रडावे की हसावे
डॉ राजेश काळे 'राजस' ता. जिल्हा नागपूर
रडावे की हसावे
रडावे किती, कुठे, कुणासाठी आणि कशासाठी, हे आपल्याला कळायलाच हवे. कारण अश्रूही शहाणपणाने वाहिले तरच त्यांना अर्थ उरतो. काही लोकांना नको त्या ठिकाणी, नको त्या माणसांसमोर रडण्याची सवय असते. संधी मिळेल तिथे आपलेच दुःख किती मोठे आहे, आपल्यावरच किती अन्याय झाले आहेत, किती कष्ट सहन करावे लागले, लोकांनी किती छळले, किती उपेक्षित ठेवले. हेच सांगण्यात त्यांना एक प्रकारची धन्यता वाटते. एक-दोन वेळा ऐकून घेणे समजू शकते; पण जेव्हा तेच तेच वारंवार सुरू होते, तेव्हा सहवेदनेची जागा हळूहळू कंटाळा घेतो. अशा व्यक्तीचा वीट येऊ लागतो. ती व्यक्ती दिसताच आपोआपच आपला मार्ग बदलावा असे वाटते. दुःखाची पुनरावृत्ती ही सहानुभूती निर्माण करत नाही; ती दुरावा निर्माण करते.
याउलट काही लोक असेही असतात, ज्यांना इतरांच्या दुःखावरची खपली काढायला विलक्षण आवड असते. थोडेसे पुचकारले, दोन गोड शब्द बोलले की समोरच्याला रडवण्यात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. अशा वेळी ते सल्ले देतात, अक्कल पाजतात, जणू काही सर्व शहाणपणाचा वसा त्यांनीच घेतलेला असतो. प्रत्यक्षात त्यांची सहानुभूती ही खरी नसून, ती केवळ स्वतःला मोठे दाखवण्याची एक संधी असते.
आजचे जग इतक्या वेगाने पळत आहे, की कुणालाही तुमच्या दुःखाची तर सोडाच, तुमच्या सुखाची आणि यशाचीही चौकशी करायला वेळ नाही. ‘हर शख़्स यहाँ अपनी ही उधेड़बुन में जी रहा है’. प्रत्येकजण आपापल्या कामात, संघर्षात आणि गरजांमध्ये गुंतलेला आहे. आज तीन दिवसांत तेरावा करायला लोक मागेपुढे पाहत नाहीत; अशा काळात तुमच्या आयुष्याच्या कथा कुणी किती गांभीर्याने घेणार? म्हणूनच सतत रडण्यात, स्वतःची कीव करून घेण्यात किंवा इतरांकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवण्यात फारसा अर्थ उरत नाही. काळाच्या ओघात अश्रू पुसले जात नाहीत; ते वाळून जातात. उरते ती केवळ पुढे जाण्याची गरज.
आता वेळ आहे रडणं थांबवून उभं राहण्याची. आपल्या वेदनांना आपल्या शक्तीत बदलण्याची. ज्यांनी दुःखाला पाठीवर वाहत बसण्याऐवजी, त्याला पायाखाली तुडवत पुढे चालायला सुरुवात केली तेच आपले ध्येय गाठतात. जग सहानुभूतीने नव्हे, तर सातत्याने केलेल्या प्रयत्नांनी जिंकले जाते. कारण अखेरीस यशस्वी तेच होतात,जे रडण्यात नाही, तर चालण्यात विश्वास ठेवतात.
“पुसा आता आपले डोळे व जगा स्वतःसाठी,
अस्तास गेलेला सूर्य पुन्हा येतो उगविण्यासाठी”
डॉ राजेश काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
=======
.



