ओल टिकवून ठेवणे, वातावरणात गारवा ठेवणे, प्रदूषण कमी करणे, ‘प्राण’वायू देणे, पावसाचे ढग अडवून पाऊस पडण्यास मदत करणे, यासारखी अप्रत्यक्ष मदतही करतात.
आयुष्यभर माणूस त्याच्याकडून घेतच राहतो. शेवटी येतं मरण तेव्हाही तेच येतं मदतीला. त्याचंच सरपण.. रचतंं याचं सरण. मरणानंतरही त्या झाडाची सोबत शेवटपर्यंत लाभते. तरीही.. तरीही.. तो इतका कृतघ्न होतोच कसा ? खरेच विचार करून मन खिन्न होते. स्पर्धा विषयातील चित्रात.. मोठा बुंधा असणारे झाड तोडताना दमलेला तो माणूस त्याच झाडाच्या सावलीत झोप घेत आहे. मारणारालाही झाड विश्रांतीसाठी सावली देऊन तारतच आहे किती हा परोपकार.
नका तोडू झाडे, त्याचे परोपकार आठवूया
आपण झाडखाऊ नव्हे तर, झाडभाऊ म्हणून वागूया.
नको नको रे माणसा देऊ, त्याच्या काळजावर घाव
खूप काही दिलंय त्यानं, मरणाआधी तू एकतरी झाड लाव
या विषयावर आपण सर्व सारस्वतांनी लिहिलेल्या रचनाही लक्षवेधीच.
“सावलीच्या रूपातील मातृहात,
आम्ही ‘झाड’खाऊ कापून टाकतो,
धमन्यांतील हरित रक्त शोषून,
जणू आईचा श्वासच रोखतो…”
‘सवू’ताईच्या या ओळी किती हृदयस्पर्शी आहेत. मनात संवेदन जागवून हळहळ निर्माण करणाऱ्या. अशाच वृक्षांविषयी संवेदन जागवणाऱ्या रचनांनी मनास स्पर्श केला. आत्मचिंतन करायला लावणाऱ्या आजच्या विषयावर आपण सर्वांनीच उत्स्फूर्त लेखन केलेत. सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ.स्वाती मराडे, इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/कवयित्री/लेखिका
©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



