“टीम इंडियाचा डबल धमाका” : डॅा अनिल पावशेकर
क्रीडा समीक्षक व स्तंभलेखक, नागपूर
“टीम इंडियाचा डबल धमाका” : डॅा अनिल पावशेकर
क्रीडा समीक्षक व स्तंभलेखक, नागपूर
दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इंडियाच्या दोन्ही संघांनी क्रिकेटचे मैदान गाजवत डबल धमाका केला आहे. पुरुष संघाने तिसऱ्या टी ट्वेंटीत अटीतटीच्या सामन्यात ॲास्ट्रेलियाला धूळ चारली तर महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषकात द. आफ्रिकेवर ५२ धावांनी मात करत प्रथमच विश्वचषक पटकावला आहे. होबार्टला झालेल्या रोमांचक सामन्यात भारतीय फलंदाजांनी निकराची लढत देत सामना खेचून आणला तर महिला संघाने दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करत पहिलावहिला विश्वचषक जिंकला आहे.
झाले काय तर टी ट्वेंटी मालिकेत ॲासी संघाने मेलबोर्नचा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे मालिका जीवंत ठेवण्यासाठी भारतीय संघाला तिसरा सामना जिंकणे गरजेचे होते. त्यातही ॲासींचा धोकादायक गोलंदाज हेझलवूड नसल्याने भारतीय संघाचे दडपण कमी झाले होते तर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात तब्बल तीन बदल केले होते. संजू सॅमसन, कुलदीप आणि हर्षित राणा ऐवजी अर्शदीप, जितेश शर्मा आणि वॅाशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे होबार्टची पीच फलंदाजीला पोषक होती. तिथे मेलबोर्नसारखा ना स्पॅांजी बाउन्स होता ना पेस.
सूर्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली आणि अर्शदीपने तो टी ट्वेंटीत अग्रगणी गोलंदाज का आहे हे पहिल्याच षटकात दाखवून दिले. धोकादायक हेड आणि नंतर जॅाश इंग्लिशला चकवत त्याने टीम इंडीयाला झकास सुरुवात करून दिली. मात्र दोन गडी झटपट बाद झाले तरी मैदानात मिचेल मार्श, टीम डेव्हिडची खतरनााक जोडी उभी होती. खरेतर कांगारूंच्या मुसक्या आवळण्याची नामी संधी टीम इंडियाला मिळाली होती परंतु बुमराहच्या गोलंदाजीत वॅाशिंग्टन सुंदरने टीम डेव्हिडला जीवदान दिले. ॲासींसाठी हा टर्निंग पॉइंट ठरला. टीम डेव्हिडने लेग ला स्टान्स घेत ॲाफ साईडला तांडव न्रुत्य केले. त्याने अवघ्या ३८ चेंडूत ७४ धावां कुटत टीम इंडियाला बॅकफुटवर ढकलले.
भलेही नवव्या षटकात वरूण चक्रवर्तीने मिचेल मार्श, ओवेनला लागोपाठ बाद केले परंतु स्टोईनिसने भारतीय गोलंदाजांना उसंत घेऊ दिली नाही. त्यानेही ३९ चेंडूत ६४ धावांची वेगवान खेळी करत टीम इंडीयाच्या तोंडचे पाणी पळवले. अखेर अर्शदीपने त्याचा झंझावाती खेळी संपुष्टात आणली मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. ॲासी फलंदाजांनी घणाघाती फटकेबाजी करत तब्बल २० चौकार आणि ८ षटकार ठोकले. म्हणजे त्यांच्या १८६ धावसंख्येत ६८% धावा (१२८ धावा) ह्या चौकार षटकारांनी वसूल केल्या होत्या. वास्तविकत: या मैदानावर टी ट्वेंटीत सरासरी पाऊने दोनशे धावांचा आकडा असतो, ॲासींनी तो ओलांडलताच त्यांच्या जिंकण्याची शक्यता वाढली होती.
खरेतर हेझलवूड नसल्याने आणि विकेट बॅटर फ्रेंडली असल्याने ॲासी गोलंदाज म्हणजे दातनख काढलेला वनराज होता. मात्र त्यांनी कल्पकतेने चेंज ॲाफ पेस आणि वेरीएशनने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मुख्य म्हणजे प्रारंभीच अभिषेक शर्माला बाऊंसरवर टिपत नॅथन इलीसने आपली चुणूक दाखवली होती. लगेचच त्याने शुभमन गील ला पायचीतात पकडून भारतीय संघात धडधड वाढवली. तोपर्यंत कर्णधार सूर्या उजाडला होता पण त्याला मालवायला स्टोईनिसनला फारसे परिश्रम करावे लागले नाही. तर नॅथन इलीसने पुन्हा एकदा चतुराईने अक्षर पटेलला बाऊंसरवर नतमस्तक व्हायला भाग पाडले.
११४ धावांवर चार बाद होताच चांगल्या मॅचचा पचका होतो की काय अशी भीती वाटत होती कारण मैदानात तिलक वर्मा जरूर होता परंतु तो तेवढा कॅान्फिडन्ट वाटत नव्हता. तर वॅाशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि शिवम दुबेला प्रस्थापित फिनिशर म्हणता येत नाही. अस्सल फिनिशर म्हणजे हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग. पांड्या संघात नाही तर रिंकू सिंग ला संघात स्थान मिळत नाही. खरेतर संघात फिनिशर नसणे, हीच आपल्या संघाची कमजोर कडी आहे. पूर्वार्धात वॅाशिंग्टनने टीम डेव्हिडचा झेल सोडण्याचे महापाप केले होते आणि त्याला गरज होती याचे पापमार्जन करण्याची.
त्याच्यासमोर तुम्ही ने दर्द दिया, तुम्ही दवां देना हा पर्याय उपलब्ध होता. अखेर तो आपल्या कर्तव्याला जागला तिलक वर्मा सोबत १९ चेंडूत ३४ धावांची आणि जितेश शर्मा सोबत ३५ चेंडूत नाबाद ४३ धावांची भागीदारी करत सामना ॲासींच्या तोंडातून हिसकावून घेतला. धावगती वाढली असताना आणि सेट फलंदाज तिलक वर्मा चुकीचा फटका मारून बाद झाला तरी वॅाशिंग्टनने अवघ्या २३ चेंडूत ४९ धावा करून सामना जिंकून दिला. १४ व्या षटकात त्याने लागोपाठ एक चौकार आणि दोन षटकार ठोकत सिन ॲबॅाटला चौदावे रत्न दाखवले. त्याला शेवटी साथ देणाऱ्या जितेश शर्माचे कौतुक करावे लागले. प्रचंड दबावात त्याने १३ चेंडूत २२ धावा करत आपला विजय सुकर केला.
तर दुसरीकडे महिला संघाने द. आफ्रिकेला लोळवून विश्वचषक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे. मात्र ही वाट खाचखळग्यांची होती. साखळी फेरीत लागोपाठ तीन सामने गमावल्याने भारतीय संघाचे खाते बुडीत खात्यात होते. पण न्युझीलंड विरुद्ध विजयाने भारतीय संघाचे मनोबल उंचावले होते तर बलाढ्य ॲास्ट्रेलियाला सेमीफायनलला हरवताच तिथे फायनल जिंकायची बीजे रोवली गेली होती. कारण ॲासी म्हणजे बॅास संघ, तुलनेत फायनलला द. आफ्रिकेचा संघ म्हणजे अर्धे टेंशन दूर.
स्म्रुती आणि शेफालीने भक्कम सुरुवात करून दिली आणि त्यामुळे आपल्या संघाला तीनशेच्या जवळ पोहोचता आले. विशेषत: शेफाली आणि रिचा घोष यांनी जबरदस्त पॅावर हिटींग करत मैदान दणाणून सोडले. तर अष्टपैलू दिप्तीने अर्धशतक झळकावून आपली उपयुक्तता सिद्ध केली. सेमीफायनलची यशस्वी जोडी जेमीमा आणि हरमनप्रीत फायनलला फलंदाजीत चमक दाखवू शकले नाहीत. तरीपण फायनलला पाठलाग करताना जवळपास तीनशेचे टारगेट म्हणजे निश्चितच कठीण होते.
अर्धशतक करणाऱ्या शेफाली आणि दिप्तीने फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजीतही धमाल केली. शेफाली ने दोन तर दिप्तीने पाच विकेट्स घेत द.आफ्रिकेला शरणागती पत्करायला लावली. द.आफ्रिकेची कर्णधार लॅारा वेलवार्डने शतकी प्रतिकार केला परंतु तिचा हा प्रयत्न तोकडा पडला. फलंदाजीत फारशी चमक न दाखवणार्या अमनज्योतने पहिला रन आउट आणि लॅारा वोलवार्डचा अफलातून झेल घेत क्षेत्ररक्षणात चमक दाखवली. निश्चितच क्षेत्ररक्षणात दोन्ही संघानी ढिसाळपणा दाखवला परंतु फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीय महिला वरचढ ठरल्याने त्या विश्वचषकाच्या हकदार ठरल्या.
थोडक्यात काय तर आपल्या दोन्ही संघांनी सुपर संडेला सुपरहीट कामगिरी करून देशवासियांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. आपल्या महिला संघाची कामगिरी पाहता “म्हारी छोरीयां किसी छोरोंसे कम नहीं” असे म्हणावे लागेल. यापूर्वीही भारतीय महिला संघाने फायनल पर्यंत मजल मारली होती, मात्र प्रयत्न अपुरे पडले होते. यावेळी मात्र जिद्दीने पेटून उठत त्यांनी इतिहास घडवला आहे. २०२५ चा हा दिग्विजय महिला क्रिकेटच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरला आहे. जेवढे महत्त्व १९८३ च्या विजयाचे आहे, अगदी तितकेच महत्त्व २०२५ च्या विजयाचे आहे. भारतीय क्रिकेटच्या दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन.
दिनांक ०३ नोव्हेंबर २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com





