ओळखलं ना..? ‘खंत नाही, पण सध्याच्या जगण्याचं वास्तव आहे’; स्वाती मराडे
'गुरूवारीय चित्र चारोळी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण
ओळखलं ना..? ‘खंत नाही, पण सध्याच्या जगण्याचं वास्तव आहे’; स्वाती मराडे
‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण
‘जन्म झाला की जीवाचा प्रवास सुरू होतो’. पण कुठे जायचे, कसे जायचे, कधी पोहोचणार याची काहीच कल्पना नसते. कारण जवळ तिकीट नसते ना..! जीवनप्रवास सुरू होतो.. बालपण, तरूणपण, म्हातारपण अशी ठराविक अंतराने वेगवेगळी गावे लागतात. या गावात पोहोचणार की नाही हे मात्र माहीत नसते. बरं या गावात पोहोचलं तरी बालपण रम्य असणार की खडतर, तरूणपण संघर्षाने भरलेले असेल की यशोगाथेने भारलेले असेल, पैलतीराकडे नेणारे म्हातारपण सुखद असेल की घुसमट करणारे.. आणि या सगळ्यासाठी कोणती किंमत मोजावी लागणार ? अश्रुंची की हास्याची, हर्षाची की यातनेची? काही काही कल्पना नसते.
पण जेव्हा हातात तिकीट येते ना त्यावर मात्र कुठे बसला? कुठे जाणार? किती रूपये द्यावे लागणार? हे सगळं कळतं. त्यावर असणा-या अंकावर केलेल्या पंचिंगने. हे तिकीट म्हणजे बसचे बरं का.. ओळखलं काय..? अनेक आठवणी आहेत त्यासोबत.. मग का नाही ओळखणार?
ओळखलं काय? मी कोण
तुमच्या प्रवासाचा सोबती
मला पाहताच आठवल्या ना
प्रवासातील गमतीजमती..!
‘एक फुल एक हाफ’ असे म्हणत आई जेव्हा तिकीट घ्यायची. तेव्हा वाटायचं हाफ म्हणजे अर्धे. पण दोन्ही तिकीट पाहिले की वाटायचे, दोन्ही तर सारखीच दिसत आहेत. यात अर्ध तिकीट कुठंय.. मग फुल आणि हाफ कसे ओळखायचे? त्यावर लिहिलेल्या किंमतीच्या अंकावरून ते ओळखतात हे नंतर नंतर समजू लागले. या तिकीटासाठी सुट्टे पैसे जवळ ठेवावे लागतातच याचाही नंतर शोध लागला. हे तिकीट आपले ठिकाण येईपर्यंत सांभाळून ठेवायचे असते हेही इतरांच्या अनुभवावरून का होईना पण लक्षात आले. हीच तिकीटे आम्ही लहानपणी घरातही जपून ठेवत असू. किंमतीनुसार त्याचे वेगवेगळे गठ्ठे व्हायचे आणि हेच आमचे खेळातील पैसे असायचे. कुणी कसा वापर करेल सांगता येत नाही तसंच आमचंही होतं.
प्रवासात गप्पा मारता मारता झालेल्या ओळखीतून पत्ता किंवा फोन नंबर घ्यायचा असेल तर कित्येकजण तिकीटच्या मागे तो लिहून घ्यायचे. कुणी छंद म्हणून तिकीटांचा संग्रह करायचे, त्यातही एक वेगळेपण वाटायचे. कारण तेव्हा मिळणारी तिकीटे वेगवेगळ्या रंगात मिळायची आतासारखी सगळी एकजात नव्हे. शिवाय प्रत्येकांसाठी वेगळं तिकीट असायचं त्यामुळे संख्येने जास्त मिळायची. मी ते निरखून पाहत असताना जणू मला तिकीट सांगत होते. ‘सगळे बदलले त्यात मीही. आता माझं रूप डिजीटल झालंय. धावपळीच्या युगात मीही माझं रंगोत्सवाचं जगणं विसरून गेलोय. आता केवळ एकच रंग आहे सोबतीला. कायम धावत राहण्याचाच असावा कदाचित..!’ खंत नाही पण सध्याच्या जगण्याचं वास्तव आहे हे.
आज ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेसाठी आलेले चित्र ‘बस तिकीटाचे.’ सगळ्यांच्या बालपणातील आठवणींचा भाग असणारे. त्यामुळे अनेक आठवणी मनात रुंजी घालत लेखणीतून शब्दरूप झाल्या. कालौघात आठवकप्प्यात दडले असले, तरी चित्र पाहताच कप्पा उघडून बाहेर पडत चारोळी रूपात ते अवतरले. सर्वांच्या रचना कल्पकतेने सजलेल्या. सहभागी सर्व रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन.
आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.
सौ स्वाती मराडे,इंदापूर जि.पुणे
मुख्य परीक्षक/लेखिका/कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह