टीम इंडिया विश्वविजेता; डॅा अनिल पावशेकर
ज्येष्ठ स्तंभलेखक व क्रीडा समीक्षक
टीम इंडिया विश्वविजेता; डॅा अनिल पावशेकर
ज्येष्ठ स्तंभलेखक व क्रीडा समीक्षक
२०२६ टी ट्वेंटी विश्वचषक अंतिम सामन्यात टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडचा दारुण पराभव केला आहे. स्टेडियमवर भारतीय प्रेक्षकांना गप्प करण्याच्या वल्गना करणाऱ्या इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाच्या कर्णधारांचे दात टीम इंडियाने आपल्या दणदणीत कामगिरीने त्यांच्याच घशात घातले आहेत. इंग्रजीत एक म्हण आहे, देअर आर नॅाट बॅड सोल्जर्स, देअर आर बॅड जनरल्स. म्हणण्याचे तात्पर्य की विश्वचषकाचा अंतिम सामना असताना किवी कर्णधार सॅंटनरने कर्णधार पदाच्या भिकार कामगिरीने त्यांच्या संघाचा बट्ट्याबोळ केला आहे. उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असलेल्या किवी संघाचा सॅटनरने चुकीचे निर्णय घेतल्याने फायनलला पाय खोलात गेला आहे.
झाले काय तर फायनलची पीच सुद्धा वानखेडे सारखी बाऊंस आणि पेस असलेली होती. त्यातही फायनलला पाठलाग करणाऱ्या संघावर दडपण असते. अशा परिस्थितीत टॅास जिंकून पहिले फलंदाजी करणे शहाणपणाचे होते. सोबतच सेमिफायनलला दणक्यात अडीचशे धावा करणाऱ्या टीम इंडियाच्या हाती सॅटनरने आयते कोलीत दिले. या संधीचा भारतीय संघाने पुरेपूर फायदा घेतला. खरेतर ओपनिंगला समोर ॲाफ स्पिनर आला की अभिषेक चाचपडतो. मात्र या सामन्यात त्याने बऱ्यापैकी संयम दाखवला. पहिला ओव्हर मॅट हेन्री तर दुसरा ग्लेन फिलिप्स ने उत्तम टाकला होता. या दोन षटकात केवळ १२ धावा निघाल्या होत्या. मॅट हेन्रीची लाईन लेंथ तर फिलिप्सच्या ॲक्युरसीने आपले सलामीवीर थबकले होती. प्रेशर संजू अभिषेक वर असताना सॅटनरने विनाकारक गोलंदाजीत बेक्कार बदल केले आणि टीम इंडियासाठी फ्लड गेट्स उघडले.
हेन्रीच्या जागी डफी येताच दोन्ही सलामीवीरांनी न्यूझीलंडची डफली वाजवने सुरू केले. फॅार्म साठी झगडणार्या अभिषेकने संजू सोबत तुफानी खेळी केली. या दोघांच्या झंजावातात बिचारा लॅाकी फर्ग्युसन सापडला. पुन्हा एकदा सॅटनरने मॅट हेन्रीला पाचारण केले परंतु तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. हेन्री फलंदाजांना बाद करण्यापेक्षा मार कसा कमी पडेल यासाठी वाईड गोलंदाजी करत होता, शेवटी तो वाईडग्रस्त झाला पण काही केल्या त्याला सलामीवीरांनी दाद दिली नाही. अभिषेक अर्धशतकी खेळी करून परतला पण न्यूझीलंड चे दु:ख काही कमी झाले नव्हते. येणारा इशान त्याच्यापेक्षा तिखट निघाला. त्याने संजूसोबत ४८ चेंडूत १०५ धावांची भागीदारी करत अडीचशेचा पाया रचला.
पहिले फलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य, फलंदाजीला साजेशी खेळपट्टी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या भरवश्यावर भारतीय फलंदाजांनी किवी गोलंदाजांचा फडशा पाडला. विशेषत: संजू सॅमसने तर कहर केला. विंडीज, इंग्लंड पाठोपाठ त्याने फायनलला शतकाचा विचार न करता, वैयक्तिक धावसंख्येला महत्त्व न देता जबरदस्त फटकेबाजी करत तिन्ही सामन्यात लाजवाब खेळी केल्या. यापूर्वी विराट जी स्ट्रेंथ, स्थिरता आणि डावाला आकार द्यायचा, तेच काम संजू सलामीला येऊन करत आहे. त्याने गेल्या पाच डावात जवळपास सव्वातीनशे धावा काढल्या. सामन्याच्या १६ व्या षटकात निशमने संजू इशान आणि सूर्याला बाद करत सामन्यात थोडंफार थ्रिल आणलं होतं परंतु शेवटी दुबेने अवघ्या आठ चेंडूत २९ धावा वसूल करून हिशोब चुकता केला.
फायनलला अडीचशे धावांचे टार्गेट कधीच सोपे नसते. त्यातही त्यांची मुख्य मदार सेफर्ट आणि ॲलन या जोडीवर होती. या दोघांनी सेमीफायनलला द.आफ्रिकेला तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला होता. मात्र इथे परिस्थिती वेगळी होती. जवळपास तेराच्या स्ट्राईक रेटवर धावा करणे अवघड होते. शिवाय बुमराहचे चार ओव्हर म्हणजे निव्वळ सासुरवास, ना धावा निघतात, ना मोकळे खेळता येत ना विकेट वाचवता येते. बुमराह यायच्या अगोदर इतर गोलंदाजांना टार्गेट करताना बरेचदा अर्शदीप पांड्या किंवा अक्षर बळी टिपतो. त्यातही तुरळक अपवाद वगळता ग्राऊंड फिल्डिंग, कॅचींग मध्ये सुधारणा झाल्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांची नाकाबंदी झालेली असते.
धोकादायक ॲलनला जीवदान मिळाले परंतु तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही तर रचिन रविंद्रला बुमराहने लिलया फसवले. सेम टू सेम सेमिफायनलला जसे हॅरी ब्रुकला चकवले होते. हे दोन बळी जाताच किवी संघ बॅकफूटवर आला तो कायमचाच. यानंतर ते सामन्यातून जवळपास बेदखल झाले होते. टीम सेफर्टने थोडाफार प्रतिकार केला परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. न्यूझीलंड खेळाडू केंव्हाचेच मनाने पराभूत झाले होते. केवळ सामना संपण्याची औपचारिकता बाकी होती ती बुमराहने पूर्ण केली.
थोडक्यात काय तर जगज्जेतेपदात संजूच्या सलामीच्या खेळींनी प्रमुख भूमिका बजावली. तर त्याला तोलामोलाची साथ दिली इशानने. खरेतर हे दोन्ही खेळाडू या संघात फर्स्ट प्रिफरंस नव्हते परंतु या दोघांनीही आपली निवड सार्थ ठरवली. तर फिनिशिंग टच दिले तिलक आणि दुबे ने. दुबेच्या छोटेखानी पण उपयुक्त खेळी कौतुकास्पद आहेत. हार्दिक पांड्या भलेही फलंदाजीत फारसा चमकला नाही परंतु ती कसर त्याने गोलंदाजीत भरून काढली. अक्षर पटेल गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात नाव कमावून गेला पण वरूणला मात्र अखेरपर्यंत सूर गवसला नाही. आईसींग ॲान दी केक होता बुमराह.
त्याचे स्लोअर वन, धारदार यॅार्कर फलंदाजांसाठी अगम्य होते. हेटमायर, रोस्टन चेस, हॅरी ब्रुक आणि रचिन रविंद्र या दिग्गज फलंदाजांना त्याने सहज फसवले. या चौघांनाही बाद झाल्यापेक्षा फसवल्या गेल्याचे दुःख असेल. सामना कुठलाही असो, प्रतिस्पर्धी संघ , फलंदाज कोणताही असो, सगळ्यावर रामबाण इलाज एकच, तो म्हणजे बुमराह. कोणत्याही कर्णधाराला हवाहवासा वाटणारा बुमराह टीम इंडियासाठी ‘हारे का सहारा, बुमराह हमारा’ आहे. यासोबतच सूर्या फलंदाजीत फारसा चमकला नसला तरीही त्याचे काही निर्णय, मैदानावरील सहज वावर आणि सांघिक कामगिरीने त्याची कर्णधारपदाची खुर्ची शाबूत राहील यात वाद नाही. एकंदरीत हे विजेतेपद एकट्या दुकट्या खेळाडूच्या भरवश्यावर नव्हे तर ते सांघिक कामगिरीचे फळ होय!
—————————————————
दिनांक ०९ मार्च २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar169@gmail.com
—————————————————



