कौतुक : शब्दांच्या पलीकडले सामर्थ्य…!
अनिता अनिल व्यवहारे
कौतुक : शब्दांच्या पलीकडले सामर्थ्य…!
‘कौतुक’ करायला फक्त दोनच शब्द लागतात आणि तेच जगणं बदलवतात. माणूस फुलतो कारण कौतुकाचा तो क्षण… आणि त्याच्या आयुष्याला देतो वेगळे वळण… ‘तृप्ती देव’ यांचा साध कौतुक..एक जादुई शब्द…! हा लेख वाचला त्यात सासू-सुना अगदी सहज साध्या शब्दात एकमेकींचे कौतुक करतात.आणि त्यातून दोघींचं नातं बहरत जातं.अन् एकमेकांच्यावर अलगदपणे कौतुकांचे संस्कार घडत जातात आणि त्याचा परिणाम फक्त घरातल्या माणसांवर नव्हे तर आप्तइष्ट, शेजारीपाजारी यांच्यावरही घडून येतो. आणि एकमेकांच्या आपुलकीच्या नात्यांचा प्रेमाचा फुलोरा फुलत जातो.
कौतुक ही शब्दाची महती नसून शब्दांच्या पलीकडलं सामर्थ्य त्यात आहे. यावरून तर कळलीआणि माझ्या मनाची विचारधारा या शब्दाभोवती फिरू लागली. उमजलं की कौतुक हे केवळ शब्दांची सजावट नाही तर त्या व्यक्तीच्या कार्याला दिलेली ती सलामी आहे. शाळेत शिकवत असताना कवी ‘कुसुमाग्रजां’ची एक कविता होती ‘कणा’.. शब्द त्यातले पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा..! सांगताना खूप वेळा मुलांना शाब्बासकीच्या, कौतुकाच्या,आधाराच्या धीराच्या ओळींबद्दल सांगत होते पण या कौतुकाचा इतिहास इतका खोलवर जाऊन मनाला भिडला नव्हता. जितका तृप्ती देव यांच्या लेखानंतर भिडला. आणि हल्ली म्हणाल तर हा शब्द माझ्या जीवन प्रवासातील आनंदाला उधाण आणणारा…!विद्येची देवता माझ्यावर प्रसन्न झाली आणि माझी बालिश लेखणी लिहिता लिहिता प्रौढ होत गेली. शब्दांमध्ये जणू जादू भरली. व्हाट्सअप च्या माध्यमातून मी लिहू लागले. सर्वांचे लेखन वाचू लागले.. वाचल्यानंतर, “खूप छान..” “लय भारी…!” “एकच नंबर” या प्रतिक्रिया देता देता त्यातील शब्द संख्या वाढत गेली. त्याचा मतीतार्थ कौतुकापर्यंत गेला. ज्याचा लेख होता त्याला आनंद वाटू लागला. त्यावेळी कळलं की, कोणतही बक्षीस न देता एखाद्याच्या मनातलं आनंदाचा झरा पाझरवतो ते शब्द म्हणजे कौतुक. ते लेखाला सुशोभित करतात त्यावर प्रतिक्रिया देऊन.लेखनाइतक्याच त्याहीपेक्षा जास्त प्रभावशाली प्रतिक्रिया जेव्हा मिळतात.तेव्हा आपोआप हे कौतुक..केवळ एक स्तुती नसून ती असते आत्म्याला मिळणारी स्फूर्ती. कौतुक केल्याने समोरच्यांचा आत्मविश्वास वाढतो नव्हे, तर तो दुणावतो.
जसं संस्कारच ब्रिज प्रेमाने रुजतं
तसं कौतुकाचे दान मंन टवटवीत करतं.
मी पेशांना शिक्षिका .. असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, प्रेरणा मिळावी, आत्मविश्वास वा ढावा यासाठी मीचं नव्हे तर सर्व शिक्षक अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधील देखील कौतुकाचे गाठोडे बांधत असतो. त्यांना आमचं कौतुकाचं बोलणं हवं असं वाटतं.त्यांच्या प्रयत्नांना त्यातूनच खरं बळ मिळतं… मला आठवतं बरीच वर्ष झाली असतील. शाळेत अशाच धावण्याच्या वर्गवार स्पर्धा घेतल्या होत्या. नेहमीच जिंकण्याची सवय लागलेला एक विद्यार्थी थोड्याशा फरकाने हरला, मागे राहिला. आणि मग काय अपमानाचे अंगार मनात फुलू लागले, स्वतःचा राग अनावर झाला डोळ्यातील पाण्याचे पाट दुःखाश्रू बनून खळखळ वाहू लागले, परत सहभागी न होण्याची भीष्मप्रतिज्ञा तो आता करणार…!तेव्हा त्या छोट्याशा जीवाला धीर देण्यासाठी मी त्याला जवळ घेतलं. त्या प्रसंगी चपखल पणे बसत नव्हता तरी हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं| असा डायलॉग मारला. त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला म्हटलं, ‘अरे हरला म्हणून काय झालं पण तुझी धावण्याची स्टाईल जरा हटकेच होती बरं.. तू धावत होता तेव्हा तूच नंबर मिळवणार’ अस वाटत होतं. अशी कौतुका ची शब्द सुमनं उधळली.. अर्थात कौतुक हा अत्यंत हृदय स्पर्शी आणि मोलाचा शब्द आहे. त्याचा अर्थ केवळ स्फूर्ती किंवा प्रशंसा इतकाच मर्यादित नाही तर त्यातून आपुलकी, गौरव मनापासूनचा आनंदही सामावलेला असतो. त्यामुळेच ती कौतुकाची थाप खांद्यावर पडली आणि हरल्यावरही जिंकण्याचं बळ त्याला मिळालं.
म्हणूनच सांगावसं वाटतं की, कौतुक म्हणजे एखाद्याच्या कृतिशीलतेचं मनापासून अभिनंदन करणं. एवढंच नव्हे तर, त्याच्या मेहनत प्रामाणिकपणाला सन्मानानं गौरवणं असतं. त्यातून त्याच्या चांगुलपणाला खत पाणी मिळतं.आपुलकीने दिलेली ती एक मान्यता असते. सध्या मी देखील या कौतुकाच्या वर्षावाने भारावून गेली आहे. सेवानिवृत्तीनंतरच्या माझ्या प्रगतीचा आलेख उंचावण्याचं खास कारण म्हणजे माझं होणार कौतुक..! आप्तेष्ट,मित्र मैत्रिणी, वाचक, समूह सदस्यच नव्हे तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे माझ्या पदरात सर्वात जास्त कौतुकाचा अनमोल दान पडते ते माझ्या विद्यार्थ्यांकडून, थोडसंचं असतं त्यांचं बोलण तेच मनात ठेवते मी अनमोल समजून..!!
उभी राहिले मी निवृत्तीनंतरही
नवी स्वप्न ऊराशी बाळगून
तुम्हीही बघा एकदा अनुभवून..!
कौतुक हे प्रेमासारखं असतं
देणाऱ्यालाही समाधान
आणि घेणाऱ्यालाही उमेद देतं.
म्हणूनच
स्पर्धा नको प्रेरणा हवी
टीका नको कौतुक हवं
देईल तुम्हाला ते
जगण्याचं बळ नवं….!
अनिता अनिल व्यवहारे
ता. श्रीरामपूर जि अहिल्यानगर
(कवयित्री, लेखिका या निवृत्त शिक्षिका आहेत)



