‘चिंब भिजतांना’ साठवलेली हळुवार स्पर्शाची आठवण; वृंदा करमरकर

‘चिंब भिजतांना’ साठवलेली हळुवार स्पर्शाची आठवण; वृंदा करमरकर
सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परीक्षण
ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
ज्येष्ठ कवी ना. धो.महानोर यांच्या कवितेच्या या ओळी आज प्रकर्षानं आठवतात. लहानपणापासूनच पाऊस हा माझा सखा आहे. पाऊस पडताना तो रिमझिमत पडतो. माझ्या मनात मोर पिसारा फुलवत, झाडाझाडातून पावसाचे मोती पेरत तो बरसतो. पावसाची मी अगदी आतुरतेनं वाट पाहत असते. आकाशात काळे कबरे ढग दाटून येतात. ‘दूरवरून ओल्या मातीचा गंध माझ्या भोवती रुंजी घालू लागतो’.दूर घनावलीत पडघम वाजू लागतात आणि पावसाचा पहिला थेंब माझ्या ओंजळीमध्ये पडतो. लहानपणी पाऊस मला भेटला तो ‘येरे येरे पावसा’ या गाण्यातून. कौलावरून पडणाऱ्या पावसाच्या पागोळ्या झेलत पावसात भिजत नाचायचे. आई किंवा घरातील मोठी माणसं कितीही रागावली तरी त्यांना न जुमानता चिंब भिजण्यात किती आनंद व्हायचा!
आषाढात पाऊस कोसळू लागला की जे, जे बीज धरणीत पडले असेल ते ते उगवत वर येते. कोवळ्या तृणांकुरांनी पृथ्वीचे विशाल अंग झाकून तर जातेच पण ते उघडे बोडके दगडही त्यांच्या आसपासच्या डबक्यात पाणी साचले की हिरव्या गर्द शेवाळ्याची मखमल पांघरून बसतात. हिरव्या रंगाची विशाल वस्त्रं एकावर एक लपेटून सारं चराचर उभं असलेलं पाहिलं की, खरोखरच डोळ्यांचं पारणे फिटतं. एवढा मोठा समुद्र तोही आता काळं कबरं रूप टाकून आपल्या लाटांतून हिरवट छटांचे प्रदर्शन करत असतो. श्रावणातला पाऊस येताना आपल्याबरोबर सणांचा रिंगण घेऊन येतो. वृक्ष, लता, वेली पानाफुलांचं वैभव ल्यायलेल्या असतात.
पावसाची पहिली सर नभाचा सांगावा घेऊन धरणीला भेटते. नभ धरणीची अनादि कालापासूनची प्रीत आहे. पाऊस धारांनी धरणी गर्भवती, लेकुरवाळी होते. शेतं पिकतात. बळीराजा सुखावतो.झाडं,वेली बहरतात.नद्या नाले भरुन वाहतात. सारी सृष्टी कृतार्थ होते. एकंदरीत चिंब भिजताना आठवांचं रिंगण घालणारा पाऊस हवाहवासा वाटतो सर्वांनाच. पावसाच्या सरीत चिंब भिजताना आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. कधी विरहाच्या आठवणीसुध्दा दाटून येतात. दुरावलेल्या लोकांची आठवण येते. पाऊस असतो हळुवार स्पर्श करत सुखाचं दान देणारा, चिंब भिजवून खोड्या काढणारा, जेंव्हा तो उग्र रूप धारण करतो तेव्हा सर्वत्र अक्षरशः कहर माजवतो. शहरं, गावं, शेतं पाण्याखाली जातात. अतिवृष्टी, अनावृष्टी दोन्ही वाईटच.
महानगरांमध्ये थोड्या पावसानं सुध्दा जलप्रलयासारखी स्थिती होते. कारण नैसर्गिक नाले बुजवून बांधकामं केली आहेत. प्लास्टिक कचरा हे सुध्दा मोठं कारण आहे. हल्ली लोक पावसाळी सहलीला जातात. तिथं सावधानता बाळगली नाही तर प्राणहानी सारखे प्रसंग ओढावतात. रीलच्या नादात धोकादायक ठिकाणी पावसाळ्यात जाणं
टाळलं पाहिजे. आजच्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी दिलेला ‘चिंब भिजताना’ हा विषय सध्याच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर दिलेला अर्थपूर्ण आहे. सर्व शिलेदारांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
वृंदा(चित्रा)करमरकर
मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक
सांगली जिल्हा सांगली
©मराठीचे शिलेदार समूह





