कार्ले लेणी
स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे
कार्ले लेणी
कार्ला लेणी हे भारतामधील सर्वात मोठे हिनायन बौद्ध चैत्य (मंदिर) आहे. ज्याची उभारणी सातवाहनाच्या राजवटीत करण्यात आली. हे बोरघाटात स्थित आहे. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. या वास्तूचे २००० वर्षे जुन्या लाकडी तुळया अजूनही शाबूत आहेत. इ.स.पू. १ ते इ. स. ५ वे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला १९०९ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि. मी. अंतरावर आहे.
$कार्ले लेणी’ हा सोळा बौद्ध लेण्यांचा गट असून त्यात एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कदाचित येथे सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात सम्राट अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे.
इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे स्त्री पुरुष जोड्या असलेली शिल्प, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्यकमानी आदि गोष्टी दिसून येतात. शिल्पांतील स्त्रियांच्या डोक्यावर पदर घेतलेला दिसतो. तसेच कमरेला शेला आहे. पुरुषाने धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातले आहे. स्त्रियांच्या हातात बांगड्या आहेत. तसेच पायातील विविध आकाराचे तोडे, कमरेवरच्या मेखला, गळ्यातील मण्यांचे हार, कर्णफुले, कपाळावरची कुंकू अशी आभूषणे दिसून येतात. सज्ज्याच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रासादांचे देखावे आहेत. याच्या तळाशी दोन्ही बाजूला तीन हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. यातील डाव्या बाजूकडील हत्तींवर पुढे गौतम बुद्धाच्या मूर्तीही कोरलेल्या आहेत. कार्ल्याच्या या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले ३५ लेख दिसून आले आहेत. येथे जाण्यासाठी पुणे येथून दीड तास तर मुंबई येथून दोन तास लागतात. कार्ला लेणीची चढण साधारण २० मिनिटांत पार होते. टेकडीच्या पायथ्यापासून साधारण ३५० तर मध्यात असणाऱ्या कार पार्क पासून २०० पायऱ्या आहेत.
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध



